Tuesday, October 6, 2026
Home Blog Page 3

ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनाखाली चिरडून एकाचा मृत्यू ; अपघात नसून घातपात झाल्याचा नातेवाईकांचा आरोप.

0

भिगवण वार्ताहर.दि.२३

भिगवण बारामती मार्गावर पिंपळे गावच्या हद्दीत उस वाहतूक करणाऱ्या वाहनाखाली चिरडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे १.३० च्या सुमारास घडली.उस तोडणीच्या हंगामातील हा दुसरा अपघातातील बळी असून अजून किती बळी गेल्यावर कारखाना प्रशासन आणि परिवहन विभाग जागा होणार ? असा प्रश्न नागरिक विचारीत आहेत.तर हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय मृत व्यक्तींच्या नातेवाईक करीत आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हरी आण्णा धोत्रे वय.२७ रा.मदनवाडीची भकासवाडी असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.पिंपळे गावाच्या हद्दीत वीट कारखान्याच्या पूर्व दिशेला हा अपघात घडला असून अपघातात धोत्रे याचा जागीच मृत्यू झाला.तर त्याच्या ताब्यात असणाऱ्या दुचाकीचा अगदी चुराडा झाला आहे.तर वाहन चालक अपघात झाल्यानंतर वाहन जाग्यावरच सोडून पळून गेला असल्याची माहिती मिळत आहे. बेदरकारपणे चालणाऱ्या उस वाहतुकीमुळे अनेक निष्पाप नागरिकांचे जीव जात असून कारखाना प्रशासन आणि परिवहन विभाग मात्र काहीच उपाययोजना करीत नसल्याचे जाणवून येत आहे.भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांनी वेळोवेळी कारखाना प्रशासनाला सूचना देवूनही अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना केली गेली नाही.तर ओव्हरलोड वाहने ,विना लायसन्स ड्रायव्हर ,विना पासिंग वाहने ,विना रीप्लेकटर वाहने ,दारू पिवून चालवली जाणारी वाहने यांच्यावर परिवहन विभागाला कारवाई करण्यासाठी वेळ उपलब्ध नाही काय असा प्रश्न निर्माण होत आहे .तर अपघातात घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे निर्माण होणारी स्थिती कारखानदार आणि वाहतूकदार यांना समजत नसल्यामुळे माणसे अशीच किड्यामुंग्या सारखी चिरडली जात राहणार अशी परीस्थिती दिसून येत आहे.

आज अपघातात मृत्यू झालेल्या हरी धोत्रे यांच्या नातेवाईकांना हा अपघात नसून ज्या दोन व्यक्ती हरी यांना सोबत घेवून गेल्या त्यांनीच काही घातपात केल्याचा संशय आहे .याबाबत अनेक नातेवाईक ग्रामीण रुग्णालय येथे जमा होवून त्यांनी या प्रकरणी सखोल तपास व्हावा अशी मागणी केली आहे .

फेसबुक वरील ओळखीच्या माध्यमातून विश्वास संपादन करून बलात्कार करीत पीडितेचे सोने लुबाडणारया नराधमाच्या मुसक्या भिगवण पोलिसांनी आवळल्या.

0

भिगवण वार्ताहर .दि.७

भिगवण पोलिसांनी धाडसी कारवाई करीत सोशल मिडीयाच्या माध्यमातून ओळख करीत विश्वास संपादित झालेल्या अबलेच्या सोन्यावर डल्ला मारून शरीराचे लचके तोडणार्या  क्रूर आरोपीच्या मुसक्या आवळीत मुद्देमाल जप्त केला.भिगवण पोलिसांच्या या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांतून कौतुक करून स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाच्या इतरही गुन्ह्याच्या तपास कारवाईसाठी अधिकार वाढवावेत अशी मागणी केली जात आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आरोपी गणेश शिवाजी कारंडे याने भिगवण पोलीस ठाणे हद्दीतील एका सौंदर्य सुधार केंद्रातील एका पिडीतेची फेसबुक च्या माध्यमातून ओळख करीत विश्वास संपादन केला.यावेळी याने आपले नाव संग्राम पाटील असल्याचे आणि पोलीस विभागाशी आपले सबंध असल्याचे काही फोटो ओळखीच्या ठिकाणी ठेवले.तर पिडीतेला सौंदर्य सुधार केंद्राच्या साठी लागणारे कर्ज मिळवून देतो म्हणून भिगवण पोलीस स्टेशन हद्दीतील लॉजवर बोलावून काही कागदपत्रावर सह्या घेतल्या.तसेच कर्जप्रकरणासाठी शरीरावरील खुणा टाकाव्या लागतील म्हणून अंगावरील कपडे काढून या नराधमाने अबलेच्या शरीराचे लचके तोडले.यावेळी महिला अचानक झालेल्या परिस्थितीतून सावरत असताना आरोपीने महिलेच्या सोन्यावर डल्ला मारून पलायन केले.या विषयी तक्रार प्राप्त होताच भिगवण पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांनी  गुन्हे शाखेतील अमलदार महेश उगले ,संतोष मखरे प्रमोद पालसांडे ,वैष्णवी राउत या पथकाची नियुक्ती करीत तपासाला सुरवात केली.सदर आरोपी फेसबुक या सोशल मिडीयावर ‘ संग्राम पाटील ’ तसेच ‘ पृथ्वीराज पाटील ’ नावाने कार्यरत असल्याचे पथकाच्या समोर आले.तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त खबऱ्याच्या  माध्यमातून सखोल तपास केला असता आरोपी अकलूज पोलीस स्टेशन हद्दीत असल्याचे समजले.तसेच हा सराईत गुन्हेगार असून वेशभूषा बदलून तो तोतया पोलीस म्हणून वावर करीत असल्याची पक्की माहिती भिगवण पोलिसांना मिळाली .पोलिसांनी तातडीने पाउल उचलीत सदर  आरोपीला ताब्यात घेत मुद्देमाल जप्त केला.माननीय न्यायालया समोर हजर करत असताना न्यायालया त्याला पोलीस कोठडी सुनावली.या आरोपीवर महिला बाबत इतर पोलीस ठाण्यात गुन्हे असून आणखीन काही पीडितांच्या बाबत काही तक्रारी असल्यास पोलीस ठाण्यात येण्याचे आवाहन सपोनि विनोद महांगडे यांनी केले आहे .

भिगवण पोलिसांची सिघम कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल ,अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार ,विभागीय अधिकारी डॉ .सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विनोद महांगडे ,अमलदार सचिन पवार ,महेश उगले ,संतोष मखरे ,प्रमोद गलांडे ,गणेश पालसांडे ,वैष्णवी राउत यांच्या पथकाने केली.  

ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर च्या अपघातात मदनवाडी येथील शेतकऱ्याचा मृत्यू ; भिगवण बारामती रोडवरील घटना

0

भिगवण वार्ताहर. दि. 4
भिगवण बारामती राज्यमार्गांवर मदनवाडी गावच्या हद्दीत ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीची धडक लागून मदनवाडी गावातील शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली.


याबाबत मिळालेल्या माहिती नुसार किशोर बाळासाहेब साळुंखे वय 30 रा. मदनवाडी या शेतकरयाचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. दुचाकी वरून प्रवास करणाऱ्या साळूंखे यांना मदनवाडी गावाच्या कमानी समोर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॉलीची धडक बसली. दोन ट्रॉली असल्यामुळे त्यांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच आपुलकीची ऍम्ब्युलन्स सेवा चे संचालक केतन वाघ यांनी तातडीने मदत करीत मृत साळुंखे यांचा मृतदेह भिगवण ग्रामीण रुग्णालय येथे शव विच्छेदन करण्यासाठी पाठविला. याबाबत भिगवण पोलीस ठाण्यात अपघाताची माहिती देण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर प्रकिया पूर्ण करण्याचे काम पोलीस ठाण्याकडून केले जात आहे.
मात्र ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर रुपी राक्षसी यमराजाने निष्पाप शेतकऱ्याचा जीव घेतला असून याबाबत मदनवाडीकर हळहळ व्यक्त करीत असल्याचे दिसून आले.तर कर्णकर्कश आवाजात बेधुंद वेगात अतिलोड ऊस वाहतूकी वर कारखाना प्रशासन पोलीस प्रशासन आणि परिवहन विभागाने लक्ष न दिल्यास अपघातात अजूनही निष्पाप जीव धोक्यात येतील अशी भीती येथील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत..

अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीने गुदमरला भिगवण बाजारपेठेचा श्वास ; भिगवण ग्रामपंचायत आणि पोलिसांनी कारवाई करण्याची होतेय मागणी

0

भिगवण वार्ताहर. दि. 4

भिगवण बाजारपेठ तीन जिल्ह्यातील आणि चार तालुक्यातील जवळपास 30 गावे आणि 20 वाडीवस्ती वरील ग्राहकांसाठी रोज लागणाऱ्या वस्तू खरेदी साठी योग्य ठिकाण मानले जाते. मात्र या ठिकाणी वाढत असलेले अतिक्रमण आणि काही आपलाच व्यवसाय व्हावा स्वार्थी वृतीच्या व्यापारी वर्गामुळे बाजारपेठेतील रस्ते कोंडले जात असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक ग्रामपंचायत प्रशासन आणि पोलिसांनी यावर कारवाई करावी अशी मागणी करत आहेत.

उजनी धरणाच्या निर्मिती नंतर भिगवण बाजारपेठ नाव लौकिक वाढीस लागला. या ग्रामीण भागाची शहरी भागाकडे वाटचाल सुरु झाली. ग्राहकांना रोज आवश्यक असणाऱ्या वस्तू आणि सेवा अगदी योग्य किंमतीत मिळू लागल्याने आसपास च्या खेडेगावातील ग्राहक या बाजारपेठेकडे आकर्षित झाला. दळण वळणाच्या सुविधेत दिवसेंदिवस वाढ झाल्यामुळे दिलासा वाढू लागला. बाजार समिती आणि ग्रामपंचायत प्रशासनाने भाजीपाला आणि धान्य बाजार तसेच शेळी मेंढी यांचा व्यवसाय वाढीस लागावा यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या. मात्र बाजारपेठ वाढ होत असतानाच अतिक्रमनाचा महामेरू वाढीस लागल्यामुळे याचा त्रास सर्वसामान्य ग्राहक तसेच व्यापारी वर्गाला होऊ लागला आहे. भिगवण ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासन यांचा योग्य मेळ बसत नसल्यामुळे अतिक्रमण करणारांची मस्ती वाढत असून याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. भिगवण पोलिसांनी बाजारपेठेत वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी अगदी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून पी 1 पी 2 सारखी वाहतूक व्यवस्था मंजूर करून आणली होती. मात्र काही नतदृष्ट राजकीय पुढारी आणि राजकीय पाठबळ असणारया काही व्यापाऱ्यांनी विरोध करीत ही योजना बासनात गुंडाळून ठेवण्यासाठी विरोध केला. याचा फटका त्या व्यापारी वर्गाला बसला असून वाहतूक कोंडी नसणाऱ्या ठिकाणी ग्राहक खरेदीला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. राजकीय गणित आणि पोलिसांच्या शांत संयमी भूमीके मुळे अतिक्रमण करणारांचे धाडस वाढत असून हे बाजारपेठेच्या सर्वांगीण आरोग्यासाठी घातक ठरत आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक वर्ग आणि व्यापारी वर्गातून हे अतिक्रमण काढण्याची आणि वाहतूक कोंडी सोडविण्याची मागणी केली जात आहे.

भिगवण राशीन राज्यमार्गांवर अज्ञात वाहनाने ठोकरल्यामुळे पादचाऱ्याचा मृत्यू ; अपघात करून वाहन पसार

0

भिगवण वार्ताहर. दि. 13

भिगवण राशीन राज्यमार्गांवर डिकसळ गावच्या हद्दीत अज्ञात वाहनाने ठोकरल्यामुळे पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी 9 ते 10 च्या सुमारास घडली.

याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अपघातात विजय सीताराम बांडे वय 42 राहणार खेड ता. कर्जत यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना ठोकर देणारे वाहन अपघात करून पसार झाले. या अपघाताची माहिती मिळताच आपुलकीची जागा ऍम्ब्युलन्स सर्व्हिस चे संचालक केतन वाघ यांनी तातडीने घटना स्थळी भेट घेत अपघातातील रुग्णाला वैदकीय उपचारासाठी हलविण्याचा प्रयत्न केला मात्र अगोदरच बांडे यांचा मृत्यू झाला होता.याबाबत भिगवण पोलीस स्टेशनला मृत बांडे यांच्या मेहुणे संजय रामचंद्र मोरे रा. खेड यांनी खबर दिली असून भिगवण पोलीस अपघातातील वाहणाचा तपास घेत आहेत.
सदर अपघात आणि अपघातातील अज्ञात वाहणाचा तपास भिगवण पोलीस ठाण्याचे इन्चार्ज विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अन्सार शेख आणि विजय लोढी करीत आहेत..

बारामती भिगवण राशीन राज्य मार्गाचे नूतनीकरण नव्यानेच झाले असून यावर वाहनांचा वेग कमालीचा वाढला असल्याचे दिसून येत आहे. तर मागील काही दिवसापासून या राज्य मार्गाची अपघाती राज्यमार्ग अशी ओळख बनत असून यात नागरिकांना आपला जीव गमवावा तसेच कायमचे अपंगत्व स्वीकारावे लागत आहे. तर बारामती पासुन भिगवण पर्यंत अपघातांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. तसेच मदनवाडी तक्रारवाडी येथील टप्प्यात अनावश्यक डिव्हायडर ओपनिंग नागरिकांच्या जीवावर बेतत असून याकडे प्रशासन कोणतीही भूमिका घेत नसल्याचे दिसून येत आहे.

भिगवण परिसरात चालू हंगामातील 505 मिलिमिटर पावसाची नोंद ; समाधानकारक पाऊस आणि उजनीच्या शंभरी मुळे सुखावला बळीराजा..

0

महा बँक ग्रामीण विकास केंद्राचे कृषी सहाय्यक देविदास फलफले यांची माहिती..

भिगवण वार्ताहर.दि.११

भिगवण परिसरात मे महिन्यात आलेल्या मान्सूनपूर्व पावसाने समाधानी झालेल्या बळीराजाला दोन महिने कोरडे गेल्यामुळे सताविणाऱ्या काळजीला ९ ओगस्ट आणि १० ओगस्ट ला झालेल्या दमदार पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असून उजनीच्या १०० टक्यांनी भरल्यामुळे बाजारपेठेत आनंद दिसून येत आहे.

भिगवण परिसरात अनेक वर्षात निसर्गाने आपली किमया दाखवीत  पहिल्यांदाच ४१७ .८० मिली मीटर इतक्या पावसाची बरसात केली होती.त्यामुळे बळीराजा आणि व्यापारी वर्ग हि आनंदी झाले होते .मात्र गेली जून ०० आणि जुलै ०० हे दोन महिने कोरडी गेल्यामुळे बळीराजाला चिंता सतावित असतानाच ओगस्ट मध्ये परत वरुणराजा बरसायला सुरवात झाली असून या महिन्यात जवळपास ८७.७० मिलीमीटर पाऊस बरसला असल्याची माहिती महाबँक ग्रामीण विकास केंद्राचे कृषीसहायक देविदास फलफले यांनी दिली.तर या हंगामातील आज अखेर ५०५.४० मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाल्याची माहितीहि फलफले यांनी दिली.भिगवण परिसरात सरासरी इतका पाऊस पडत असतो तर २०२४ या साली ८०५ मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली तर २०१२ साली २८८.७० इतक्या कमी पावसाची नोंद झाली असल्यामुळे या वर्षी वरुणराजा कोणता विक्रम करतो याची वाट बळीराजा पाहत आहे…  

बारामती राशीन राज्यमार्गांवर तक्रारवाडी गावच्या हद्दीत मालवाहतूक करणाऱ्या वाहनाने ठोकरल्याने दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू ; रविवार रात्री आठ वाजता घडला अपघात

0

भिगवण वार्ताहर.दि.११

बारामती राशीन राज्यमार्गावर तक्रारवाडी गावच्या हद्दीत जयभवानी हॉटेल समोर मालवाहतूक करणाऱ्या कॅरी गाडीने दुचाकीला ठोकर दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली .या अपघात १० वर्षाचा मुलगा जखमी झाला आहे.

याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात गणेश सुखदेव जाधव वय ३१ रा.शेटफळगढे यांचा जागीच मृत्यू झाला आहे .तर ओम अशोक जाधव वय १० वर्ष राहणार तक्रारवाडी (भकासवाडी) हा मुलगा जखमी झाला आहे. राशीन बाजूकडील जयभवानी हॉटेल समोर मारुती सुझुकी कंपनीची कॅरी गाडी नंबर एम.एच,१२ व्ही .टी .९६४२ हिने हिरो कंपनीची दुचाकी नंबर एम.एच.४२ ए जे ७९५१ या गाडीस जोराची ठोकर दिल्याने सदर अपघात घडला.यात दुचाकी चालक गणेश जाधव यांचा जागीच मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेला ओम जाधव जखमी झाला.भिगवण पोलिसांनी  मालवाहतूक करणाऱ्या कॅरी गाडीवरील ड्रायव्हर सतीश शंकर धेंडे रा.काशेवाडी भवानी पेठ पुणे याच्याविरोधात त्याच्या ताब्यातील वाहनाने वाहतुकीचे नियम न पाळता भरधाव वेगात दुचाकीस ठोकर देवून दुचाकीस्वाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे.सदर गुन्ह्याचा तपास प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेश उगले आणि हवा.करचे करीत आहेत .

बारामती राशीन रोडवरील मदनवाडी चौक ते तक्रारवाडी गावाच्या हद्दीत सार्वजनिक बांधकाम खात्याने एक किलोमीटर डिव्हायडर ला ६ ठिकाणी खुले ठेवल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे.गेल्या आठवड्यात अशाच अपघातात तक्रारवाडी गावातील नागरिकाने जीव गमविला असतानाच हा अपघात घडला आहे.हॉटेल व्यावसायिकांच्या व्यवसायासाठी खुल्या केलेल्या डिव्हायडर मुले अपघात होत असताना याचे सोयरसुतक सार्वजनिक बांधकाम खाते ,कंत्राटदार आणि सबंधित गावच्या सरपंच यांना नाही त्यामुळे निष्पाप नागरिक चिरडले जात आहे.याकडे प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करत आहेत.

याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांनी खुले असणाऱ्या डिव्हायडर मुळे  अपघात वाढत असल्याचे सांगून पोलीस प्रशांसानाच्या वतीने आवश्यक नसणारे वळणे बंद करण्यासाठी सावर्जनिक बांधकाम खात्याला पत्रव्यवहार केला जाणार असल्याचे सांगितले.

भिगवण येथे पुणे सोलापूर महामार्ग ओलांडताना एकाचा अपघाती मृत्यू ; तोडलेल्या बॅरिगेट मुळे निष्पाप नागरिकाला गमवावा लागला जीव.

0

महामार्ग प्रशासनाच्या हलगर्जी पणाचा बळी ; महामार्गांवरील तोडलेल्या बॅरिगेट बाबत कोणतीही कोणतीही कारवाई नाही. तसेच दुरुस्ती साठी यंत्रणा पाठविली नाही.

भिगवण वार्ताहर.दि.२३

भिगवण येथे पुणे सोलापूर महामार्ग ओलांडीत असताना ट्रकची धडक बसून एका पादचार्याचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली .महामार्ग प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि व्यावसायिकांच्या आपमतलबी वृतीचा हा बळी असून संबंधितांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात दिलीप निवृत्ती गायकवाड वय .४५ रा.कळस असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.गायकवाड हे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी कुरकुंभ या ठिकाणी जात असताना पुणे बाजूला असणाऱ्या सागर हॉटेल समोर सर्विस रस्त्यावर आपली गाडी पार्क करून सोलापूर बाजूला असणाऱ्या स्वीटहोम कडे येत होते.महामार्ग प्रशासनाने याठिकाणी लोखंडी बेरीगेट केलेले होते मात्र काही अज्ञात व्यावसायिकांनी आपल्या व्यवसायासाठी रात्रीच्या वेळेत कटर वापरून हे बेरीगेट तोडले आहेत.याच ठिकाणाहून गायकवाड जात असताना सोलापूर बाजूला जाणार्या ट्रक ने त्यांना धडक दिली.अपघात झाल्यावर ट्रक ड्रायव्हरने जखमीला मदत न करता पळ काढला होता.मात्र पत्रकार राजेभोसले यांनी त्याचा पाठलाग करून पकडीत पोलिसांच्या स्वाधीन केले.भिगवण पोलिसांनी ट्रक ड्रायव्हर आकाश मधुकर साखरे वय.३२ रा.हिप्परगा तुळजापूर याला ताब्यात घेवून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली.

मात्र या अपघाताला ट्रक ड्रायव्हर सोबतच बेरीगेट तोडणारे व्यावसायिक आणि महामार्ग प्रशासन असून तोडलेले बेरीगेट पूर्ववत करण्याची जबाबदारी असताना हलगर्जीपणा केला आहे.महामार्ग प्रशासनाने राजकीय दबावापोटी बाजार भरणाऱ्या ठिकाणी बेरीगेट केले नसल्यामुळे बाजार दिवसी गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर आपला व्यवसाय व्हावा म्हणून अज्ञात व्यावसायिकांकडून केल्या जाणार्या चुकीच्या कामामुळे अनेक निष्पाप माणसांचे जीव जात असताना महामार्ग प्रशासन आणि महामार्ग पोलीस कोणतीही कायदेशीर कारवाई करताना दिसून येत नाहीत.

याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांनी बेरीगेट तोडल्यामुळे अपघात झाल्याचे मान्य करीत बेरीगेट विषयात हलगर्जीपणा करणार्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.तसेच महामार्ग प्रशासनाला तोडलेले बेरीगेट दुरुस्त करण्याच्या सूचना करणार असल्याचे सांगितले.

भिगवण पोलीस आवारातील बेवारस वाहनांचा होणार लिलाव ; इच्छुक खरेदीदारांना सहभाग नोंदविण्याचे सपोनि विनोद महांगडे यांचे आवाहन.

0

भिगवण वार्ताहर. दि.. 12

भिगवण पोलीस स्टेशन यांनी विविध कारवाईत तसेच संशयित गुन्ह्यात जप्त केलेली दुचाकी आणि चारचाकी वाहने मूळ मालकांनी कागदपत्रे दाखवून घेऊन जाण्याचे आवाहन अनेक वेळा पोलीस ठाण्याच्या माध्यमातून करण्यात आले होते. याबाबत अनेक वेळा प्रिंट मीडिया आणि सोशल मीडिया तुन आवाहन करण्यात आले होते.
या आवाहना नंतर अनेक मूळ मालकांनी आपली वाहने नेली होती. मात्र या आवाहना नंतरही अनेक वाहणांची मालकी सांगणारा कोणीच समोर न आल्याने अखेर ही बेवारस वाहने समजून त्यांचा भिगवण पोलीस ठाण्याच्या आवारात लिलाव करण्यात येणार असल्याच्या सूचना वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेऊन तसेच कायदेशीर प्रकिया पूर्ण करून पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांनी दिल्या आहेत.

सदर लिलाव प्रकिया बाबत सर्व प्रिंट मीडिया तसेच सोशल मीडिया यावर प्रसिद्धी देण्यात आली असून लिलाव झालेली सदरची वाहने ही जागेवर स्क्रॅप (मोडतोड करून भंगार )करण्यात येणार आहेत. या लिलाव प्रकीयेमध्ये ज्या अधिकृत भंगार व्यवसायीक यांना सहभागी व्हायचे आहे. त्यांनी त्यांचा अधिकृत परवाना, आधार कार्ड, घेवुन भिगवण पोलीस स्टेशन येथे 15 एप्रिल 2025 रोजी सकाळी ११:०० वा हजर रहावे असे आवाहन भिगवण पोलीस स्टेशन यांच्या माध्यमातून प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांनी केले आहे.

भिगवण ग्रामपंचायत प्रशासनाकडून अपंग कल्याण निधीचे होणार वाटप ; अपंग (दिव्यांग )लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी सरपंच गुराप्पा पवार यांचे आवाहन.

0

भिगवण वार्ताहर. दि. 15
भिगवण गावातील अपंग (दिव्यांग )नागरिकांचा निधी देण्याच्या कार्यवाहीला सुरवात केली असून लाभार्थी अपंग नागरिकांनी ग्रामपंचायत विभागाकडे कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन सरपंच गुराप्पा पवार तसेंच उपसरपंच सत्यवान भोसले यांनी केले. तर ग्रामपंचायत सर्व लाभार्थी यांना निधी दिला जाणार असल्याची माहिती ही यावेळी सरपंच पवार यांनी दिली.
पंचायत राज संस्था च्या उत्पनाच्या 5 टक्के निधी अपंग( दिव्यांग )नागरिकांना अपंग निधी दिला जातो. भिगवण ग्रामपंचायत विभागाकडून दरवर्षी आलेला निधी वितरित केला जातो. मात्र काही लाभार्थी पुरेशी माहिती आणि योग्य ती कागदपत्रे सादर न केल्यामुळे ते या लाभापासून वंचित राहतात. भिगवण गावातील कोणताही लाभार्थी या निधी पासून वंचित राहू नये यासाठी ग्रामपंचायत प्रशासन दखल घेत असून सर्वाना यांचा लाभ मिळावा यासाठी ग्रामपंचायत विभागाकडून विशेष प्रयत्न केले जात असल्याचे सरपंच गुराप्पा पवार आणि उपसरपंच सत्यवान भोसले यांनी सांगितले.
तसेच कागदपत्रे जमविण्यासाठी काही अडचण असल्यास यात ही प्रशासनाकडून मदत केली जाणार असल्याचे सांगून सर्व लाभार्थी यांना यांचा फायदा मिळावा ही आपली भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच याबाबत सर्व मीडिया आणि प्रिंट मीडियाला प्रेस नोट देऊन आवाहन केले जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.यावेळी इंदापूर बाजार समितीचे माजी उपसभापती पराग रमेशराव जाधव, इंदापूर पंचायत समितीचे उप सभापती संजय पंढरीनाथ देहाडे, उपसरपंच सत्यवान भोसले, माजी सरपंच तानाजी वायसे, दत्ता धवडे, जयदीप जाधव, बाबासाहेब शिंदे, आबा काळे, प्रतिमा देहाडे, मछिंद्र खडके कपिल भाकरे, जुलेखा शेख उपस्थित होते.