Wednesday, October 7, 2026
Home Blog Page 24

दारूबंदी साठी महिलांचा एल्गार ;कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

0

भिगवण वार्ताहर.दि.३

इंदापूर तालुक्यातील पिंपळे गावातील महिलांनी एकत्र येत दारूबंदी साठी ग्रामसभा घेवून दारूबंदी करण्याचा ठराव घेतला.प्रसिद्ध देवस्थान पद्मावती मंदिर परिसरात असणाऱ्या ढाब्यांवर हि दारूविक्री सुरु असून याचा भाविक आणि ग्रामस्थ यांना मनस्ताप सहन करावा लागत असून तातडीने दारूबंदी झाली नाही तर आमरण उपोषणाचा इशारा महिलावर्गा कडून देण्यात आला आहे.

याबाबत ग्रामसभेचा ठराव निवेदन सोबत देण्यात आला असून याची प्रत पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण ,उपविभागीय अधिकारी बारामती ,प्रांताधिकारी कार्यालय आणि भिगवण पोलीस स्टेशन येथे देण्यात आली आहे.पिंपळे ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या ढाब्यांवर हि अनधिकृत दारू विकली जात असून यामुळे प्रसिद्ध देवस्थान पद्मावतीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना तसेच ग्रामास्थाना याचा त्रास होत असल्याचे निवेदनात म्हणण्यात आले आहे.याबाबत पिंपळे गावात महिलांनी महिलांची ग्रामसभा ,तसेच जनरल ग्रामसभेचा ठराव घेत दारूबंदीची मागणी केली आहे.दारू विक्री करणाऱ्या ढाब्यामुळे अनेक शेतमजूर आणि गोरगरीब नागरिकांचे संसार उध्वस्त झाले असून हि प्रशासनाने यावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे.तसेच आठ दिवसाच्या आत प्रशासनाने दारूविक्री करणाऱ्या व्यावसायिकावर कारवाई न केल्यास १२ एप्रिल पासून ग्रामस्थ आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत पिंपळे गावचे सरपंच कुंडलिक भिसे यांनी सदर दारूबंदी साठी महिला वर्ग अतिशय आक्रमक झाल्या असल्याचे सांगितले.तसेच याबाबत महिलांनी ग्रामसभा घेवून दारूबंदीचा ठराव संमत केला असल्याचे सांगितले.तर राज्यातील अनेक जिल्ह्यातील भाविक हे पद्मावती देवीच्या दर्शनासाठी येत असतात त्यामुळे या दारूविक्री मुळे अनेक चुकीचे प्रकार घडत असताना यावर कारवाई होत नसल्यामुळे खंत व्यक्त केली.

याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांनी निवेदन पोहोचल्याचे सांगत दारू विक्री करणार्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.तर याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती देण्यात आली असून त्यांच्याकडूनही कारवाई अपेक्षित असल्याचे सांगितले.

कोरोनाचा उद्रेक टाळण्यासाठी सतर्क राहण्याचे ;पंचायत समिती उपसभापती चे आवाहन

0

भिगवण प्रतिनिधी …. दिं.१

कोरोनाची दुसरी लाट सध्या राज्यात सुरु झाली असून इंदापूर तालूक्यामध्येही मोठ्या प्रमाणात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर तालूक्यातील सर्व नागरिकांनी सतर्क राहून अधिक काळजी घेण्याचे आवाहन इंदापूर पंचायत समीतीचे उपसभापती संजय देहाडे यांनी केले.

तालुक्यांतील ज्याठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्या गावात सॅनिटायझेशन व इतर उपाय योजना राबविण्यात येत आहेत. तसेच ज्या कुटुंबात कोरोना रुग्ण सापडला आहे, अशा कुटुंबातील इतर सदस्यांच्याही कोरोना तपासण्या केल्या जात आहेत.ग्रामपंचायत माध्यमातून गावातील मोक्याच्या जागा, वर्दळीची ठिकाणे, बाजारापेठा, बस स्थानक आदी ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात येत असल्याचे यावेळी देहाडे यांनी सांगितले.

इंदापूर तालूक्यातील आरोग्य विभागातील कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत असून नागरिकांच्या प्राथमिक तपासण्या करत आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, तोंडाला मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा व सार्वजनिक ठिकाणी उघड्यावरती थुंकू नये असे आवाहन देहाडे यांनी नागरिकांना केले.

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून कोरोना लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. लसीकरण हे सुरक्षित असल्याने त्याविषयी गैरसमज निर्माण न करता तालूक्यातील नागरिकांनी या लसीकरणास प्रोत्साहन द्यावे. इंदापूर तालूक्यामधील कर्मचारी,अधिकारी , पंचायत समीती व ग्रामपंचायत सदस्य यांनी लसीकरण करुन घेतले आहे. कोणाला कोणताही त्रास झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनीही मनातील भीती बाजूला करुन लस टोचून घ्यावी असे आवाहन इंदापूर पंचायत समीतीचे उपसभापती संजय देहाडे यांनी केले.

भिगवण ग्रामपंचायतीचा महत्वाकांक्षी उपक्रम ;प्लॅस्टिकचा राक्षस जागीच ठेचनार

0

व्यापारी वर्ग आणि सामान्य जनतेतून निर्णयाचे स्वागत;

जनतेच्या सेवेतून वेगळे पण दाखविणार सरपंचाची भूमिका

“भिगवण प्रतिनिधी .३१

अलीकडच्या काळामध्ये प्लॅस्टिक ही मानवाला भेडसावणारी फार मोठी समस्या असल्यामुळे याच्यावर उपाय योजना करण्यासाठी शासन स्तरावरून विविध उपक्रम,विविध योजना राबविल्या जात आहेत,याचाच एक भाग म्हणून प्लास्टिक मुक्त गाव हा अनोखा उपक्रम ग्रामपंचायत भिगवण मार्फत राबविण्यात येणार असून एक एप्रिल पासून हा उपक्रम सुरू होत आहे.

या उपक्रमांतर्गत गावातील सर्व प्लास्टिक,यामध्ये प्लास्टिकच्या वस्तू, खेळणी, पिशव्या,बाटल्या,कचरा तसेच इतर साहित्य ग्रामपंचायत मार्फत खरेदी करण्यात येणार असून गाव प्लास्टिक मुक्त करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.हे प्लास्टिक साधारणत: ग्रामपंचायत कडून पाच ते दहा रुपये किलो या दराने खरेदी केले जाणार असून नागरिकांनी प्लास्टिकचा कचरा इतरत्र कुठेही न टाकता तो आपल्या घरामध्ये साठवून ठेवून ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महिन्यातून दोन वेळा जमा करायचा आहे.

भिगवण मध्ये मोठी बाजारपेठ असल्याने उद्योग,व्यवसाय मोठ्या प्रमाणावर असून प्लास्टिकच्या कचऱ्याने याठिकाणी उग्र रूप धारण केले असल्याकारणाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामुळे निश्चितच व्यापारी वर्गाला प्लास्टिक पासून होणारा त्रास कमी होणार आहे.ग्रामपंचायत सरपंच,उपसरपंच व सर्व सदस्य तसेच ग्रामसेवक यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविण्यात येणार असून नागरिकांनी प्लास्टिक, ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जमा करण्याचे आव्हान ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

यासंदर्भातील ठराव दिनांक 30 मार्च रोजी झालेल्या मासिक मिटिंग मध्ये करण्यात आला आहे. अशी माहिती सरपंच तानाजी वायसे यांनी दिली तर जनतेच्या कामातून आपले वेगळे पण दाखविणार असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.

जागतिक महिलादिना निमित्त पळसदेव येथे महिलांना दिले आत्मसंरक्षण धडे ;एस बी स्पोर्ट चा उपक्रम

0

पळसदेव वार्ताहर दि.१७
इंदापुर तालुका ज्युदो कराटे स्पोर्ट ॲकडमी व एस बी स्पोर्टस् पळसदेव यांच्या संयुक्त विद्यामानाने दिनांक १६ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महिलांन साठी सेल्फ डिफेन्स ( आत्मसंरक्षण) कार्यक्रम आयोजीत करण्यात आल होता.
या कार्यक्रमाचे उद्धाघाटक इंद्रायणी सुजित मोरे (सरपंच )व अध्यक्ष पुष्पलता राजेंद्र काळे (उपसरपंच ) व विषेश उपस्थिती डाॕ. रणजीत जाधवर वैद्यकीय अधिकारी डाॕ.सुषमा जलमकर समुदाय आरोग्य अधिकारी तेजश्री दत्तात्रय व्यवहारे (आंतराष्ट्रीय खेळाडु) तसेच कविता कांबळे आरोग्य सेवक,किशोरी बिडवे ,कैलास भोसले ग्रापं सदस्य,विद्या बनसुडे सचिव एस.बी स्पोर्टस् पळसदेव,कैलास होले (सर) वरील सर्व प्रमुख पाहुण्यांनी उपस्थिती दर्शवली तसेच सर्वांनी खेळाडुंनी आवडत्या क्षेत्रात मध्ये यश मिळवावे, अपयशाला खचुन न जाता जिद्दीने यश संपादन करावे याबद्दल मार्गदर्शन व पुढिल वाटचालिसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात खेळाडु कु.विशाखा भोसले, वर्षा बनसुडे,रचना बांडे,अनिषा गायकवाड,पुजा भोई, ओम हिंगमिरे,महेश माने, प्रणित काळे यांनी प्रत्यक्षिके सादर केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु.रूपेश भालेराव सर यांनी केले व आभार प्रदर्शन निलेश हगारे यांनी केले. तसेच वैष्णवी तेलंग व सायली राखुंडे यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे आयोजन एस बी स्पोर्टस् पळसदेव चे अध्यक्ष सागर बनसुडे यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी एस.बी स्पोर्टस् व इंदापुर तालुका ज्युदो कराटे स्पोर्ट ॲकडमी च्या सर्व खेळाडुंनी सहकार्य केले.

तक्रारवाडी गावाला अतिक्रमणाचा विळखा ;प्रशासन दाखविते एक दुसऱ्याकडे बोट

0

भिगवण वार्ताहर.दि.१६

तक्रारवाडी गावातील बखळ प्लाट आणि शासकीय मोकळ्या जागांवर अतिक्रमण होत असताना ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामसेवक मात्र पुनर्वसन विभागाची जबाबदारी असल्याचे सांगून डोळेझाक करत असल्याने अतिक्रमण करणार्यांना पाठबळ मिळत असल्याचे दिसून येत आहे.तर ग्रामपंचायत कार्यालयात अतिक्रमण नोंदवही नसल्याची माहिती ग्रामसेवक यांनी दिली आहे.

तक्रारवाडी हे गाव उजनी धरणाच्या वेळी पुनर्वसित झालेलं गाव आहे.पुनर्वसन वेळी टेकडीच्या पूर्वेला वसणारे गाव गावातील तत्कालीन पुढार्या मुळे टेकडीच्या पश्चिमेला बारामती अहमदनगर राज्यमार्गाच्या कडेला वसविण्यात आले. भिगवण बाजारपेठ आणि राज्यमार्ग यामुळे या गावाच्या तीनही बाजूला कमालीचे अतिक्रमण करण्यात आले.राजकीय हस्तक्षेप आणि मलई खाणारे अधिकारी यांच्या मुळे अतिक्रमणाचा महामेरू वाढत गेला.गावाच्या दक्षिण बाजूला वनविभागाची जागा असताना सुद्धा अतिक्रमण वाढत गेले.गावातील काही पुढारी आणि हप्ते घेवून अतिक्रमणाला खतपाणी घालणारे वनविभागाचे कर्मचारी यांच्या वरदहस्ताने रात्रीच्या अंधारात दगड गोटे टाकून रात्रीच्या अंधारात बाहेरच्या बाजूला पडदे उभारीत वनविभागाच्या जागा अतिक्रमणाच्या घशात घातल्या गेल्या.

आता बाहेरच्या जागा संपुष्टात आल्याने अतिक्रमण करणार्यांनी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या आणि बखळ जागांवर आपले लक्ष केंद्रित केले असल्याचे दिसून येत आहे.मात्र यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असणारी विद्यमान ग्रामपंचायत कार्यकारिणी मात्र हातावर हात देवून याकडे बघत आहे.याबाबत ग्रामसेवक यांना गावातील नागरिकाने अर्ज केला असता ग्रामसेवकाने गावातील मोकळे प्लाट पुनर्वसन विभागाच्या ताब्यात असल्याची माहिती दिली.आणि सरपंच यांनी आपण अतिक्रमण करणार्यांना फक्त नोटीस देवू शकतो याच्या पलीकडे काय करू शकतो असा सवाल केला.त्यामुळे अतिक्रमण करणारांचे मनोबल वाढत असून इमारत तयार झाल्यावर ती काढण्यासाठी अनेक कायदेशीर अडचणी निर्माण होतात.

याबाबत तक्रारवाडी गावचे सरपंच सतीश वाघ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गावातील शासकीय मोकळ्या आणि बकळ जागा पुनर्वसन विभागाच्या ताब्यात आहेत त्या ग्रामपंचायती कडे वर्ग करण्यात आल्या नाहीत.त्यामुळे ग्रामपंचायत कार्यकारिणी कडून अतिक्रमण करणार्याला नोटीस देण्या पेक्षा जास्तीची कारवाई करणे शक्य नसल्याचे सांगितले.तसेच याविषयी पुनर्वसन विभागाशी पत्रव्यवहार करण्यात आला असून त्याचा पाठपुरावा सुरु असल्याचे सांगितले.

भिगवण येथील स्मशानभूमीत आगळा वेगळा उपक्रम ; जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांनी वृक्षारोपण करीत साजरा केला महिला दिन

0

मतदारांनी विश्वास टाकून राजकीय स्थैर्य निर्माण केल्याबद्दल भिगवण मतदारांचे आभार : जि. प सदस्या अंकिता पाटील

भिगवण प्रतिनिधी दि.11

जागतिक महिला दिन आणि स्व.शंकरराव पाटील (भाऊ) यांच्या जयंतीनिमित्त येथील स्मशानभूमी मध्ये पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले व स्मशानभूमीची स्वच्छता करण्यात आली.यावेळी स्मशानभूमी येथे ७० झाडे, कब्रस्तान येथे ३० झाडे आणि भिगवण स्टेशन येथील स्मशानभूमी येथे ७० झाडे लावण्यात आली.

येथील स्मशानभूमी करता पेव्हर ब्लॉक आणि वॉल कंपाउंड तसेच वॉर्ड क्र.३ व ४ साठी पाण्याची टाकी बांधण्याकरिता निधीची मागणी अंकिता पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

स्व.शंकरराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालयामध्ये त्यांना अभिवादन करण्यात आले यावेळी बोलताना अंकिता पाटील यांनी निवडून आलेल्या नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सरपंच,उपसरपंच यांचे अभिनंदन केले व स्मशानभूमीसाठी पेव्हर ब्लॉक आणि वॉल कंपाऊंड तसेच पाण्याच्या टाकी साठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.तसेच जिजाऊ फेडरेशन च्या माध्यमातून महिला सबलीकरण,सक्षमीकरण यासाठी भविष्यात कार्यरत राहणार असल्याचे सांगितले.

इंदापूर तालुक्यामध्ये लक्षवेधी ठरलेल्या भिगवण ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये झालेल्या एकतर्फी विजयाबद्दल जनतेचे आभार मानताना त्यांनी गतकाळातील झालेल्या संगीत खुर्चीवरही सडकून टीका केली व निवडून आलेल्या सदस्यांमुळे गावाला एक प्रकारचे राजकीय स्थैर्य मिळाल्याचेही नमूद केले.

सदर कार्यक्रमाप्रसंगी सरपंच तानाजी वायसे,उपसरपंच शितल शिंदे माजी सरपंच पराग जाधव,उपसभापती संजय देहाडे,अशोक शिंदे,संजय रायसोनी,अभिमन्यू खटके, संपत बंडगर,जयदीप जाधव,जावेद शेख, जमीर शेख, गुराप्पा पवार,हरिश्चंद्र पांढरे,सत्यवान भोसले,दत्ता धवडे, तुषार क्षीरसागर,डॉ.प्रशांत चवरे ,योगेश चव्हाण, तसेच तृप्ती जाधव,स्मिता जाधव,प्रतिमा देहाडे,दीपिका क्षिरसागर, रत्नमाला रायसोनी,तस्लिम शेख, तेजस्वी भोसले,सईबाई खडके, यमुना काळे,आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक शिंदे यांनी केले तर आभार तुषार क्षीरसागर यांनी व्यक्त केले.

प्रियजनाचे प्रथम पुन्यस्मरण रक्तदान करून ;पिलेवाडी येथील स्तुत्य उपक्रम

0

डाळज प्रतिनिधी..इरफान तांबोळी दि.७

इंदापूर तालुक्यातील पिलेवाडी येथे स्वर्गीय अभिजित पवार यांच्या प्रथम पुण्य स्मरण निमित्त आज दि.७ मार्च रोजी श्री अप्पासाहेब व भवानी माता मंदिर पिलेवाडी येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरामध्ये तरुणांनी उस्फूर्त पणे सहभाग घेऊन रक्तदान केले. हे रक्तदान शिबीर श्री शिवशंभो चॅरिटेबल ट्रस्ट व हिंदवी स्वराज ग्रुप पिलेवाडी यांनी आयोजन केले होते.या शिबिरामध्ये जवळपास १०० बॅग रक्त संकलन झाले.

शिबीर अक्षय रक्तपेढी हडपसर (पुणे )यांच्या सहयोगाने करण्यात आले होते. हे शिबीर यशस्वी पार पाडण्या करिता प्रवीण पवार , भोजराज पवार , श्रीकांत मांढरे , सुजित भांडवलकर , प्रतीक पवार ,अरविंद भांडवलकर , रवी पवार तसेच पिलेवाडी ग्रामस्थ व हिंदवी स्वराज ग्रुप यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

भिगवण ची वाहतूक कोंडी कधी संपणार ? ; भिगवण पोलिसांनी तिसरा डोळा उघडण्याची गरज

0

भिगवण वार्ताहर.दि.२८

भिगवण बाजारपेठेतील वाहतूककोंडी दिवसेदिवस वाढत असून याकडे पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायत प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करताना दिसून येत नाही. या वाहतूक कोंडीमुळे व्यापारी वर्ग आणि ग्राहकांना मनस्ताप करावा लागत असून पोलीस प्रशासनाने या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर तिसरा डोळा उघडण्याची मागणी वाढू लागली आहे

भिगवण ची बाजारपेठत आसपासच्या २० च्यावर वाड्यावस्त्या आणि ३ तालुक्यातील नागरिक खरेदीच्या निमित्ताने रोज येत असतात.तर भिगवणचा मासळी बाजार राज्यात प्रसिद्ध आहे.मासे खरेदी साठी अनेक तालुक्यातील वाहने भिगवण बाजारात येत असतात.तर भिगवण हे मासे खवय्या साठी नावारूपास आले असून अनेक जन वाहने घेवून पोटपूजा करण्यासाठी भिगवण शहरात येत असतात.मात्र मागील काही वर्षापासून भिगवण शहराला वाहतूक कोंडीच्या समस्सेने बेजार केले असून १ किलोमीटरच्या अंतरात प्रवास करावयाचा म्हटले तरी कमीत कमी अर्धा तास वेळ लागत असल्याचे दिसून येते.बाजारपेठेतील व्यापारी याला कारणीभूत ठरत असून आपल्या दुकानातील माल रस्त्यावर कसा लावला जाईल यासाठी चढाओढ लागल्याचे पहावयास मिळत आहे.तर याकडे ग्रामपंचायत प्रशासन आणि पोलीस यंत्रणा कोणतीही कारवाई करीत नसल्यामुळे काही रस्त्यांना अक्षरशा बोळीचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. तर काही ठिकाणी बांधकामे रस्त्यावर आली असूनही यावर सबंधित प्रशासन कारवाई करताना दिसून येत नाही.त्यामुळे बाजार पेठेत फिरताना अनेक वेळा मनस्ताप सहन करावा लागत आहे.आंबेडकर चौक ते प्रदीप मेडिकल ,वांझखडे हॉटेल ते पुणे सोलापूर सर्विस रोड ,संगम वाईन्स , ज्योती मिसळ आणि नवी बाजारपेठ अशी नेहमी वाहतूक कोंडी असणाऱ्या जागा असून याची माहिती पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायत प्रशासनाला आहे.मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचे सध्यातरी दिसून येत आहे.त्यामुळे पोलीस प्रशासनाने या वाहतूक कोंडी आणि अवैध पार्किंग विषयी कारवाई करीत सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे.

भिगवण शहरात सम विषम तारखे प्रमाणे पार्किंग करण्याची योजना जिल्हाआधीकारी यांच्याकडून मंजूर करण्यात आली आहे.अवैध पार्किंग मुळे अनेक वेळा अपघात घडून नागरिकांना जीव गमवावे लागले आहेत.

पुणे सोलापूर महामार्गावर व्यवसाय करण्यासाठी जीव धोक्यात घातला जात असताना महामार्ग प्रशासन आणि पोलीस प्रशासन उघड्या डोळ्यांनी पाहत असल्याचे वास्तव आहे.तर यात होणारा राजकीय हस्तक्षेप निष्पापांच्या जीवावर बेतत आहे.

साध्या वेशात फिरत या पोलीस अधिकाऱ्याने केली कारवाई; पोलिसांच्या गनिमी काव्याची बाजारपेठेत चर्चा

0

भिगवण वार्ताहर.दि.२७

भिगवण शहरात विनामास्क दुकानदारांवर कारवाई करीत जवळपास १९००० रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.यावेळी भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांनी कोणताही फौजफाटा सोबत न घेता साध्या वेशात चालत विना मास्क दुकानदारांचे फोटो काढीत कारवाई केल्याने याची खबरबात अनेक दुकानदारांना हातात दंडाची पावती पडल्यावर माहिती झाली.

भिगवण शहरातील बाजार पेठेत जवळ पासच्या अनेक खेडे गावातून ग्राहक खरेदीला येत असल्यामुळे कोरोना आजार मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसून येत आहे.तर ग्राहक आणि व्यापारी कोरोना हद्दपार झाला असल्यासारखे बिनधास्त वागत असल्याचे दिसून येत आहे.अनेक व्यापारी मास्क वापरत नाहीत तर आहेत त्याचा मास्क हनुवटीच्या खाली घसरला असाल्याचे दिसून येत आहे.तर सॅनिटाइझर तर दुकानातून गायब झाले आहेत.अनेक दिवस दुचाकी वर विना मास्क कारवाई करूनही कोरोना वाढत असल्याचे दिसून आल्याने भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी सकाळी १० वाजता पोलीस ठाण्यातून निघत चालत व्यापारी पेठेत फेर फटाका मारण्यास सुरवात केली.यावेळी पोलिसांचा फौजफाटा सोबत न घेता साध्या वेशात माने फिरत असल्यामुळे याची माहिती कोणालाही मिळाली नाही.यावेळी माने यांनी शांतपणे प्रत्येक दुकान समोर उभे राहत ज्या दुकानात दुकानदाराने मास्क घातला नसेल आणि ग्राहकाने हि मास्क घातला नसेल अशा दुकानाचे फोटो काढण्यास सुरवात केली.तसेच फोटो काढल्यावर दुकान दाराला सॅनिटाइझर आहे का असे प्रश्न विचारून माहिती घेतली.जवळ पास १ ते १.५ किलोमीटर पायी चालत माने यांनी हि कारवाई केली आणि याचे फोटो पावती फाडणार्या अधिकार्याला पाठवीत दंडाची वसुली केली.पोलिसांनी केलेल्या या गनिमी काव्याची धास्ती व्यापाऱ्यांनी घेत अनेकांनी दुकानात सॅनिटाइझर समोर ठेवून मास्क वापरण्यास सुरवात केली.कारवाईत असेच सातत्य राहिल्यास भिगवण आणि परिसरात कोरोनाचा आलेख खाली येण्यास नक्कीच मदत होणार आहे.

याबाबत प्रभारी अधिकारी जीवन माने यांच्याशी संपर्क साधला असता कारवाईत दंड वसूल करणे हा प्रशासनाचा उद्देश नसून नागरिकांची जनजागृती होत कोरोना आजाराची संख्या कमी करणे हा असल्याचे सांगितले.तर दिवसभरात विनामास्क ३१ दुचाकी स्वारांवर केलेल्या कारवाईत ६२०० ,२२ दुकान आस्थापना हॉटेलवर केलेल्या कारवाईत ११००० दंड वसूल करण्यात आल्याचे तसेच वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर १८०० असा जवळपास १९००० रुपयाचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती दिली.

या नेत्यांचे हटविले फोटो;सत्ताधारी आणि विरोधकामध्ये संघर्ष

0

भिगवण वार्ताहर.दि.२५

भिगवण ग्रामपंचायत कार्यालयातील राष्ट्रवादी पक्षाचे नेते यांचे फोटो काढण्यावरून मोठे वादंग निर्माण झाले असून सत्ताधारी भाजप राष्ट्रवादीला त्यांनी केलेल्या कृत्याचेच हे फळ असल्याचे सांगत आहेत.तर भिगवण मधील मतदारांनी मागील सत्ताधाऱ्यांनी केलेल्या विकासाला कंटाळून विश्रांती घेण्याचा निकाल दिला असल्याने त्यांनी आतातरी विकासाच्या कामात हस्तक्षेप टाळावा असे सरपंच तानाजी वायसे मत व्यक्त केले.

भिगवण ग्रामपंचायत कार्यालयातील राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार ,खासदार सुप्रिया सुळे ,उपमुख्यमंत्री अजित पवार ,तसेच राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे फोटो काढल्याचे मागील सताधारी यांचे म्हणणे आहे.तर राजशिष्टाचार नुसार लावलेले फोटो हटविणे हे सताधारी पार्टीचे व्यक्ती आणि पक्षद्वेषी भूमिका असल्यामुचे म्हणणे मांडीत कार्यकर्त्यांनी मोर्चा नेत फोटो पूर्ववत लावण्याची मागणी केली.सदर नाट्यामुळे दोन दिवस वातावरण गरम आहे.तर निवडणूक आचारसंहिता काळात हे फोटो काढले असल्याचे आणि राजशिष्टाचार नुसार योग्य ते फोटो लावले जाणार असल्याचे सताधारीपार्टी कडून सांगण्यात येत आहे.तसेच मागील सत्ताबदलाच्या वेळी त्यावेळी असणाऱ्या फोटोंचे काय झाले होते याचे हे आत्मपरीक्षण करावे असे बोलले जात आहे.तर नवनिर्वाचित पदाधिकारी गावाच्या विकासासाठी समर्थ असून विरोधकांना मतदारांनी विश्रांतीसाठी निकाल दिला असल्यामुळे मतदारांच्या मताचा आदर ठेवावा असा सला दिला जात आहे.यामुळे हे फोटो बदलाचे राजकारण मोठ्या प्रमाणात रंगत असून याचा भिगवण गावाच्या विकासावर परिणाम होवू नये असे सर्वसामान्य नागरिकांचे म्हणणे आहे.

याबाबत बोलताना सरपंच तानाजी वायसे आणि पराग जाधव यांनी विरोधकांना पराभव पचवता येत नसल्यामुळे अशी नौटंकी केली जात असल्याचे सांगितले.मागील सताबद्ल वेळी विरोधकांनी ग्रामपंचायत कार्यालयात असणारे तत्कालीन फोटोचे काय करण्यात आले होते याचा विचार केल्यास याचे उत्तर मिळेल असे मत व्यक्त केले.तर सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्टा करणार असल्याचे सांगितले.तर विरोधकांनी विकास कामात काही सूचना मांडल्यास त्या नक्की स्वीकारू गेल्या ५ वर्षात झालेले सुडाचे राजकारण केले जाणार नसल्याचे सांगण्यात आले.