भिगवण पोलिसांनी केलेल्या आवाहनाला ग्रामस्थ आणि भाविक यांचा प्रतिसाद ; परंपरेने चालत आलेल्या अनिष्ठ प्रथेला पहिल्यांदा दिली बगल
भिगवण (वार्ताहर) : दि. 13
इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी येथील जागृत देवस्थान श्री यशवंतराय यांची वार्षिक यात्रा अत्यंत भक्तीमय, शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. भाविकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत यंदाच्या यात्रेपासून ‘जमिनीवर झोपून पालखी अंगावरून नेण्याची’ प्रथा कायमस्वरूपी बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय भिगवण पोलीस प्रशासन आणि यात्रा कमिटीने घेतला होता. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होत यात्रा कोणत्याही अनुचित प्रकाराविना यशस्वीरीत्या संपन्न झाली.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांची नियोजन बैठक पार पडली होती. या बैठकीत पालखी, ढोल आणि सासनकाठ्या मंदिरात प्रवेश करताना प्रवेशद्वाराजवळ जमिनीवर झोपून पालखी अंगावरून नेण्याच्या प्रथेमुळे होणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन ही प्रथा बंद करण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला होता.
यात्रेदरम्यान या निर्णयाचे सर्व भाविक आणि ग्रामस्थांनी काटेकोरपणे पालन केले. मंदिर प्रवेशद्वाराजवळ कोणतीही अनावश्यक गर्दी किंवा धोकादायक प्रकार न होता, पालखी आणि सासनकाठ्यांचे स्वागत अत्यंत शिस्तीत पार पडले. “श्रद्धा जपताना स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नये,” या पोलीस प्रशासन व यात्रा कमिटीच्या आवाहनाला भाविकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
यात्रा यशस्वी करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या नियोजनात बिट अंमलदार सचिन भस्मे, पोलीस पाटील तुषार झेंडे, तंटामुक्त अध्यक्ष साळुंखे, मोहिते, सरपंच राजेंद्र राऊत उपसरपंच रमेश चांदगुडे, आण्णा चांदगुडे, संदिप चांदगुडे यांच्यासह यात्रा कमिटीचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि स्वयंसेवकांनी मोलाचे सहकार्य केले. सुरक्षित आणि शांततामय वातावरणात यात्रा पार पडल्याने सर्वच स्तरांतून समाधान व्यक्त केले जात आहे.


















