Wednesday, October 7, 2026
Home Blog Page 27

भिगवण ग्रामपंचायत निवडणुकीत वाढली चुरस ;

0

सत्ताधारी राष्ट्रवादी पुरस्कृत भैरवनाथ ग्रामविकास पॅनल विरोधात स्वर्गवासी रमेश बापू जाधव प्रेरित सर्वपक्षीय श्रीनाथ ग्राम विकास पॅनल

भिगवण वार्ताहर दि.२६
इंदापूर तालुक्यात राजकीय राजधानी समजल्या जाणाऱ्या भिगवण ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत भैरवनाथ ग्रामविकास पॅनल च्या विरोधात सर्वपक्षीय श्रीनाथ ग्रामविकास पॅनल यांच्यात सरळ सरळ लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत. तर अपक्ष उमेदवारांना वळती वर आनण्यासाठी दोन्ही पार्ट्यांना मोठी कसरत करावी लागणार हेही निश्चित झाले आहे.
भिगवण गावावर पंचवीस वर्षापासून स्व.रमेशबापू जाधव यांची एक हाती सत्ता होती. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीने सर्व विरोधकांना एकत्र करीत ‘ ‘एक बदल घडवा सर्व बदल घडतील’ अशी हात देत सत्ता काबीज केली होती. सत्ता मिळाल्यानंतर सर्व सदस्यांना सरपंच उपसरपंच पद मिळावे यासाठी राष्ट्रवादीने पद बदलीचा कार्यक्रम राबवला. मात्र विरोधकांनी या पद बदलाला संगीत खुर्ची उपमा देत टीकेची झोड उठवली. आणि विकास कामात सदस्य मंडळी करीत असलेल्या ठेकेदारी बाबत टार्गेट केले.
या दोन्ही पार्ट्या करीत असलेल्या आरोप-प्रत्यारोप यांच्यात दिवसेंदिवस रंगत वाढत असून निवडणुकीच्या दिवसापर्यंत आणखीन काय आरोप केले जातात याकडे सर्वसामान्य मतदारांचे लक्ष लागून आहे .तर सत्ताधारी पक्ष हा आपण केलेल्या विकास कामावर ठाम असून मतदार हा विकासकामांना नक्की मत देईन असा दावा करीत आहे.
तसेच भाजप हा पक्ष लपवण्यासाठीच विरोधक सर्वपक्षीय पॅनल असल्याचा आव आणत असल्याचे सत्ताधारी पॅनल प्रमुख अँड .महेश देवकाते यांनी म्हटले आहे.
श्रीनाथ ग्रामविकास पॅनलचे पराग जाधव भिगवन गावातील ग्रामस्थांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आपला पॅनल निधी उपलब्ध करणार असल्याचे सांगत आहेत.
…….. *दोन्ही पार्ट्या विकासाच्या नावाने मत मागत असले तरी वाढत्या अतिक्रमणामुळे भिगवण गावचा कोंडलेला श्वास कोण मोकळा करणार ? याकडे मतदार राजा डोळे लावून बसलेेला आहे*

शहरातील रहिवासी भागातच सुरू होता चक्क कुंटणखाना

0

भिगवन पोलीसांनी छापा टाकत केलेल्या कारवाईत एका तरुणीसह महिलेची केली सुटका .

भिगवण प्रतिनिधी. दि.२५ भिगवण शहरातील गजबजलेल्या रहिवाशी परिसरात अवैधपणे चालवल्या जाणाऱ्या कुंटणखाण्यावर भिगवन पोलिसांनी छापा टाकीत दोन पीडित महिलांची सुटका केली. यावेळी पोलिसांनी दोन आरोपींना अटक करत रोख रकमेसह २८ हजार ५०० रुपयांचा जप्त केला.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भिगवन पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांना गोपनीय सूत्राकडून पुणे-सोलापूर महामार्गाच्या शेजारी असणाऱ्या रहिवासी इमारतीमध्ये अवैधपणे वेश्याव्यवसाय चालू असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे माने यांनी पोलिसांच्या एका पथकाची नियुक्ती करत या ठिकाणी तातडीने छापा टाकला. यावेळी आरोपी मिनीनाथ रमेश गायकवाड वय २८ राहणार मदनवाडी मुळ. भगतवाडी तालुका करमाळा ,रोहिदास गंगाराम दराडे वय २९ राहणार अकोले हे स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी २० वर्षाची तरुणी आणि ४० वर्षाची महिला यांच्याकडून अवैधपणे कुंटणखाना चालवीत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी पोलिसांनी दोन महिलांची सुटका करत दोन्ही आरोपींना अटक केली यावेळी आरोपी वापरत असलेले मोबाईल आणि रोख रक्कम मिळून २८ हजार ५०० रुपयांचा ऐवज जप्त केला.

सदर कारवाई पुणे ग्रामीण अधीक्षक अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधिकारी मिलिंद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्यासह पोलीस हवालदार दत्तात्रय खुटाळे, नाना वीर, इंकलाब पठाण ,महिला पोलीस नाईक सारिका जाधव या पथकाने केली.

पुणे-सोलापूर महामार्गावरील गजबजलेल्या रहिवासी भागात सुरू असलेल्या या व्यवसायाची माहिती या परिसरातील नागरिकांना नव्हती हीच मोठी आश्चर्याची गोष्ट आहे.

तर हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन असताना याठिकाणी अवैध व्यवसाय चालवणाऱ्या आरोपींची मानसिकता नेमकी काय? याचा उलगडा होत नाही.

सातवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाने गळफास घेऊन केली आत्महत्या

0

पिंपळे गावातील हृदयद्रावक घटना

भिगवण वार्ताहर दि. २४

घरच्यांना न सांगता दुसऱ्याच्या वाहनातून परगावी फिरण्यास गेल्याच्या कारणावरून आई-वडिल रागावल्याचा राग मनात धरत पिंपळे ( ता .इंदापूर) गावातील १३ वर्षाच्या अल्पवयीन बालकाने गळफास घेतलेची घटना घडली. एकुलत्या एका मुलाने केलेल्या आत्महत्येमुळे पिंपळे गावावर शोककळा पसरली असल्याचे दिसून आले
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पिंपळे गावातील कृष्णा भगवान चोरमले वय वर्षे 13 असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. सातवी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या कृष्णाने घरातील आईच्या साडीने कॉटवर उभे राहत घरातील लोखंडी अँगल ला गळफास घेतल्याची घटना घडली. याबद्दल माहिती घेत असताना कृष्णा बुधवारी गावातील ओळखीच्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर बसून इंदापूर ला गेला होता याची माहिती कोणालाही नव्हती .त्यामुळे घरातल्यांनी त्याला चिडून याची विचारणा केली याचाच राग मनात धरून कृष्णा याने आई वडील कामाला गेल्यानंतर हे कृत्य केले.

कृष्णा हा चोरमले कुटुंबासाठी एकुलता एक मुलगा आणि त्याच्या पाठीशी एक बहीण असा परिवार आहे कृष्णाची आई शेतीच्या कामासाठी बाहेर गेली होती तर वडील ग्रामपंचायत पाणीपुरवठा योजनेच्या कामासाठी बाहेर गेले होते काल झालेला प्रकार मनात ठेवूनच कृष्णा यांनी हे कृत्य केले असल्याची चर्चा गावकरी करीत आहेत.
याबाबत अमित सदाशिव चोरमले यांनी भिगवण पोलीस स्टेशनला खबर दिली आहे. भिगवण पोलीस यांनी अकस्मात मृत्यू अशी नोंद करत शवविच्छेदनासाठी मृतदेह इंदापूरला पाठवला आहे.घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे शिक्षण घेत असताना गावातील पद्मावती मंदिरात ढोल वाजवून पैसे कमावणारा कृष्णा अचानक गेल्याने पिंपळे गावकरी हळहळ व्यक्त करीत होते.
“कोरोणामुळे बंद असणाऱ्या शाळा जर चालू असत्या तर आजचा प्रकार कदाचित घडला नसता. हा प्रकार अत्यंत वेदनादायी असून एक हुशार आणि चुणचुणीत मुलगा अचानक निघून गेल्याची” खंत त्याला शिकवणारे शिक्षक यांनी व्यक्त केली.

विरोधकांच्या संगीतखुर्चीला ; सत्ताधाऱ्यांचा खो खो

0

भिगवन वार्ताहर.२२
इंदापूर तालुक्यात महत्वाची मानली जाणाऱ्या भिगवण ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. विरोधकांच्या संगीत खुर्चीच्या टिकेला त्यांनी केलेल्या खोखो ने प्रत्युत्तर देत सत्ताधाऱ्यांनी आपला मनसुबा जाहीर केला.सोनाई गार्डन येथे राष्ट्रवादी पुरस्कृत भैरवनाथ ग्राम विकास पॅनल यांच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेत आपली भूमिका सत्ताधारी यांनी आपली बाजू मांडली.
यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे सचिन बोगावत यांनी भैरवनाथ ग्राम विकास पॅनल माध्यमातून गेल्या पाच वर्षात केलेल्या कामाची इतंभूत माहिती दिली.तसेच निवडून आल्यावर राहिलेली कामे प्रामुख्याने मार्गी लावणार असल्याचे सांगितले.
यावेळी पॅनल प्रमुख अँड .महेश देवकाते यांनी आपला मोर्चा विरोधकांनी केलेल्या टीकेकडे नेत राष्ट्रवादी पक्षाने सत्तेचे विकेंद्री करणं करीत सर्वांना सरपंच आणि उपसरपंच पद देण्यात आल्याचे सांगितले. तर बदल करत असताना विकास कामांना कधीच खीळ बसली नसल्याचे सांगितले. गेल्या पाच वर्षात सत्ताधारी पॅनलने कामाची पडताळणी करूनच सुज्ञ मतदार राष्ट्रवादी पक्ष सोबत राहील असे मनोगत व्यक्त केले.

भिगवन गावच्या विकासासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी कार्यकारिणीने मोठा निधी मिळवला आहे गावातील रस्ते तसेच बंदिस्त गटारीचे काम मोठ्या प्रमाणावर पूर्ण केले आहेत. गावातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची योजना राष्ट्रीय पेयजल योजनेतून राबवली जाणार असल्याचे सांगितले .तसेच विरोधकांकडे कोणताही विकासाचा मुद्दा नसल्यामुळे त्यांनी नागरिकांचे लक्ष संगीत खुर्ची या संज्ञा कडे वळवित आल्याचे सांगितले .तर राष्ट्रवादी पक्ष सर्व जाती जमाती आणि सरपंचपद खुले करून दिले आहेत .
आजपर्यंत विरोधकांनी ठोकशाही आणि हुकूमशाहीचा वापर करीत सत्ता आपल्या हातात ठेवत शब्द दिलेल्या सदस्यांना खो-खोच्या खेळाची आठवण करून दिली आहे.
तसेच विरोधकांनी तयार केलेला सर्वपक्षीय पॅनल याची संज्ञा पटवून द्यावे असे आवाहन केले. तर फक्त भाजप पक्ष लपवण्यासाठीच ही नौटंकी केली जात असल्याचा आरोप देवकाते यांनी केला
यावेळी शंकरराव गायकवाड , विक्रम शेलार , सचिन खडके, महेश शेंडगे यांनी आपले विचार मांडले. या पत्रकार परिषदेला भिगवण शहर ,भिगवन स्टेशन येथील अनेक तरुण तसेच ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. या पत्रकार परिषदेचे आयोजन अजिंक्य माडगे यांनी केले तर आभार मानण्याचे काम प्रदीप वाकसे यांनी केले.

सदोष वस्तू उत्पादन आणि विक्री आता पडणार महागात

0

ग्राहक संरक्षण कायदा २०१९ देशभरात लागू !

भिगवण वार्ताहर दि.१८
ग्राहक संरक्षण कायदा २०१९ हा २० जुलै २०२० पासून संपूर्ण देशात लागू झाला असून या नवीन कायद्यामध्ये दुकानदाराने, व्यापाऱ्याने ग्राहकाला सदोष वस्तू अथवा उत्पादन विक्री केल्यास त्याबाबत जिल्हा ग्राहक आयोगात तक्रार दाखल करून न्याय मिळवून दिला जाणार असल्याचे तुषार झेंडे पाटील सदस्य राज्य ग्राहक संरक्षण परिषद यांनी सांगितले.याबाबत सर्वसामान्य ग्राहकांची सदोष वस्तू आणि उत्पादन यातील फसवणूक याविषयी झेंडे पाटील यांनी माहिती दिली.

ग्राहक संरक्षण कायद्यात व्यवसाय करतेवेळी ग्राहकाला दोषमुक्त वस्तू अथवा उत्पादन विक्री केल्यास त्याबाबत जिल्हा ग्राहक आयोगात दाद मागता येऊ शकते .सदर वस्तू सदोष आढळल्यास ग्राहक आयोग वस्तू नवीन देण्याचे आदेश देईल. वस्तूचे उत्पन्नात दोषयुक्त असेल आणि अशाच प्रकारच्या अनेक प्रकरणे असतील तर आयोग सदर वस्तू विक्री केलेल्या सर्व ग्राहकांना वस्तू बदलून देण्याचे आदेश देईल. वस्तूचे उत्पादनात दोष आढळल्यास उत्पादक कंपनीला सदोष उत्पादन बंद करण्याचे आदेश देणार असल्याचा कायदा असेल.

” ग्राहकाला जिल्हा आयोगात पाच लाखापर्यंत दावा करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क लागणार नाही तसेच जिल्हा आयोगाला याबाबत नव्वद दिवसात निकाल देणे कायद्याने बंधनकारक आहे ” अशी माहिती झेंडेपाटील यांनी दिली. “यामुळे ग्राहकांची यातून फसवणूक टाळली जाणार असून दोषयुक्त उत्पादनाला आळा बसणार आहे ” असे झेंडे पाटील यांनी सांगितले.

आधी दर्शन तळीरामांचे नंतर राम दुत हनुमानाचे

0

भिगवण प्रतिनिधी …. दि.१६

भिगवणमध्ये तळीरामांचा उच्छाद ; देव दर्शन आधी तळीरामांचे दर्शन असे म्हणण्याची वेळ भिगवण कर ग्रामस्थांवर आली आहे.

भिगवण मधील प्रभाग क्रं.२ मध्ये भिगवणकरांचे ग्रामदैवत असलेले भैरवनाथ मंदिर व हनुमान मंदिर आहेत. याठिकाणी भिगवण मधील रहिवाशी सकाळी व संध्याकाळी दर्शनासाठी नित्य नियमाने येत असतात. परंतु या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून तळीरामांनी उच्छाद मांडलेला दिसून येत आहे. त्यामुळे देवदर्शन आधी तळीरामांचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. त्यामुळे भिगवण पोलिसांनी या तळीरामांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

भिगवण मधील प्रभाग क्रं २ मध्ये श्री भैरवनाथ मंदिर, हनुमान मंदिर व त्या लगतच शाळा व महाविद्यालय आहेत. याठिकाणी देवदर्शनासाठी अनेक भिगवण मधील ग्रामस्थ येत असतात. तसेच, शाळा व महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या देखील फार मोठी आहे. याठिकाणी नेहमीच तळीरामांचा वावर मोठ्या प्रमाणात असतो.

परंतु गेल्या काही दिवसापसून सकाळपासूनच हे तळीराम गर्दी करून या ठिकाणी अश्लील प्रकारची शिवीगाळ करत आहेत. त्यामुळे याठिकाणी देवदर्शनासाठी येणाऱ्या ग्रामस्थांना व शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा त्रास होत आहे.

त्यामुळे पोलिसांनी या उच्छाद मांडलेल्या तळीरामांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

डिकसळ येथील व्यायामशाळेच्या बांधकामासाठी सामाजिक कार्यकर्ते विकास काळे यांचा उपोषणाचा इशारा

0

डिकसळ रिपोर्टर . दि.१६
डिकसळ ता.इंदापुर येथे पुणे जिल्हा परिषद यांचेकडुन मा.बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण भैय्या माने यांच्या विशेष प्रयत्नातुन प्रभाग क्र. 1 मध्ये मुलांना व्यायाम करता यावा या उद्देशाने ५ लाखाचा निधी मंजुर करण्यात आला होता. सदर व्यायाम शाळेसाठी ग्रामपंचायतीकडुन जागा निश्चित करून भुमीपुजनाचा कार्यक्रम संपन्न झाला होता. परंतु आजपर्यंत बांधकाम चालु झाले नाही. याबाबत सामाजिक कार्यकर्ते विकास नारायण काळे यांनी वारंवार ग्रामपंचायला विचारणा केली आसता सदर जागेवर काही लोकांनी अतिक्रमण केले असुन ते काढले की काम चालु करू असे सांगितले जात होते.परंतु आजपर्यंत अतिक्रमण काढले नाही.

संबंधित काम सुरू करण्यास विलंब झाल्यास आलेला निधी परत जाऊ शकतो. म्हणून येथील कायमस्वरूपी रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते विकास काळे यांनी आठ दिवसांत अतिक्रमण काढुन बांधकाम सुरू न केल्यास योग्य त्या कार्यलयांशी योग्य ती परवानगी घेऊन ग्रामपंचायत कार्यलयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा लेखी पत्रानुसार ग्रामपंचायतला दिला असुन यांची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायतची असेल असे सदर लेखी पत्रात विकास काळे यांनी म्हटले आहे.
याबाबत ग्रामसेवक डी.बी.परदेशी यांच्याशी संपर्क साधला आसता अतिक्रमण केलेल्या लोकांना ग्रामपंचायत यांनी नोटीसा दिल्या असुन ग्रामपंचायत सदस्य यांची ताबडतोब मिंटीग घेऊन योग्य निर्णय घेतला जाईल असे सांगितले

भिगवण येथे स्व. रमेश बापू जाधव प्रेरित श्रीनाथ ग्राम विकास सर्वपक्षीय आघाडीची घोषणा

0

भिगवण वार्ताहर . दि.१६

इंदापूर तालुक्याची राजकीय राजधानी समजल्या जाणाऱ्या भिगवण ग्रामपंचायत निवडनुकीचा बिगुल वाजला आहे. याच अनुषगाने (दि. १५) रोजी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात ‘स्वर्गीय रमेश बापू जाधव’ प्रेरित ‘श्रीनाथ ग्राम विकास सर्वपक्षीय पॅनल’ ची घोषणा ज्येष्ठ नेते अशोकराव शिंदे यांनी केली.

यावेळी बोलताना अशोकराव शिंदे यांनी सांगितले की, सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाच वर्षांपूर्वी ‘एक बदल घडवा सगळे बदल घडतील’. असे स्वप्न दाखवून भिगवण ग्रामपंचायतीची सत्ता काबीज केली. परंतु, या पाच वर्षांमध्ये भिगवणच्या विकासाच्या दृष्टीने कोणतेही बदल झालेले भिगवणकरांना दिसून आलेले नाहीत. परंतु सत्तेची संगीत खुर्ची करण्याचा सगळ्यात मोठा बदल सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केला आहे. सरपंच व उपसरपंच पदाची अवहेलना करण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी पाच वर्षांमध्ये केले. जी काही विकास कामे झाली ती देखील निकृष्ट दर्जाची करण्यात आली. तर नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळण्याचा अधिकार असताना याबाबत कोणतेही काम न केल्यामुळे भिगवन कर नागरिकांना खिशाला चाट बसवून विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.तर गोरगरिबासाठी उजनीच्या काळया पाण्याची शिक्षा भोगावी लागत आहे. त्यामुळें आमचा पॅनल निवडून आल्यास सर्वांसाठी शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी योजना राबवली जाणार असल्याचे घोषणा करताना सांगितले.

श्रीनाथ ग्रामविकास पॅनल हे सर्व पक्षीय असून, यामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन, भिगवणच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार आहे. विकास कामासाठी पक्षीय मतभेद बाजूला ठेवून ग्रामपंचायतीचा कारभार करणार आहोत. तसेच गावांमध्ये सामाजिक सलोखा राखून गावचे गाव पण जपण्यासाठी प्रयत्न करू व लोकाभिमुख, स्थिर कारभार करण्यावर भर देऊ. सामाजिक कामांमध्ये रस असणाऱ्या शांत व संयमी उमेदवारांना संधी देऊन स्वच्छ व पारदर्शक कारभार करण्यावर भर देणार असल्याचे देखील यावेळी बोलताना सांगितले.

निवडून आलेले सदस्य ग्रामंचायत विकास कामात ठेकेदार म्हणून समोर येणार नाहीत
सरपंच उपसरपंच यांच्या पदाची संगीत खुर्ची करून पदाचा अवमान केला जाणार नाही
सर्वधर्मीय सदस्यांना विचारात घेवून शांत संयमी उमेदवार निवडले जातील.

या पत्रकार परिषदेसाठी पंचायत समिती उपसभापती संजय देहाडे ,संजय रायसोनी ,पराग जाधव , तुषार क्षीरसागर ,खंडू राव गाडे ,कपिल भाकरे तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते व ज्येष्ठ नेते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक अजित क्षीरसागर यांनी केले. तर आभार गुलामभाई शेख यांनी मानले.

अतिक्रमनावर कारवाईस ग्रामपंचायतीची दिरंगाई, तक्रारवाडी ग्रामंचायत कार्यालया समोर राजेंद्र गोडसे यांचे उपोषण

0

भिगवन वार्ताहर. दि . ७

तक्रारवाडी (ता. इंदापूर) या गावात अतिक्रमणाचा कहर वाढला असून अतिक्रमण करणाऱ्यांनी आता खाजगी मिळकतदारांचे येण्या-जाण्याच्या रस्त्यावर अतिक्रमण केले असून याकडे ग्रामपंचायत प्रशासन कोणतीही कारवाई करत नाही त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांवर आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे.

उजनी धरणाच्या निर्मिती वेळी पुनर्वसित झालेल्या तक्रारवाडी गावाला चारही बाजूने अतिक्रमणाचा विळखा पडला असून दिवसेंदिवस या अतिक्रमणामध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. आता गावातील मिळकत धारकाला आपल्या घराच्या जागेवर जाण्यासाठी असणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमण झाल्याने राजेंद्र गोडसे या नागरिकाला चक्क आमरण उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे. गावातील पुढारी आपल्या राजकारनाची पोळी भाजली जावी यासाठी अतिक्रमणा खतपाणी घालत असल्याचा गोडसे यांचा आरोप आहे.तर ग्रामंचायत प्रशासक आणि ग्रामसेवक अतिक्रमण करणाऱ्या ना पाठबळ देत असल्याचे म्हणणे आहे.

तक्रारवाडी उपोषणाच्या प्रकरणी घटना स्थळी भेट देताना प्रशासक दिलीप जगताप आणि ग्रामसेवक बोरावके पोलीस पाटील अमर धुमाळ

तक्रारवाडी ग्रामपंचायतीसमोर गोडसे यांनी उपोषण सुरू केले असून जोपर्यंत आपल्या जागे समोरील अतिक्रमण काढले जात नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचे यांचे म्हणणे आहे. गोडसे यांच्या म्हणण्यानुसार तक्रारवाडी गावातील शासकीय जागेत शरद संपतराव वाघ , शशिकांत संपतराव वाघ या दोघांनी पक्के बांधकाम केले असून शासकीय जागेचा अनधिकृतपणे ताबा घेतला आहे. तर युवराज उत्तम काळगे, विकास संजय वाघ यांनी शासकीय जागेत अतिक्रमण करून जनावरांचा गोठा व त्याचे शेणखत टाकून ताबा घेतलेला आहे त्यामुळे गोडसे यांना त्यांच्या जागेवर जाण्यासाठी प्रतिबंध होत असून सदर इसम दहशत निर्माण करीत आहेत तसेच दमदाटी आणि शिवीगाळ करण्याचा प्रकार केला जात आहे .

आरोग्य सेविका सिंड्रेला चोपडे , वर्षा कदम ,उषा दिवेकर उपोषण कर्त्याची आरोग्य तपासणी करताना .

याबाबत गोडसे यांनी उपविभागीय कार्यालय तहसीलदार कार्यालय तसेच गट विकास अधिकारी भिगवण पोलिस स्टेशन यांना याबाबत निवेदन दिले असून ग्रामपंचायत तक्रारवाडी कार्यालया समोर उपोषण सुरू केले आहे.

तक्रारवाडी गावात सध्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून पुढारी आपल्या स्वार्थासाठी नागरिकात फूट पाडण्याचे काम करीत असल्याचे दिसून येत आहे .दिवसा अतिक्रमण करणार्‍यांना साथ देताना रात्री ज्यांना अतिक्रमणाच्या त्रास होत आहे अशांना उपोषणाचे मार्ग सुचविले जात आहेत. त्यामुळे गावातील नागरिकांनी होण्याची गरज निर्माण झाली असून अशा पुढाऱ्यांना आपली जागा दाखवण्याची वेळआलेली आहे.

जिल्हा पालक सचिवांवर हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करून शिस्तभंगाची कारवाई करण्याची तुषार झेंडेपाटील यांची मागणी

0

भिगवण वार्ताहर.दि.४

जिल्हा पालक सचिव (मंत्रालयीन प्रशासकीय विभागाचे प्रमुख )शासन निर्णयाचे परिपत्रकाचे उलंघन करून लोकशाहीची चेष्टा करीत असल्याने त्यांचेवर विधान सभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य तुषार झेंडेपाटील यांनी केली.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,मुख्य सचिव संजय कुमार ,विधानसभा अध्यक्ष नाना पटोले तसेच विरोधी पक्षनेता यांना निवेदन पाठवून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

राज्यामध्ये जिल्हा स्तरावरील शासकीय कार्यालयांच्या शासन स्तरावर (मंत्रालय)प्रलंबित बाबींची तातडीने सोडवणूक व्हावी तसेच शासनाने धोरणात्मक निर्णय प्रशासकीय सुधारणा आणि विविध लोकोपयोगी व कल्याणकारी योजनांची व लोकशाही दिनाची प्रभावी पणे अंमलबजावणी करण्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी पालक सचिव यांची सन २००० पासून नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत असे असताना पालक सचिवांना नेमून दिलेल्या जिल्ह्यात वर्षातून चार दौरे करणे आवश्यक असताना एकही दौरा केलेला नाही.

आपत्कालीन परिस्थितीत पालक सचिवांनी दौरा करणे अत्यावश्यक असताना राज्यातील एकाही पालक सचिवाने दौरा केलेला नाही.जिल्हा पालक सचिवानी त्यांच्या अधिपत्याखालील विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाचे व त्याव्यतिरीक्त अन्य एका विभागाच्या कार्यालयाचे निरीक्षण करणे आवश्यक असताना एकही निरीक्षण केले नाही.

पालक सचिवानी एक ग्रामसेवक ,तलाठी ,भूमिलेख कार्यालयाचे निरीक्षण करणे आवश्यक असताना राज्यातील एकाही पालक सचिवाने निरीक्षण करून अहवाल दिलेला नाही..जिल्ह्यातील आरोग्य विषयक बाबींचा आढावा घेवून प्रतिबंध उपाय योजना सुचविणे आवश्यक असताना याबाबतही कोणतेही कामकाज करण्यात आले नाही तसेच एकूण दिलेल्या जबाबदारी चे पालन केले नाही.तसेच लोकशाही दिनाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठीच पालक सचिवांची संकल्पना अस्तित्वात येवून नेमणुका करण्यात आलेल्या असताना नियुक्त अधिकारी याचे पालन करत नसल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे एकप्रकारे लोकशाहीची चेष्टाच हे अधिकारी करत असल्याचे झेंडेपाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.याबाबत झेंडेपाटील यांनी मुख्यमंत्री ,विधानसभा सभा अध्यक्ष ,विरोधी पक्षनेता यांना यांना या निवेदनाची प्रत ईमेल करून हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करून शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.