पुणे सोलापूर महामार्गावर मदनवाडी ब्रिज वरून कंटेनर खाली कोसळला. चालकाचा अपघातात मृत्यू.
भिगवण वार्ताहर. दि. 15
पुणे सोलापूर महामार्गांवर मदनवाडी ब्रिज वरून सर्व्हिस रोड वर कंटेनर कोसळल्याने झालेल्या भीतीदायक अपघातात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या कंटेनर खाली इतर वाहने आणि नागरिक न आल्याने मोठी जीवितहानी टळली. या भयानक अपघाताने तरी भिगवण कर नागरिक जे महामार्गांवर अतिक्रमण करून व्यवसाय करतात आणि अनधिकृत पणे पार्किंग करतात त्यांचे डोळे उघडतील अशी आशा व्यक्त होत आहे.
याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांनी दिलेल्या माहिती नुसार पुणे सोलापूर महामार्गांवरील पुणे बाजूकडे जाणाऱ्या कंटेनर एमएच ४३ सीके ६५११ हा मदनवाडी गावच्या हद्दीत अशोका हॉटेल समोर मुख्य रस्त्यावरील ब्रिज वरून खाली कोसळला. या अपघातात चालक श्रवणकुमार भगवती प्रसाद यादव वय ३७ वर्षे, रा. मुंबई मूळ रा उत्तर प्रदेश याचा जागीच मृत्यू झाला. सदर अपघात 6 वाजण्याच्या सुमारास घडला असून झोपेत चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे 40 ते 50 फूट खाली असणाऱ्या सर्व्हिस रोडवर कंटेनर आदळला. सुदैवाने यावेळी कोणतेही वाहन अथवा प्रवासी नसल्यामुळे जीवितहानी झाली नाही. अपघाताची माहिती मिळताच भिगवण पोलिसांनी तसेच महामार्ग पोलिसांनी घटना स्थळी भेट घेत अपघात ग्रस्त वाहन काढण्याचे कार्य सुरु केले. कंटेनर समोरील वाहन तातडीने काढून कंटेनर काढण्यासाठी काम सुरु केले.कंटेनर बाजूला केल्यावर या खाली कोण दबले आहे काय याचा शोध लागेल. मात्र हा अजस्त्र कंटेनर उचलण्यासाठी लागणारी सामग्री जमविण्यासाठी पोलीस प्रयत्न करीत आहेत.
या अपघाताने तरी भिगवण कर नागरिकांना जाग यावी ही अपेक्षा कारण महामार्गवर अशा प्रकारे अनेक अपघात घडले असून यातून काही बोध भिगवण करानी घेतला असल्याचे आतापर्यंत तरी दिसून आले नाही. भिगवण बस स्थानकासमोर असाच एक अपघात घडला होता. तर एका माथेफिरूने बस पळवून केलेला अपघात तसेच पुणे बाजूला जाणाऱ्या इंडिका गाडीने अनेक गाड्यांचे केलेले नुकसानाचा अपघात, गेल्या 15 दिवसापूर्वी आजचा अपघात घडला त्याच समोर घडलेला अपघात अशी अपघातांची मालिका रोज घडत असूनही अजूनही रोड वर अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्यांचे प्रमाण कमी होताना दिसून येत नाही. तर महामार्ग पोलीस आणि हायवे प्रशासन अपघात झाल्यावर पंचनामा शिवाय अनधिकृत पार्किंग आणि व्यवसाय हटविताना दिसून येत नाही. या अपघाताने तरी सर्वांचे डोळे उघडून जिवा पेक्षा व्यवसाय मोठे नाहीत याची जाणीव व्हावी ही तमाम नागरिकांची मागणी.
भिगवण मध्ये होळी आणि धुलवड सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत गर्दी
भिगवण वार्ताहर. दि. 14
भिगवण शहरामध्ये होळी आणि धुलवड सणाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांनी गर्दी केली असून सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भिगवणची बाजारपेठे आसपासच्या 15 गावे आणि 40 च्यावर असणाऱ्या वाड्या वस्त्यावरील नागरिकांना रोज लागणाऱ्या वस्तू आणि सेवाचे ठरलेलं ठिकाण. त्यातच भिगवण साठी सर्व गाव आणि वाड्या वास्त्यावरून दळणवळणाचे जाळे चांगल्या प्रकारे तयार झाले आहे.त्यामुळे नागरिकांना सहज खरेदी साठी येता येते.
होळी आणि धुलवड सणाच्या निम्मिताने भिगवण बाजारपेठेत गर्दी वाढत असून व्यापारी वर्गात यामुळे समाधान निर्माण झाले आहे. नुकताच उसाचा गाळप हंगाम पूर्ण झाल्यामुळे शेतकरी वर्ग आणि मजूर वर्ग आपल्या कामातून थोडासा निवांत झाला आहे. तर कारखान्यानी बिले सोडल्यामुळे खिशात पैसा आला असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच सध्या यात्रा आणि जत्राचा हंगाम सुरु होत असून नागरिकांचा खरेदी करण्याकडे कल वाढत असल्याचे दिसून येत आहे.
कापड दुकाने, किराणा दुकाने, इलेॅक्ट्रिक दुकाने आणि हॉटेल मध्ये ग्राहकांची चेहेल पेहेल वाढली असून लग्न सराई सुरु झाल्याने सरांफी दुकानात ही काही प्रमाणात ग्राहक दिसून येत आहेत.
बाजारपेठेतील गर्दीवर भिगवण पोलिसांचे लक्ष असून गजबलेल्या चौकात पोलीस जवान तसेच होमगार्ड यांच्या माध्यमातून चोख बंदोबस्त ठेवला जात आहे.तसेच पोलीस धुलवड आणि होळीच्या पार्श्वभूमीवर ड्रॅन्क अँड ड्राइव्ह करणाऱ्या नागरिकांना जनजागृती आणि कारवाई करणार आहेत…..सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे
मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीचा 20 लक्ष रुपयाचा निधी ; भिगवण वैकुंठ भूमीत होणार निवाऱ्याची सोय
भिगवण वार्ताहर.दि.११
भिगवण येथील वैकुंठ स्मशानभूमीत नागरिकांना बसण्यासाठी आवश्यक असणाऱ्या शेडचे भूमिपूजन राष्ट्रवादीचे आण्णासाहेब धवडे शुभहस्ते सरपंच गुराप्पा पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले .कॅबिनेट मंत्री दतात्रय भरणे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून २० लाख रुपयाचा निधी मंजूर झाल्याची माहिती राष्ट्रवादीचे अजिंक्य माडगे यांनी सांगितले.
भिगवण वैकुंठ स्मशानभूमीत नागरिकांना बसण्यासाठी शेडची व्यवस्था होती मात्र सुशोभीकरण करताना आणि स्मशानभूमीची उंची वाढविण्याच्या हेतूने तत्कालीन सरपंच तानाजी वायसे यांच्या कार्यकाळात हे शेड काढण्यात आले होते.मात्र शेड काढल्याने अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत होता.ग्रामस्थ आणि कार्यकर्ते यांनी याबाबत मंत्री दतात्रय भरणे यांच्याकडे मागणी केली होती.याच मागणीची तातडीने दखल घेत मंत्री भरणे यांनी जिल्हा नियोजन समितीतून २० लाख रुपयाचा निधी मंजूर केला.या शेडचे भूमिपूजन आज करण्यात आले.
राष्ट्रवादीचे आण्णासाहेब धवडे यांच्या शुभ हस्ते नारळ फोडून भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सरपंच गुराप्पा पवार, राष्ट्रवादीचे अजिंक्य माडगे,उपसरपंच सत्यवान भोसले ,बाजार समिती उपसभापती पराग जाधव ,पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय देहाडे ,माजी सरपंच तानाजी वायसे ,दत्ता धवडे ,माजी उपसरपंच प्रदीप वाकसे ,अजिंक्य माडगे ,अशोक शिंदे ,जावेद शेख ,तुषार क्षीरसागर ,सचिन बोगावत ,बापूराव थोरात ,संदीप वाकसे ,मोहन शेंडगे ,वैभव देवकाते ,रोहित भरणे ,अमोल देवकाते , शुभम शेलार ,आप्पासाहेब गायकवाड ,रोहित शेलार ,विक्रम देवकाते ,निखील बोगावत ,अमोल वाघ ,आकाश उंडाळे ,दत्तात्रय पाचांगने ,अनिल तांबे ,सुरेश बिबे ,दिनानाथ मारणे,भाऊसाहेब भरणे ,संदीप शेलार उपस्थित होते.
तक्रारवाडी ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान ; जागतिक महिला दिनी स्तुत्य उपक्रम.
भिगवण वार्ताहर.दि.८
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून तक्रारवाडी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा गौरव करीत त्यांच्या कार्याला सलाम करण्यात आला. ग्रामपंचायत तक्रारवाडी गावच्या सरपंच ,उपसरपंच ,ग्रामसेविका ,आरोग्य उपकेंद्र अधिकारी ,वायरमन ,आरोग्य सेविका ,अंगणवाडी सेविका ,स्वस्त धान्य दुकानदार ,जिल्हा परिषद शाळा केंद्र प्रमुख, महिला शिक्षिका, ग्रामपंचायत महिला सफाई कर्मचारी या सर्वच पदावर महिला काम करत असल्यामुळे दररोजच महिला दिन असतो मात्र त्यांच्या कार्याचा आजच्या दिवशी सन्मान करण्यात आला .
या जन्मात देवाला जितके महत्व दिले जाते तितकेच महत्व ‘ ती ‘ला म्हणजे महिलेला दिले जाते .ती कधी आई असते तर कधी ताई असते तसेच ती जीवनदायी आणि करुणासागर असते .याच महिलेचा सन्मान व्हावा म्हणून आजच्या दिवशी महिलादिन साजरा केला जातो.इंदापूर तालुक्यातील महत्वाच्या मानल्या जाणार्या तक्रारवाडी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थाच्या वतीने आज हा सन्मान घेण्यात आला.यावेळी सरपंच मनीषा वाघ ,उपसरपंच आशाताई जगताप ,ग्रामपंचायत सदस्या संगीता वाघ,प्राजक्ता वाघ,ग्रामसेविका शोभा जाधव ,उपकेंद्र आरोग्य अधिकारी डॉ.मृदुला जगताप ,वीज मंडळ कर्मचारी गीतांजली कन्ठाळे ,कृषी अधिकारी पल्लवी काळे स्वस्त धान्य दुकानदार पार्वती जगदाळे ,जिल्हा परिषद शाळा केंद्र प्रमुख मनीषा दुर्गे ,राष्ट्रवादी तालुका महिला उपाध्यक्षा सीमा काळंगे , आरोग्य सेविका स्वाती शिंदे ,ज्योती जगताप ,साधना वाघ तसेच मदनवाडी गावच्या माजी सरपंच आम्रपाली बंडगर यांचा यावेळी बहुमान करण्यात आला.यावेळी सरपंच मनीषा वाघ ,विलास गडकर ,महेश वाघ ,मुख्याध्यापक राजेश नाचन , सीमा काळगे यांनी आपली मनोगत व्यक्त केली.
यावेळी माजी सरपंच सतीश वाघ ,शरद वाघ ,अंजना थोरात ,गौरी काळंगे ,दिपाली वाघ ,मनीषा चौधरी ,शोभा पिसाळ ,कविता वाघ ,संगीता खडके,तेजस्विनी भोसले ,नंदा साळुंखे, तसेच सर्व शिक्षक वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे नियोजन ग्रामपंचायत तक्रारवाडी ,ग्रामस्थ तक्रारवाडी,शिक्षक वृंद जिल्हा परिषद शाळा यांच्या वतीने तर आभार मनीषा चौधरी यांनी मांडले .
भिगवण गावच्या हिंदू खाटीक समाजासाठी स्वखर्चाने बोअर ; बाजार समिती माजी उपसभापती पराग जाधव यांचे कौतुकास्पद कार्य
भिगवण वार्ताहर .दि. ७
भिगवण गावातील हिंदू खाटिक समाजाचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी स्वतःच्या खिशातून खर्च करून बोअर मारून २४ तास पाणी उपलब्ध करण्याचे काम भिगवण गावच्या पराग जाधव यांनी केले.त्यांच्या या कामाचे कौतुक खाटिक समाजाचे पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन खडके यांनी ‘ गावचा नेता असावा तर असा ’ उल्लेख करीत समाजाच्या वतीने सत्कार केला.
गावचा पुढारी म्हटल कि आश्वासन देन आणि नागरिक आणि प्रत्येक समाजाला झुलवत ठेवण हि परिस्थिती सर्व ठिकाणी पहावयाला मिळते .मात्र भिगवण गावात याच्या उलट परिस्थिती दिसून आली . बाजार समितीचे माजी उपसभापती आणि भिगवण गावचे सदस्य पराग रमेशराव जाधव यांनी हिंदू खाटिक समाजाला आवश्यक असणारा जागेचा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक मदत केली.फक्त जागा मिळवून देण्याचा प्रयत्न केला नाहीतर या ठिकाणी स्वतःच्या पैशाने बोअर मारून पाण्याची सोय करून दिली.त्यामुळे हिंदू खाटिक समाज बांधवांनी जाधव यांचे आभार व्यक्त केले. या बोअर पूजन आणि सत्कार समारंभासाठी सत्यवान भोसले ,दत्ता धवडे ,अमितकुमार वाघ ,देवानंद शेलार ,तानाजी वायसे ,गणेश कांबळे,राजेंद्र जमदाडे ,बबलू कांबळे ,मनोज खडके ,बंडू ताडे,प्रशांत कांबळे ,हनुमंत खडके ,सौरभ जमदाडे ,आकाश कांबळे,केतन कांबळे आदित्य थोर्पे ,रेश्मा खडके ,त्रिवेणी कांबळे ,शुभांगी कांबळे ,रुपाली ताडे,तनुजा जमदाडे उपस्थित होत्या .
यावेळी बोलताना हिंदू खाटिक समाजाचे पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन खडके यांनी पराग जाधव यांनी समाजासाठी नेहमीच योगदान दिले असल्याचे सांगितले.समाजासाठी जागा मिळवून देण्यासाठी त्यांचा मोठा वाटा असल्याचे सांगितले.तर आज स्वतःच्या खिशातून समाजासाठी पाणी मिळवून दिल्याने समाज त्यांचा ऋणी असल्याचे सांगितले.
भिगवण पोलिसांची दमदार कामगिरी ;ऍग्रो कारखाना परिसरातून चोरीला गेलेला ट्रॅक्टर संशयित चोरट्यासह ताब्यात.
भिगवण वार्ताहर.दि.३
भिगवण पोलिसांनी दमदार कामगिरी करत उस वाहतूक करणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्याचा बारामती अग्रो कारखाना शेटफळ परिसरातून चोरी झालेला ट्रॅकटर हस्तगत करीत चोराच्याही मुसक्या आवळल्या .१०० ठिकाणाचे सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय गोपनीय बातमीदाराच्या मदतीने केलेल्या कामगिरी मुळे पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यातील चोरटा सोमनाथ भारत शिंदे वय .२३ रा.शिंदेवस्ती बावडा ता.इंदापूर याला अटक करण्यात आले आहे.याबाबत दिलेल्या माहितीनुसार शेतकरी उस वाहतूकदार अक्षय अनिल राउत रा.केतुर ता.करमाळा यांनी बारामती शेटफळ अग्रो कारखाना येथून आपला ट्रॅकटर नंबर एम.एच.४५ ए क्यू ३२०७ अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची तक्रार भिगवण पोलीस ठाण्यात दिली.उस वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्याची झालेली चोरी भिगवण पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी विनोद महांगडे यांनी गांभीर्याने घेत सदर चोरीच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील ,पोलीस अंमलदार महेश उगले ,संतोष मखरे ,सचिन पवार आणि प्रमोद गलांडे यांची टीम नियुक्त करून तपासकामी पाठविले. या टीम ने बारामती अग्रो कारखाना तसेच बावडा व इतर मार्गातील जवळपास १०० च्यावर सीसीटीव्ही चे आकलन करून तसेच तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदार याच्या माध्यमातून बावडा येथील चोरट्याच्या मुसक्या आवळल्या .मात्र या चोरट्याने ट्रॅकटर ला असणारी जी.पी.एस सेवा भवानीनगर परिसरात काढून टाकल्याचे लक्षात आले.त्यामुळे पोलीस पथकाने संशयित चोरट्याला बोलते करून त्याने नळदुर्ग ता.धाराशिव येथे लपविलेला मुद्देमाल ताब्यात घेत कारवाई पूर्ण केली.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख ,अपर पोलीस अधीक्षक बारामती विभाग गणेश बिरादार ,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे ,पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील ,पोलीस अंमलदार महेश उगले,संतोष मखरे ,सचिन पवार ,प्रमोद गलांडे यांनी केली.
तक्रारवाडी बौध्द विहारासाठी कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून सामाजिक न्याय चा 20 लाखाचा निधी ; सरपंच मनीषा वाघ यांच्या उपस्थितीत भूमिपूजन
भिगवण वार्ताहर.दि.३
तक्रारवाडी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर बौद्ध विहाराचे बांधकाम आणि सुशोभीकरण विकास कामाचे भूमिपूजन गावच्या सरपंच मनीषा प्रशांत वाघ यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कॅबीनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाकडून २० लाख रुपयाचा निधी मंजूर झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सचिन आढाव यांनी दिली.
इंदापूर तालुक्याचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे कॅबीनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून तक्रारवाडी गावच्या सर्वांगीण विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जात आहे.याच अनुशंघाने बौद्ध समाजासाठी बौद्ध विहार बांधकाम आणि सुशोभीकरण अंतर्गत पेव्हर ब्लॉक साठी सामाजिक न्याय विभागातून २० लक्ष रुपयाचा विकास निधी मंजूर करण्यात आला आहे.याच विकास कामाचे भूमिपूजन आज विद्यमान सरपंच मनीषा वाघ यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या राणीताई आढाव ,माजी सरपंच सतीश वाघ ,राष्ट्रवादी पक्षाच्या इंदापूर तालुका महिला उपाध्यक्षा सीमा काळंगे ,उपसरपंच प्रतिनिधी विजय जगताप ,माजी सरपंच अनिल काळंगे ,गणेश वायदंडे ,आण्णा आढाव माजी उपसरपंच प्रशांत वाघ ,भाऊसाहेब वाघ ,पांडुरंग वाघ,डॉ.बाळासाहेब भोसले ,वैभव आढाव, अक्षय जोगदंड,नवनाथ पाटोळे ,तनुजा आढाव ,संगीता आढाव ,सुरज जाधव ,उमेश आढाव ,हेमंत भोसले ,योगेश गायकवाड उपस्थित होते.
यावेळी बोलताना सचिन आढाव यांनी मंत्री दतात्रय भरणे यांचे माधयामातून मिळालेल्या निधीतून सर्व तळागाळातील नागरिकांना विकास कामाचा फायदा होत असल्याचे सांगण्यात आले.तर विकास कामे होताना ती दर्जेदार व्हावी यासाठी आपण स्वतः प्रसंगी उभे राहून लक्ष देवून काम करून घेणार असल्याचे सांगितले .
जिल्हा परिषद तक्रारवाडी शाळेच्या वर्गखोलीचे अनुष्का भरणे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन ; जिल्हा नियोजन समिती माध्यमातून मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिला विकास निधी
भिगवण वार्ताहर.दि.२५
तक्रारवाडी गावातील जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोलीचे भूमिपूजन भगवानराव भरणे प्रतिष्टानच्या कार्याध्यक्षा अनुष्का भरणे यांच्या उपस्थितीत पार पडले.यावेळी तक्रारवाडी गावच्या सरपंच मनीषा वाघ,मदनवाडी गावच्या सरपंच अश्विनी बंडगर ,भिगवण गावच्या आदर्श सरपंच हेमाताई माडगे ,इंदापूर बाजार समितीचे संचालक आबासाहेब देवकाते ,प्रशांत शेलार ,प्रदीप वाकसे ,अजिंक्य माडगे ,प्रमोद नरुटे राजाभाऊ देवकाते ,बापूराव थोरात तसेच तक्रारवाडी ग्रामपंचायत सदस्या प्राजक्ता वाघ,उपसरपंच प्रतिनिधी विजय जगताप ,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि माजी सरपंच मोहनराव वाघ तसेच इतर सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
तक्रारवाडी शाळा हि इंदापूर तालुक्यातील केंद्र शाळा असून या शाळेत जवळपास ४५० च्यावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.हे विद्यार्थी माती दगडात बांधलेल्या आणि पत्र्याच छत असणाऱ्या वर्गखोल्यात आपले शिक्षण घेत आहेत.या जुन्या काळात बांधण्यात आलेल्या शाळा खोल्या आज धोकेदायक स्थितीत असून नवीन खोल्या मिळाव्यात.यासाठी तक्रारवाडी ग्रामपंचायत पदाधिकारी राजकीय कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी मागणी केली होती.
याच मागणीचा विचार करून राज्याचे कॅबिनेट मंत्री दतात्रय भरणे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात १ आणि पुढील टप्प्यात १४ खोल्या मंजूर केल्या आहेत.याच विकास कामाचे भूमिपूजन अनुष्का भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना अनुष्का भरणे यांनी इंदापूर तालुक्याचे आमदार आणि तत्कालीन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून तक्रारवाडी गावाला ३ कोटी ६० लाख रुपयाचा विकास निधी देण्यात आला असल्याचे सांगितले.तर गेल्या १५ वर्षात इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवीत कोट्यावधी रुपयाचा निधी तालूक्यासाठी आणला असल्यामुळे इंदापूर करांनी त्यांना तीनवेळा निवडून आणण्याची पोच पावती दिली असल्याचे सांगितले.तसेच तक्रारवाडी गावचा पुढील विकास हि त्यांच्याच माध्यमातून केला जाणार असल्याची ग्वाही दिली.यावेळी तक्रारवाडी गावच्या सरपंच मनीषा वाघ ,राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सीमा काळंगे ,माजी उपसरपंच प्रशांत वाघ ,विलास गडकर ,मुख्याध्यापक राजेश नाचन ,शिक्षण समिती अध्यक्ष महेश वाघ यांनी मनोगते व्यक्त केली.यावेळी भिगवण मदनवाडी तसेच भिगवण स्टेशन येथील राजकीय सामाजिक कार्यकर्ते यांनी हजेरी लावली.
तक्रारवाडी जिल्हा परिषद शाळेला कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून निधी मिळाला असताना देखील राष्ट्रवादी पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी मात्र या कार्यक्रमाकडे पाठ फिरविली असल्याचे चित्र दिसून आले.तर ग्रामपंचायत सरपंच ,उपसरपंच आणि इतर दोन तीन सदस्य सोडता काही सदस्याची अनुपस्थिती दिसून आली.मात्र ग्रामस्थ आणि महिला तसेच पालकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर दिसून आली.
यावेळी कार्यक्रमाचे नियोजन माजी सरपंच अनिल काळंगे ,माजी उप सरपंच प्रशांत वाघ,सचिन आढाव ,दीनानाथ मारणे,सचिन वाघ ,विजय जगताप, बलभीम आढाव,महेश वाघ,डॉ.बाळासाहेब भोसले,नवनाथ पाटोळे ,आणासाहेब आढाव,तसेच शाळेतील शिक्षक वर्गाने केले.
भिगवण ग्रामीण रुग्णालय येथील शिबिरात 233 रुग्णांची कर्करोग तपासणी ; 8 संशयित रुग्णांना पुढील तपासणी साठी रेफर
भिगवण वार्ताहर.दि.१७
भिगवण ग्रामीण रुग्णालय आणि ट्रामा केअर सेंटर येथे कर्करोग तपासणी व्हॅन मार्फत घेण्यात आलेल्या शिबिरात २३३ रुग्णांची तपासणी करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेखा पोळ यांनी दिली .यावेळी शिबिरात ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.सचिन विभूते ,डॉ.अनिकेत लोखंडे ,स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.अमोल खानावरे ,डॉ.सूर्या दिवेकर ,दंतरोग तज्ञ डॉ.घोगरे ,डॉ.मृदुला जगताप ,डॉ.कीर्ती व्यवहारे ,समुदाय आरोग्य अधिकारी रेणुका कुलकर्णी ,वैदकीय अधिकारी संतोष पाटील यांच्या माध्यमातून शिबिरात रुग्णांची तपासणी करण्यात आली.यावेळी २ संशयित रुग्ण महिलांच्या गर्भाशयाच्या मुखाजवळ तसेच ४ स्तनातील गाठ आणि २ मुखातील कर्करोग संशयित रुग्णाची पुढील तपासणी करण्यासाठी पाठविण्यात आले.यावेळी गट विकास अधिकारी इंदापूर सचिन खुडे यांच्या उपस्थितीत शिबिराला सुरवात करण्यात आली.
राज्यात सुरु असलेल्या कर्करोग तपासणी आणि असंसर्गजन्य रोग कार्यक्रम तसेच माननीय सार्वजनिक आरोग्य मंत्री यांच्या संकल्पनेतून आणि उपसंचालक राधाकिसन पवार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागनाथ एमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली कर्करोग तपासणी व्हॅन भिगवण ग्रामीण रुग्णालय येथे आली होती.त्यावेळी हे तपासणी आणि जनजागृती शिबीर आयोजित करण्यात आले होते.सदर कर्करोग शिबिरामध्ये तोंडातील कॅन्सर ,स्तन कॅन्सर ,गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाचा कॅन्सर याची विविध तद्न्य डॉक्टर यांच्या माध्यामातून तपासणी करण्यात आली.यावेळी जवळपास २३३ रुग्णांची तपासणी करण्यात आली यात ८ संशयित रुग्णांना पुढील तपासणी करण्यासाठी पाठविण्यात आले. ‘ संशयित रुग्ण आढळून आल्याने हे शिबीर फलदायी ठरले असून अजूनही असेच शिबीर राबविल्यास याचा फायदा सर्वसामान्य रुग्णांना होईल ’ अशी मागणी माजी पंचायत समिती उपसभापती संजय देहाडे यांनी केली.
ग्रामीण रुग्णालय आणि ट्रामा केअर सेंटर येथे पार पडलेल्या शिबिराला भिगवण आणि परिसरातून अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळीनी हजेरी लावली.हे शिबीर चांगल्याप्रकारे पार पाडण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ.अनिकेत लोखंडे यांना शेटफळ गडे प्राथमिक आरोग्य अधिकारी ,समुदाय आरोग्य सहायक ,आरोग्य कर्मचारी ,आशा सेविका ,आरोग्य सेवक ,गट प्रवर्तक यांनी मदत केली.























