भिगवण वार्ताहर. दि. 26
पुणे सोलापूर महामार्गांवर डाळज गावाच्या हद्दीत पुणे कडे जाणाऱ्या लेन वर पंक्चर झालेल्या आयशर टेम्पोला पाठीमागून इको गाडीने दिलेल्या धडकी मुळे झालेल्या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एका दोन वर्ष्याच्या चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला तर 10 महिन्याची चिमुकली जखमी झाली इतर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना 5 वाजण्याच्या सुमारास घडली.
या अपघातात आदिती अमर हातेकर वय 25 वर्षे राहणार सांगोला, सोलापूर, सखुबाई ईश्वर गेजगे, वय 60 वर्ष, राहणार सांगोला, सोलापूर,जय अमर हातेकर वय दोन वर्ष. राहणार सांगोला सोलापूर.(मयत) असे एकूण तीन जण मयत झालेले आहेत.तर इको गाडी वरील चालक कबीरदास ईश्वर गेजगे वय 50 वर्षे राहणार पाटस हे गंभीर जखमी झालेले आहेत.स्वाती कबीरदास गेजगे वय 34 वर्ष राहणार पाटस व समृद्धी कबीरदास गेजगे वय दहा महिने राहणार पाटस हे किरकोळ जखमी झाले आहेत.
सदर अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम चालू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद महांगडे यांनी दिली.
सदर अपघात धोकेदायक पद्धतीने उभा असलेल्या आयषर गाडी नंबर MH13 CU 5163 मुळे घडला असल्याची माहिती मिळत आहे. सदर आयषर पंचर झाल्यामुळे धोकेदायक पद्धतीने उभा होता त्याला पाठीमागून येणारी मारुती सुझुकी कंपनीची इको गाडी नंबर MH12 XE 8816 या गाडीची जोरदार धडक बसली यामुळे हा भयंकर अपघात घडला. या अपघातात इको गाडीचा अक्षरशः चुराडा झाला आहे.
महाराष्ट्र राज्यात रस्ते अपघातात होत असलेल्या मृत्यूवर अधिवेशनात चर्चा सुरु असतानाच हा गंभीर अपघात घडल्यामुळे नागरिकांच्या जीवाचे महामार्ग प्रशासनाला गांभीर्य आहे काय ? असा सवाल उपस्थित होतो.
या अपघातात एका चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला तर त्याच्या साठी घेतलेली खेळण्यातली सायकल अपघाती आयषर समोर पडल्याचे हृदय पिळवटून टाकणारे चित्र पाहवयास मिळाले.
पुणे सोलापूर महामार्गांवर धोकेदायक पद्धतीने उभ्या केलेल्या वाहनाने अनेक निष्पाप नागरिकांचे जीव जात असून याकडे हायवे प्रशासन कोणतीही ठोस उपाययोजना करताना दिसून येत नाही. मुख्य महामार्गांवर अवैध पार्किंग, सेवा रस्त्यावरील व्यावसायिक अतिक्रमन प्रवासी नागरिकांना धोक्याचे ठरत असून प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्यामुळे असे गंभीर अपघात घडत असल्याचे दिसून येत आहे.

















