धक्कादायक! सेवा संपलेल्या अधिकाऱ्यानेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या औषधांवर डल्ला मारल्याचा संशय ; ग्रामस्थांची थेट जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे तक्रार

0
149

​भिगवण (वार्ताहर):दि. 6

इंदापूर तालुक्यातील शेटफळ (गडे) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. रुग्णांसाठी शासनाकडून मोफत पुरवठा करण्यात येणारा औषधसाठा रात्रीच्या वेळी लांबवण्यात आल्याची घटना उघडकीस आली असून, यामुळे संपूर्ण आरोग्य वर्तुळात आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे, या चोरीत सेवा समाप्ती झालेल्या एका माजी कंत्राटी आरोग्य अधिकाऱ्याचाच हात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून आल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे .मात्र या प्रकरणी चौकशी सुरु असल्यामुळे चौकशी अंती या प्रकरणी दोषी असणार्यांचे नाव समोर येणार आहे.

​सीसीटीव्ही फुटेजमुळे फुटले बिंग

​शेटफळ प्राथमिक आरोग्य केंद्रातून शासकीय औषधसाठ्याची परस्पर विल्हेवाट लावली जात असल्याचा संशय स्थानिक ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांना आला होता. यानंतर त्यांनी सतर्कता दाखवत आरोग्य केंद्रातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची कसून पाहणी केली. या चित्रीकरणात, आधीच सेवा समाप्ती झालेल्या एका माजी कंत्राटी आरोग्य अधिकाऱ्याकडून रात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेऊन औषधे व इतर वैद्यकीय साहित्याची पळवापळवी केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.ग्रामस्थांनी हे सर्व फुटेज सार्वजनिक करत प्रशासनाचा पर्दाफाश केला आहे.

​ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप ;
पोलीस ठाण्यात अद्याप तक्रार नाही

​शासकीय रुग्णालयातील गोरगरीब रुग्णांच्या औषधांची अशा प्रकारे चोरी झाल्यामुळे ग्रामस्थांमधून आणि नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. घटनेची गंभीर दखल घेत शेटफळगडे गावातील नागरिक व लोकप्रतिनिधींनी तातडीने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याप्रकरणी सखोल चौकशी व कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. मात्र, वृत्त लिहिपर्यंत या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात कोणतीही अधिकृत फौजदारी तक्रार दाखल करण्यात आली नसल्याची माहिती समोर येत आहे.

​प्रशासन काय म्हणाले?

​”संबंधित कंत्राटी आरोग्य अधिकाऱ्याला ही घटना घडण्यापूर्वीच सेवेतून निलंबित करण्यात आले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली असून, समितीचा अहवाल हाती आल्यानंतर संबंधितावर तात्काळ कठोर फौजदारी कारवाई केली जाईल.”
— डॉ. रामचंद्र हंकारे, जिल्हा आरोग्य अधिकारी

​”या गंभीर प्रकाराची माहिती मला मिळाली असून, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर यात कोणतीही कसूर न ठेवता योग्य ती कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.”
— मेघनाताई बंडगर, जिल्हा परिषद सदस्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here