Tuesday, October 6, 2026
Home Blog

भिगवण पोलिसांची ‘बुलेट’ स्पीड कारवाई! ‘हिट अँड रन’ प्रकरणात वाहन जप्त करीत चालकाला ठोकल्या बेड्या; सपोनि सोमनाथ शेंडगे यांचा नेचर डेअरीकडून नागरी सत्कार

0

अपघातातील मृत साहिल भोसले नेचर डेअरीचा कामगार असल्यामुळे नेचर डेअरी व्यवस्थापन आणि कामगारांचे तपासाकडे होते विशेष लक्ष

​भिगवण वार्ताहर. दि. 20
भिगवण पोलिस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या बुलेट अपघातातील ‘हिट अँड रन’ करून पळून गेलेल्या वाहनाचा तत्परतेने तपास लावून ते पकडण्यात भिगवण पोलिसांना यश आले आहे. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल व तत्पर तपासाबद्दल नेचर डेअरीचे संचालक संदीपभैय्या देसाई आणि जनरल मॅनेजर डॉ. प्रशांत कदम यांच्या हस्ते भिगवण पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ शेंडगे तसेच पथकातील अधिकारी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

​घटना व पोलिसांची तत्परता:

काही दिवसांपूर्वी भिगवण परिसर हद्दीत बुलेट दुचाकीचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात नेचर डेअरी चा एम्प्लॉयी असणाऱ्या साहिल भोसले याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूमुळे नेचर डेअरी या संस्थेतील कामगार तसेच कंपनी व्यवस्थापन यांच्यावर दुःखाचा प्रसंग निर्माण झाला होता.अपघात घडवल्यानंतर संबंधित अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून वाहनासह पसार झाला होता. यामुळे नेचर डेअरी चे संचालक संदीपभैया देसाई यांचे या प्रकरणी तपासाकडे विशेष लक्ष होते.
(‘हिट अँड रन’).
या गंभीर आणि आव्हानत्मक घटनेची तातडीने दखल घेत भिगवण पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सोमनाथ शेंडगे यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. सी सी. टीव्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि परिसरातील तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या काही दिवसातच पळून गेलेल्या वाहनाचा शोध घेऊन ते पकडले.

​पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक:

अपघातातील दोषी वाहनाचा शोध घेऊन न्याय मिळवून दिल्याबद्दल आणि कायदा-सुव्यवस्थेचा धाक निर्माण केल्याबद्दल नेचर डेअरीच्या व्यवस्थापनाने पोलिसांच्या या धडक कारवाईचे भरभरून कौतुक केले. याप्रसंगी नेचर डेअरीचे संचालक संदीपभैय्या देसाई आणि नेचर डेअरी चे जनरल मॅनेजर डॉ. प्रशांत कदम यांनी भिगवण पोलिस ठाण्यात जाऊन सोमनाथ शेंडगे यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन नागरी सत्कार केला.
​यावेळी बोलताना संदीपभैय्या देसाई यांनी सांगितले की, “अपघात करून पळून गेलेल्या वाहणाचा सर्व पैलूने तपास करून मृत व्यक्तीस न्याय देण्याच्या भूमिका आणि पोलिसांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे. यामुळे नागरिकांचा महाराष्ट्र पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होतो.”

​सत्काराला उत्तर देताना प्रभारी अधिकारी सोमनाथ शेंडगे यांनी सांगितले की, “नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पुणे ग्रामीण पोलिस नेहमीच कटिबद्ध आहेत. नागरिकांनी दिलेल्या या स्नेहामुळे आणि कौतुकामुळे कामाची ऊर्जा अधिक वाढते.”

भिगवण पोलिसांची दमदार कामगिरी ; बुलेट स्वाराच्या अपघातास कारणीभूत चालक कार सह घेतला ताब्यात.

0

रात्रीचा अपघात करून पसार झालेले वाहन सापडतच नाही असा समज खोडून काढत पोलिसांनी ठेवला वेगळाच आदर्श

भिगवण (विशेष प्रतिनिधी):

बारामती-भिगवण रस्त्यावर अपघात करून दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आणि घटनास्थळावरून पसार झालेल्या अज्ञात चारचाकी चालकाचा भिगवण पोलिसांनी केवळ ६ दिवसांत शोध लावून गुन्हा उघडकीस आणला आहे. या धडक कारवाईमुळे नागरिकांमधून पोलिसांचे विशेष कौतुक केले जात आहे.

​नेमकी घटना काय?

​१३ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ७:३० वाजण्याच्या सुमारास मौजे शेटफळगढे (ता. इंदापूर) हद्दीत कोठारी फार्मजवळ हा भीषण अपघात घडला होता. साहिल प्रवीण भोसले (वय २५, रा. उद्वट, ता. इंदापूर) हा तरुण आपल्या बुलेटवरून (क्र. MH 42 BT 0007) बारामतीकडून भिगवणकडे जात असताना भरधाव वेगातील एका अज्ञात वाहनाने त्याच्या गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने साहिलचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर चालक अपघाताची कोणतीही माहिती न देता वाहनासह पळून गेला होता.

काही वर्षांपूर्वी दुचाकी ​अपघातातच आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या तरुण साहिलचा या अपघातात मृत्यू झाल्याने इंदापूर-बारामती परिसरात प्रचंड हळहळ आणि संताप व्यक्त केला जात होता. ‘अपघात करून पळून गेल्यास वाहन सापडत नाही’ असा समज पसरल्याने समाजात तीव्र रोष निर्माण झाला होता.

​पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान

​या घटनेचे गांभीर्य ओळखून भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांनी तात्काळ विशेष तपास पथक तैनात केले. ग्रामीण भाग आणि रात्रीची वेळ असल्याने परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज अत्यंत अस्पष्ट दिसत होते. त्यामुळे अज्ञात वाहनाचा शोध घेणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान बनले होते.
​अशी झाली कारवाई
​तपास पथकाने अत्यंत सचोटीने, तांत्रिक माहितीच्या आधारे आणि गुप्त बातमीदारांमार्फत माहिती गोळा केली. अखेर अपघातातील चारचाकी ‘मारुती सुझुकी एस-क्रॉस’ (क्र. MH 42 AS 8123) आणि तिचा चालक विरेंद्र मनोहर सोनवणे (वय ४७, रा. मोतीबाग, गुणवडी, ता. बारामती, जि. पुणे) यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने अपघाताची कबुली दिली.
​या प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(ए), १२५(बी) आणि मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस अंमलदार नानासाहेब सूर्यवंशी करत आहेत.

​मार्गदर्शन व तपास पथक

​ही यशस्वी कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक (बारामती) गणेश बिरादार, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे, पोलीस अंमलदार नानासाहेब सूर्यवंशी, रामदास कर्चे, सचिन पवार, योगेश कुलकर्णी, तुषार रायकर आणि दत्तात्रय गवळी यांच्या पथकाने केली.

भिगवण बारामती मार्गांवर भीषण अपघात ; अपघातात बुलेट स्वार तरुणाचा जागीच मृत्यू

0

​भिगवण (वार्ताहर), दि. 16बारामती-भिगवण राज्य मार्गावरील शेटफळ गडे गावच्या हद्दीत, कोठारी फार्मजवळ रविवारी सायंकाळी ७:३० च्या सुमारास बुलेट आणि चारचाकी वाहनादरम्यान भीषण अपघात झाला. या दुर्देवी अपघातात बुलेटस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला.​

साहिल प्रवीण भोसले (वय २५, रा. उद्धट) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.​मिळालेल्या माहितीनुसार, साहिल भोसले हा आपल्या ताब्यातील बुलेट गाडीवरून (क्रमांक MH 42 BT 0007) बारामतीहून भिगवणच्या दिशेने जात होता. कोठारी फार्म येथील धोकादायक वळणावर समोरून येणाऱ्या एका अज्ञात चारचाकी वाहनाने त्याच्या बुलेटला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, साहिल गंभीर जखमी झाला.​अपघाताची माहिती मिळताच ‘आपुलकीची जागा रुग्णवाहिका सेवा’चे संचालक केतन वाघ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी साहिल याला उपचारासाठी भिगवण येथील ‘लाईफ लाईन आय.सी.यू.’ रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.​

घटनेची माहिती मिळताच भिगवण पोलिसांनी तातडीने अपघातस्थळी भेट देऊन पाहणी केली. धडक देऊन पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा व चालकाचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

साहिल याच्या आई-वडिलांचाही अवघ्या दोन वर्षांपूर्वी पूर्वी दुचाकी अपघातात मृत्यू झाला होता. दोन वर्षाच्या काळात कुटुंबातील आधार असलेला तरुण मुलगाही अपघातात दगावल्याने भोसले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने उद्धट, घोलपवाडी, पवारवाडी व भिगवण परिसरात अत्यंत हळहळ व्यक्त केली जात आहे.​

अपघाताची खबर सौरभ प्रदीप भोसले यांनी दिली.अपघाताचा तपास पोलीस हवालदार नानासाहेब सूर्यवंशी करीत आहेत.

भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सोमनाथ शेंडगे यांनी अज्ञात वाहनाचा तपास करण्यासाठी पथक नेमले असून लवकरच या वाहणाचा शोध घेतला जाणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

भिगवण पोलिसांची दमदार कामगिरी: शेतीपंपांच्या केबल चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला ठोकल्या बेड्या; १८ शेतकऱ्यांचा ₹१.७६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

0

​भिगवण वार्ताहर. दि. 16

भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेतीपंपांच्या इलेक्ट्रीक मोटारींच्या केबल चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून १८ शेतकऱ्यांचा एकूण १,७६,२५० रुपयांचा कॉपर केबल वायरचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ​मदनवाडी येथील शेतकरी पांडुरंग मारूती बंडगर यांच्या विहिरीवरील ३ पाणबुडी मोटारींची ७० मीटर फिनोलेक्स कंपनीची केबल (किंमत ११,२०० रुपये) चोरीस गेली होती.

याप्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा (गु.र.नं. २२८/२०२६) दाखल करण्यात आला होता. ​परिसरातील वाढत्या केबल चोरीच्या घटना गांभीर्याने घेत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे व गुन्हे शोध पथकाने (DB) तपास सुरू केला. गोपनीय बातमीदार व मदनवाडीतील दक्ष नागरिकांच्या मदतीने संशयित आरोपी टिंकू रामसेवक राजपूत (वय ३१, मूळ रा. आग्रा, उत्तर प्रदेश; सध्या रा. मदनवाडी, ता. इंदापूर) याला ताब्यात घेण्यात आले. ​सखोल चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली देत चोरीचा मुद्देमाल काढून दिला. या कारवाईमुळे भिगवण पोलीस ठाण्यातील गु.र.नं. २२८/२०२६ आणि २२९/२०२६ हे दोन गुन्हे उघडकीस आले असून, १८ शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ​

सदर कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. सोमनाथ शेंडगे, पीएसआय अमित पाटील, नाना वीर, पोलीस अंमलदार रामदास कर्चे, सचिन पवार, समीर झांबरे, सचिन भस्मे, शहाजी सुद्रीक व मदनवाडीतील दक्ष नागरिकांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार रामदास कर्चे करत आहेत.

भिगवण पोलिसांचा सराफ व्यावसायिकांना सुरक्षिततेचा कानमंत्र; मोडीच्या सोन्याला पावतीसह केवायसी घेण्याचे वापरावे तंत्र​

0

भिगवण पोलीस स्टेशन येथे सराफ व्यवसायिकांची आयोजित बैठकीत प्रभारी अधिकारी शेंडगे यांनी केली सूचना.

​भिगवण (वार्ताहर):दि. 22
सोन्या-चांदीचे गगनाला भिडलेले भाव आणि वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांनी भिगवण बाजारपेठेतील सराफ व्यावसायिक आणि सुवर्णकारांची तातडीची बैठक घेतली. भिगवण हे तीन जिल्हे आणि चार तालुक्यांचे मध्यवर्ती केंद्र असल्याने या ठिकाणी मोठी उलाढाल होते; त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने व्यापाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.
​यावेळी बोलताना पोलीस अधिकारी शेंडगे यांनी व्यापाऱ्यांना सुरक्षेचा कानमंत्र देत दुकानांमध्ये अद्ययावत सीसीटीव्ही यंत्रणा बसवण्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच, कोणत्याही ग्राहकाकडून मोडीचे (जुने) सोने-चांदी खरेदी करताना पावती आणि केवायसी (KYC) पडताळणी केल्याशिवाय खरेदी करू नये, असा स्पष्ट इशारा दिला.
बाजारपेठेतील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे होणाऱ्या त्रासावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी गावात ‘पी-१, पी-२’ (P1-P2) पार्किंग योजना अमलात आणली जाईल, अशी माहितीही त्यांनी या प्रसंगी दिली.
​केंद्रीय पुरस्कारप्राप्त अधिकाऱ्यांचा गौरव
उत्कृष्ट सेवेबद्दल मिळालेल्या केंद्रीय पुरस्काराबद्दल भिगवण सराफ संघटनेच्या वतीने सहाय्यक निरीक्षक सोमनाथ शेंडगे व सचिन पवार यांचा विशेष सत्कार करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
​या बैठकीस शिवाजी उदावंत, दत्तात्रय उदावंत , संदीप गायकवाड, दिलीप कदम, ओंकार उदावंत, संजय उदावंत, संतोष काळभोर, अतिश जगताप, गणेश उदावंत, तेजस जाचक, अजित कदम , सुरेश पाटील यांच्यासह सराफ व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भिगवण पोलिसांची उल्लेखनीय कारवाई: CEIR पोर्टलच्या मदतीने २.५ लाखांचे १० गहाळ मोबाईल हस्तगत करीत मूळ मालकांना केले परत!

0

​भिगवण वार्ताहर. दि. 20

भिगवण पोलीस स्टेशन हद्दीतून सन २०२५ व २०२६ या कालावधीत शेतकरी, व्यापारी आणि नोकरदारांचे गहाळ झालेले मोबाईल शोधण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलच्या प्रभावी वापराद्वारे पोलिसांनी सुमारे २ लाख ५० हजार रुपये किमतीचे १० गहाळ मोबाईल हस्तगत करून त्यांच्या मूळ मालकांना सुरक्षितपणे परत केले आहेत.

​भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांनी नागरिकांचे गहाळ झालेले मोबाईल मिळवून देण्याच्या उद्देशाने विशेष पुढाकार घेतला होता. त्यांनी पोलीस अंमलदार तुषार रायकर यांना मार्गदर्शन करून गहाळ मोबाईलची माहिती संकलित करण्याचे व CEIR पोर्टलच्या साहाय्याने त्यांचा तातडीने शोध घेण्याचे निर्देश दिले होते. या सूचनेनुसार पोलीस अंमलदार तुषार रायकर यांनी तंत्रज्ञानाचा अचूक वापर करत १० मोबाईल शोधून काढले.

​ही यशस्वी कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, बारामती विभागाचे अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे व पोलीस अंमलदार तुषार रायकर यांनी पार पाडली. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे

भिगवण पोलिसांची उंचावली मान अधिकारी यांना मिळाला ​गृह मंत्रालयाचा बहुमान: स. पो. नि.सोमनाथ शेंडगे व सचिन पवार यांना ‘उत्कृष्ट सेवा पदक व प्रशस्तीपत्रक’ प्रदान

0

भिगवण (प्रतिनिधी):
महाराष्ट्र पोलीस दलात दीर्घकालीन, निष्कलंक आणि उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल भिगवण पोलीस ठाण्याचे (पुणे ग्रामीण) प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ सिंधू पांडुरंग शेंडगे आणि पोलीस अंमलदार सचिन रतन अशोक पवार यांना भारत सरकारच्या गृह मंत्रालयाकडून सन २०२६ चे ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर झाले आहे.
​या उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवेची दखल घेऊन माननीय पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य (मुंबई) यांच्याकडून या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना ‘उत्कृष्ट सेवा पदक व प्रशस्तीपत्रक’ प्रदान करून अधिकृतपणे गौरविण्यात आले आहे.

स. पो. नि.शेंडगे यांनी नक्षली भाग गडचिरोली, नागपूर, पुणे शहर आणि अत्यंत संवेदनशील असणाऱ्या दहशत वादी विरोधी पथक अर्थात ए. टी. एस पथकात काम करीत आपल्या दिमाखदार कार्याची छाप सोडली आहे. असा अधिकारी भिगवण पोलीस ठाण्याला लाभला असल्यामुळे भिगवणची कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्यासाठी नक्कीच फायदा होणार आहे.

तर दुसरे बहुमान प्राप्त सचिन पवार यांनी पुणे ग्रामीण पोलीस अंतर्गत येणाऱ्या आणि मोठी लोकसंख्या असणाऱ्या नारायणगाव, तसेच लोणी काळभोर आणि सध्या नियुक्ती असणाऱ्या भिगवण पोलीस ठाण्यात रायटर अर्थात दप्तरी कामकाज केले आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अचूक कागदपत्रे न्याय व्यवस्थेकडे जाणे आणि गुंड प्रवृत्ती च्या नागरिकांना चाप बसून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळबून देण्यासाठी दप्तरी अधिकाऱ्याचे कामकाज नेहमी उपयोगी ठरत असते आणि सचिन पवार यांच्या माध्यमातून ते चोखपणे पार पाडले जातं असल्यामुळे त्यांना हा बहुमान मिळाला आहे.

या दोन्ही बहुमान मिळालेल्या अधिकारी यांच्या ​पोलीस दलातील त्यांच्या निष्कलंक सेवा, शिस्तबद्धता आणि कर्तव्यनिष्ठेमुळे भिगवण पोलीस ठाण्याचे तसेच पुणे ग्रामीण पोलीस दलाचे नाव उंचावले आहे. या सन्मानाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

बारामतीत सराईत चोराच्या मुसक्या आवळून 30 लाखाच्या 19 बुलेट हस्तगत ; स्थानिक गुन्हे शाखा बारामती आणि तालुका पोलिसांची धाडसी कारवाई.

0

भिगवण वार्ताहर. दि. 14

बारामती शहर आणि तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत गेल्या १५ दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बुलेट मोटारसायकल चोरीचे प्रमाण वाढले होते. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि बारामती तालुका पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. त्याच्याकडून तब्बल ३० लाख रुपये किमतीच्या १९ मोटारसायकली (१३ बुलेट व ६ इतर मोटारसायकल) जप्त करण्यात आल्या असून १९ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.​

पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईत समाधान बाळू काळे (वय २३, रा. मानेवाडी, ता. फलटण, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.​

बारामती परिसरात रात्रीची गस्त घालत असताना पोलिसांना एका संशयिताबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पेन्सिल चौकाकडून मेडिकल कॉलेजकडे चोरीची मोटारसायकल घेऊन जाणाऱ्या संशयिताचा पाठलाग करून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.​आरोपी रात्रीच्या वेळी चोरी करत असे. पोलिसांपासून वाचण्यासाठी तो चोरीच्या वाहनांवर ‘महाराष्ट्र पोलीस’, ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’ (मनसे) किंवा ‘एसटी महामंडळ’ असे लोगो लावायचा, तसेच व्ही.आय.पी. नंबर प्लेट वापरून वावरायचा.​​जप्त केलेल्या बुलेट गाड्यांचे क्रमांक:​MH 42 BK 3003​MH 42 AV 2121​MH 42 BK 0741​MH 42 BK 1701​MH 42 BD 9490​MH 42 AT 5455​MH 42 AZ 0374​MH 42 AZ 1616​MH 42 AB 1212​MH 42 TG 2677​MH 42 AV 7869​MH 42 UQ 0303​MH 42 EA 9177(याशिवाय इतर ६ मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत.)​

पोलिसांची ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.​या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार, उपनिरीक्षक सुधीर वाळुंज, पो.स.ई. बाळासाहेब कारंडे, तसेच अंमलदार शिवाजी निकम, किशोर तेलंग, स्वप्निल अहिवळे, शैलेश स्वामी, गुलाब पाटील, सुलतान डांगे, तुषार चव्हाण, रईस मुलानी, गणेश डेरे, अभिजित एकशिंगे, शशीकांत दळवी, भगवान थोरवे, मनोज पवार, सुरेंद्र वाघ, जितू शिंदे, भारत खारतोडे, जयश्री आटोळे आणि विठ्ठल तरंगे यांनी भाग घेतला.​आरोपी सध्या पोलीस कोठडी रिमांडमध्ये असून पुढील तपास बारामती तालुका पोलीस स्टेशन करत आहे.

पोलिसांच्या या धाडसी कारवाई मुळे बारामती आणि परिसरातील बुलेट चोरीला आळा बसणार असून कारवाईचे नागरिकांतुन कौतुक केले जात आहे.

भिगवण पोलिसांची धडक कारवाई: गावठी पिस्तूल अन् स्कॉर्पिओसह ५.४० लाखांचा मुद्देमाल जप्त; आरोपीस बेड्या!

0

भिगवण वार्ताहर. दि. 11

भिगवण पोलीस स्टेशन हद्दीतील निरगुडे परिसरात गावठी पिस्तूल बाळगून फिर्यादीस गोळ्या घालण्याची धमकी देत दहशत निर्माण करणाऱ्या आरोपीला भिगवण पोलिसांनी अत्यंत तत्परतेने अटक केली आहे. आरोपीकडून एक गावठी पिस्तूल (अग्निशस्त्र), एक जिवंत काडतूस आणि गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ गाडी असा एकूण ५ लाख ४० हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

​याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादी नुसार ​दिनांक ०७/०८/२०२६ रोजी दुपारी ३:०० वाजण्याच्या सुमारास मौजे निरगुडे (ता. इंदापूर, जि. पुणे) येथील जमीन गट नंबर १३७ मध्ये आरोपी सौरभ मारूती पवार (वय २८ वर्ष, रा. म्हसोबाचीवाडी, ता. इंदापूर) याने आपल्या स्कॉर्पिओ गाडीतून येऊन फिर्यादी युवराज प्रतापराव भोसले यांना “तू येथे थांबायचे नाही, निघून जा” असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच स्वतःजवळील गावठी पिस्तूल दाखवून “तुला व तुझ्या क्रशर मालकाला गोळ्या घालतो” अशी जिवे मारण्याची धमकी दिली होती. ​याप्रकरणी फिर्यादीवरून भिगवण पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नंबर १९८/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३५१(२), ३५२ व भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३(२५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. ​

पोलिसांची कारवाई वअटक:​

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांनी तात्काळ तपास पथक तयार करून आरोपीच्या शोधासाठी रवाना केले. तपासादरम्यान दिनांक १०/०८/२०२६ रोजी आरोपी सौरभ पवार याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. ​त्याच्या ताब्यातून:​अग्निशस्त्र: १ गावठी पिस्तूल ​काडतूस: १ जिवंत काडतूस ​वाहन: स्कॉर्पिओ गाडी (क्र. MH 12 EM 9488) ​एकूण किंमत: रु. ५,४०,२००/- जप्त करण्यात आले आहेत. ​आरोपीस १०/०८/२०२६ रोजी रात्री २०:०४ वाजता अटक करण्यात आली असून न्यायालयाने आरोपीला दिनांक १३/०८/२०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

सदरची धडक कामगिरी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक (बारामती) गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, आणि स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांनी नेमलेल्या पथकात पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, विठ्ठल वारगड, पोलीस अंमलदार महेश उगले, सचिन पवार, आणि रणजित मुळीक यांनी ही कारवाई केली. गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि. सोमनाथ शेंडगे करत आहेत.

उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या शिष्टाईला यश: अमर बौद्ध युवक संघटनेचे आमरण उपोषण काही दिवसासाठी स्थगित

0

भिगवण दि. 4

मदनवाडी येथे महसूल विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा न ठेवल्याच्या निषेधार्थ अमर बौद्ध युवक संघटनेने सुरू केलेले आमरण उपोषण अखेर स्थगित करण्यात आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) चैतन्य कदम यांनी केलेल्या मध्यस्थी आणि यशस्वी शिष्टाईनंतर हा निर्णय घेण्यात आला, ज्यामुळे भिगवण बाजारपेठेतील तणावाचे वातावरण निवळले आहे.​

पोलीस ठाण्यात पार पडली सकारात्मक चर्चा

​घटनेचे गांभीर्य ओळखून माजी सरपंच प्रशांत शेलार, देवानंद शेलार, बाळासाहेब शेलार यांच्यासह समाजातील प्रमुखांनी उपोषणकर्ते रोहित शेलार, अनिकेत भिसे आणि अमोल कांबळे यांची भेट घेत त्यांना सोबत घेऊन भिगवण पोलीस ठाण्यात DYSP चैतन्य कदम यांची चर्चेसाठी भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत आपला मुद्दा ठामपणे मांडत आंदोलकांनी या चुकीस कारणीभूत असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली.​

यावर बोलताना DYSP कदम यांनी कायदेशीर तांत्रिक बाबी स्पष्ट करत, असा गुन्हा थेट दाखल करणे शक्य नसले तरी प्रांत अधिकाऱ्यांसोबत उपोषणकर्त्यांची बैठक घडवून आणून या प्रश्नातून योग्य मार्ग काढण्याचे ठोस आश्वासन दिले. या चर्चे दरम्यान महसूल विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.​

आंदोलन काही दिवसांसाठी स्थगित​

डी. वाय. एस. पी यांच्या सोबत झालेल्या सकारात्मक चर्चे नंतर माजी सरपंच प्रशांत शेलार आणि देवानंद शेलार यांनी समाजातर्फे महत्त्वाची भूमिका बजावत आंदोलकांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. या मध्यस्थीला मान देऊन आंदोलकांनी उपोषण काही दिवस स्थगित करण्यास सहमती दर्शवली.​

सरबत पाजून उपोषणाची समाप्ती

​आंदोलकांच्या विनंतीवरून DYSP चैतन्य कदम यांनी स्वतः उपोषणस्थळी भेट दिली. प्रभारी पोलीस अधिकारी सोमनाथ शेंडगे, पीएसआय अमित पाटील आणि पोलीस हवालदार महेश उगले यांच्या उपस्थितीत DYSP कदम यांनी उपोषणकर्त्यांना सरबत पाजून आमरण उपोषण अधिकृतपणे स्थगित केले. उपोषण समाप्तीच्या वेळी उपस्थित समाजबांधवांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष केला.​

कृतज्ञता व्यक्त:

या आंदोलनात अग्रभागी असणारे उपोषणकर्ते अमोल कांबळे, रोहित शेलार, अनिकेत भिसे, किरण कांबळे, संदीप वाघमारे, प्रेम लोंढे, रोहन निकाळजे आणि अभी लोंढे यांचे सर्व समाजबांधवांच्या वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आले.