Saturday, May 23, 2026
Home Blog Page 16

अकोले पोटनिवडणुक इच्छुकांच्या गर्दी मुळे होणार चुरशीची

0

सत्यवार्ता प्रतिनिधी : विजय गायकवाड (अकोले )

अकोले वार्ताहर दि .२७

अकोले गावच्या ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी पोट निवडणूक होत आहे .गावातील अंतर्गत गटबाजीचा फायदा उचलून निवडुन येण्यासाठी इच्छुक उमेदवारांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे ही निवडनुक चुरशीच्या वातावरणात पार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे .

अकोले गावचे दिवंगत सरपंच ज्ञानदेव दराडे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या प्रभाग दोनच्या एका जागेसाठी येत्या २१ डिसेंबर रोजी निवडणूक होत आहे.यासाठी ३० नोव्हेंबर पासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.मात्र स्थानिक पातळीवर राजकारणात अंतर्गत गटबाजी मोठ्या प्रमाणात असल्याने एका गटाचे काम करण्यास कोणी तयार होईल का नाही ? असे चित्र असल्याने या गटबाजीचा फायदा उचलून कोणताही उमेदवार विजयी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे .याच मानसिकतेतुन अनेक उमेदवारांची संख्या वाढण्याची लोकांमधून व्यक्त होत आहे.
अकोलेच्या स्थानिक राजकारणात एका जागेसाठी उमेदवार निवडीसाठी कार्यकर्त्यांनी चाचपणी सुरू केली आहे.सध्या तरी निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक उमेदवारांची संख्या जास्त असल्याने थेट लढत होऊ शकत नसल्याचे वातावरण तरी सध्या दिसू लागले आहे. ग्रामपंचायतीच्या सत्ताकारणात स्थानिक पातळीवर बहुमत मिळलेल्या पॅनलला सत्ता स्थापन करता आली नाही मात्र पॅनल मधील उमेदवारांनी फुटून सत्तेसाठी दुसऱ्या पॅनलचा आधार घेऊन ग्रामपंचायतीमध्ये सत्ता स्थापन करण्यात यश मिळवले होते.मात्र विद्यमान सरपंच ज्ञानदेव दराडे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक होणार असल्याने इच्छुक उमेदवारांनी प्रभागातील लोकांची भेटीगाठी सुरू केल्याने थेट लढत होण्याऐवजी तिरंगी चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

रोटरीच्या मदतीतून विरवाडी गावच्या दिव्यांग तरुणाला व्हीलचेअर ; भिगवण रोटरीचा स्तुत्य उपक्रम

0

भिगवण वार्ताहर .दि . २७
रोटरी क्लब ऑफ भिगवन तसेच रोटरी क्लब ऑफ बिबेवाडी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भिगवण येथील दिव्यांग युवक पप्पू जाधव यास व्हीलचेअर भेट देण्यात आली. यावेळी रोटरी अध्यक्ष संजय खाडे तसेच इतर रोटरीचे सदस्य उपस्थित होते .

भिगवण विरवाडी येथील जाधव यास दिव्यांग असलेल्या कारणामुळे दैनंदिन जीवनामध्ये खुप अडचणीचा सामना करावा लागत होता .तर घरची परिस्थिती हालाकीची असल्यामुळे व्हीलचेअर घेण्यासाठी पैशाची व्यवस्था करता येत नव्हती .या कारणामुळे जागेला खिळून राहावे लागत होते .याची माहिती देत रोटरी क्लब आणि माजी अध्यक्ष संपतराव  बंडगर यांच्याकडे त्यांनी व्हीलचेअरची मागणी केली होती .त्यांच्या मागणीचा प्रामुख्याने विचार करीत रोटरी क्लबच्या माध्यमातून जाधव यांची व्हीलचेअरची मागणी पूर्ण करण्यात आली. व्हीलचेअर मिळाली असल्याने लाभार्थी पप्पू जाधव यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले होते .

यावेळी रोटरीचे अध्यक्ष संजय खाडे उपाध्यक्ष औदुंबर हुलगे , संपत बंडगर ,स्वप्निल ढोले तसेच  भिगवण रोटरीचे सर्व सद्स्य उपस्थित होते. व्हीलचेअर मिळाल्याबद्दल पप्पू जाधव तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी रोटरी क्लबचे आभार मानले

.यावेळी बोलताना रोटरीच्या माध्यमातून अनेक सामाजिक कामे करीत असताना भिगवण आणि परिसरातील दिव्यांग व्यक्तींना सेवा उपलब्ध व्हावी यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे खाडे यांनी सांगितले .

भादलवाडी गावात काळभैरवनाथ जन्माष्टमी सोहळा उत्साहात साजरा

0

सत्यवार्ता प्रतिनिधी : शैलेश परकाळे (भादलवाडी )

भादलवाडी गावात सालाबाद प्रमाणे साजरी करण्यात येत असलेली काळ भैरवनाथ जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . गावातील ग्रामस्थ आणि महिला भगिनींनी यावेळी उत्सवात सहभाग घेत देवाची मनोभावे पूजा केली .

गेल्या २ वर्षांपासून कोरोनाचे संकट असल्यामुळे हा उत्सव साजरा करण्यात आला नव्हता .मात्र सध्या कोरोनाचा आलेख खाली आल्यामुळे शासनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करीत काळ भैरवनाथ जन्माष्टमी साजरी करण्याचे ग्रामस्थांनी ठरविले.

शनिवारी सकाळी १० वाजता जन्माष्टमी सोहळा साजरा करण्यास सुरुवात झाली.सकाळी १० वाजून १० मिनिटांनी काळभैरवनाथ देवाला अभिषेक करण्यात आला. सकाळी ११ वाजता काळ भैरवनाथ मूर्तीला पोशाख चढविण्यात आला,नंतर दुपारी ०१ वाजल्यापासून ते ०३ वाजेपर्यंत टाळ-मृदंगासहित भक्तिमय वातावरणात पालखी मिरवणूक काढण्यात आली . सायंकाळी ०४ ते ०६ यावेळी ह. भ. प. पांडुरंग महाराज सातपुते यांचे भैरवनाथ जन्म या विषयावर संकीर्तन झाले. उत्सवाच्या शेवटी महाप्रसादाचा ग्रामस्थांनी आस्वाद घेतला. जन्माष्टमीच्या कार्यक्रमासाठी गावातील ग्रामस्थ शासनाच्या कोरोना नियमाचे पालन करीत मोठ्या संख्येने उपस्थित राहून या “काळ भैरवनाथ जन्माष्टमी” कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय कण्हेरकर आणि युवराज कुताळ तसेच ग्रामस्थांनी योग्य पद्धतीने पार पाडले.

रेल्वे खाली उडी घेत दिला तरुण व्यावसायिकाने दिला जीव ; भिगवण येथील धक्कादायक बातमी

0

भिगवण वार्ताहर.दि.२७

भिगवण व्यापारी पेठेतील तरुण व्यावसायिकाने रेल्वेखाली उडी घेत जीव दिल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी घडली.घरगुती वाद कि पैशाचे तणाव याचे कारण समजू शकले नाही मात्र या घटनेमुळे व्यापारी वर्गात दुखाचे सावट पसरले असल्याचे दिसून आले.

याबाबत मिळालेल्या माहिती नुसार सुनील पांडुरंग कुचेकर वय २२ असे तरुण व्यावसायिकाचे नाव आहे.सुनील हा भिगवण येथील मुख्य बाजारात पानाचे दुकान चालवून आपला उदरनिर्वाह चालवत होता.सुनीलच्या घरी त्याची पत्नी ,आई ,लहान भाऊ असा परिवार आहे.सुनीलच्या वडिलांचे २००४ साली किडनीच्या आजाराने निधन झाले होते.त्यांच्या आजारपणात भिगवण व्यापारी मित्रांनी वर्गणी करून त्यांचा जीव वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता.मात्र यातून त्यांना वाचविण्यात यश आले नव्हते.त्यांच्या पश्च्यात सुनील हा त्यांचा व्यवसाय पुढे चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवीत होता.सुनीलचे मागील काही महिन्यापूर्वी लग्न झाले होते.मात्र त्याच्या रेल्वे खाली उडी मारत आत्महत्या करण्यामुळे कुटुंबावर दुखाचा डोंगर पसरला असल्याचे दिसून आले.

सुनीलच्या आत्महत्या करण्यामागील कारण अजून समोर आले नसले तरी घरगुती वाद किंवा पैशाचे देणे याच्या तणावातून सदर घटना घडली असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पुणे सोलापूर महामार्ग अपघातात कर्मयोगी संचालकाच्या मुलाचा मृत्यू ; ट्रॉलीचा टायर बदलताना झाला दुर्दैवी अपघात

0

भिगवण वार्ताहर.दि.१९

पुणे सोलापूर महामार्गावरील गागरगावच्या हद्दीत उस वाहतूक करणाऱ्या वाहनाचे टायर बदलत असताना खासगी प्रवाशी बसने ठोकर दिल्याने झालेल्या अपघातात आदित्य विश्वास देवकाते या १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.तर या अपघातात कर्मयोगी साखर कारखान्याचे नूतन संचालक विश्वास देवकाते गंभीर जखमी झाले आहेत.

कर्मयोगी साखर कारखान्याचा ऊस वाहतून करत असताना सदर अपघात झाला.उसाने भरलेल्या ट्रोलीचा टायर पंक्चर झाल्याने मदनवाडी येथे राहणारे कारखाना संचालक विश्वास देवकाते आणि त्यांचा मुलगा आदित्य हे रात्रीचे वेळी आपली इनोव्हा गाडीतून टायर बदलण्यासाठी ड्रायव्हरच्या मदतीला गेले होते.या वेळी टायर बदलत असताना खासगी प्रवासी बसने ट्रोलीला धडक दिली.यावेळी ड्रायव्हरला बॅटरीचा उजेड दाखवीत शेजारी उभा असणाऱ्या आदित्यच्या छातीवर आणि बरगडीवर ट्रोलीचा दणका बसला . तर विश्वास देवकाते यांनाहि मार लागला.तर ट्रोली खाली काम करीत असणाऱ्या ड्रायव्हर सोनू पवार यांना पायाला गंभीर दुखापत झाली.उपचारादरम्यान आदित्य याचा मृत्यू झाला.तर जखमींवर भिगवण येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार केले जात आहेत.आदित्य हा माजी संचालक रंगनाथ देवकाते यांचा नातू तर नवनिर्वाचित संचालक विश्वास देवकाते यांचा मुलगा होता .तर त्याच्या अपघाती मृत्यूमुळे मदनवाडी गावांवर आणि भिगवण परिसरावर शोककळा पसरली आहे .

भिगवण पोलिसांची दबंग कारवाई ; ३५ किलो गांजासह आरोपीच्या आवळल्या मूसक्या

0

भिगवण वार्ताहर.दि.१८

भिगवण पोलिसांनी नाकाबंदी कारवाई दरम्यान ३५ किलो गांजा सह एका दुचाकीस्वार आरोपीच्या मुसक्या आवळल्या.या दमदार कारवाईत ६ लाख १६ हजार २८० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी प्रेसनोट मध्ये देण्यात आलेल्या माहिती नुसार भिगवण पोलिसांनी डिकसळ गावच्या हद्दीत हि कारवाई करण्यात आली.राशीन बारामती राज्य मार्गावर नाकाबंधी सुरु असताना दुचाकीवरून एक इसम गांजा घेवून जाणार असल्याची गोपनीय बातमी पोलिसांना मिळाली होती.याच माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून कारवाई करत दुचाकी वरून पोत्याच्या आत गांजा घेवून जाणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या.सुनील अनिल जाधव रा.सासवड उदाचीवाडी ता.पुरंदर असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाचे नाव असून त्याच्या ताब्यात असणारे ३८.०८ किलोग्राम गांजा आणि दुचाकी असा जवळपास ६१६२८० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख ,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते ,विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे ,यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी दिलीप पवार ,पोलीस उपनिरीक्षक विनायक दडसपाटील ,पोलीस अमलदार दत्तू जाधव ,रामदास जाधव ,अंतूल पठान ,सचिन पवार ,महेश उगले ,केशव चौधर अंकुश माने ,होमगार्ड नितीन धुमाळ ,पोलीस मित्र विशाल गुरगुळे यांच्या पथकाने केली.

माजी जिल्हा परिषद सदस्य विलास बंडगर यांचे अल्पशा आजाराने निधन

0

भिगवण वार्ताहर . दि .१३
इंदापुर तालुक्यातील भिगवण-शेटफळगढे जिल्हा परिषद गटांचे माजी जिल्हा परिषद सदस्य विलास श्रीरंग बंडगर(५४) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय असलेल्या विलास बंडगर यांच्या निधनाची बातमी समजताच मदनवाडी व परिसरांवर शोककळा पसरली.
माजी जिल्हा परिषद सदस्य विलास बंडगर यांचा १२ वर्षापुर्वी पुणे सोलापूर महामार्गावर कुरकुंभ गावच्या हद्दीत अपघात झाला होता. अपघातांमध्ये त्यांच्या मणक्याला मार लागुन ते गंभीर जखमी झाले होते. दिलदार व्यक्तिमत्त्व असणाऱ्या बंडगर यांना शुक्रवारी ता १२ पहाटे पाचच्या सुमारास त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

विलास बंडगर यांनी मदनवाडी ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणुन राजकिय कारकीर्द सुरु केली होती. त्यानंतर २००७ ते २०१२ या कालावधीमध्ये ते जिल्हा परिषद सदस्य म्हणुन कार्यरत होते.

धाडसी व धडाडीचे निर्णय घेणारा राजकारणी अशी त्यांची ख्याती होती. तरुणांमध्ये ते अतिशय़ लोकप्रिय होते. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. इंदापुर पंचायत समितीच्या माजी उपसभापती छाया विलास बंडगर या त्यांच्या पत्नी होत.

मुस्लिम बांधवाना दिवाळी फराळ वाटपाचा कार्यक्रम ; भिगवण रोटरीचा बंधुभावाचा स्तुत्य उपक्रम

0

भिगवण वार्ताहर .दि .८

भिगवण येथील रोटरी क्लबने जामा मज्जिद येथे मुस्लिम बांधवांसाठी दिवाळी फराळाचे आयोजन केले होते. यामध्ये हिंदू-मुस्लीम भाई -भाई हा ऐक्याचा संदेश या निमित्ताने देण्यात आला. यावेळी मुस्लिम बांधवांनी दिवाळी फराळाचा आस्वाद घेतला.
रमजान च्या पवित्र महिन्यात ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव आपल्या हिंदू बांधवांना शीरखुर्मा खाण्यासाठी बोलवत असतात.यातून बंधुभावाचा संदेश देण्यात येत असतो. त्याचप्रमाणे दिवाळी हा सण आपणही मुस्लिम बांधवांच्या बरोबर साजरा करावा अशी संकल्पना रोटरी क्लबच्या सदस्यांनी मांडली होती .त्यासाठी अध्यक्ष संजय खाडे यांनी परवानगी देऊन प्रत्यक्षात कार्यक्रमाचे नियोजन केले.

या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमावेळी रोटरीचे संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत, महेश शेंडगे, संपत बंडगर, तुषार क्षीरसागर, संजय रायसोनी रियाज शेख, तय्यब शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करून बंधू भावाचे नाते वाढीस लागाव्यात यासाठी अशा उपक्रमाची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला उपाध्यक्ष औदुंबर हुलगे, योगेश चव्हाण, अल्ताफ शेख, खजिनदार प्रदीप ताटे, प्रदीप वाकसे, सलीम सयय्द हिराभाई बागवान सलीम सातारे यांचे सहकार्य लाभले. यावेळी सचिव प्रविण वाघ, अफजल सय्यद, संतोष सवाने, सुजय गांधी, कुलदीपक थोरात, मोहसीन सातारे, अकबर तांबोळी व मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.
यावेळी मुस्लिम बांधवांनी रोटरी क्लब च्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत करून सर्व हिंदू बांधवांना दिवाळी सणाच्या शुभेच्छा दिल्या .

वडिलोपार्जित जमिनीच्या वादातून वृद्धाचा खून ; निरगुडे येथील खळबळजनक प्रकार

0

भिगवण वार्ताहर.दि.८

वडिलोपार्जित जागेच्या वहिवाटीवरून झालेल्या वादात लोखंडी गज आणि लाकडी दांड्याने मारहाण करीत एका वृद्धाचा जीव घेण्याचा प्रकार निरगुडे येथे घडला.याबाबत भिगवण पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करीत ३ आरोपींच्या मुसक्या तातडीने आवळल्या.

भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा खळबळजनक प्रकार असून याबाबत प्रभारी पोलीस अधिकारी दिलीप पवार यांनी दिली.मारुती गणपत लकडे वय.८५ असे खून झालेल्या वृद्धाचे नाव आहे.यात त्यांचा मुलगा शिवाजी लकडे ,नातू बाळू शिवाजी लकडे आणि वाल्मिक शिवाजी लकडे हे गंभीर जखमी झाले आहेत.याप्रकरणी भिगवण पोलिसांत आरोपी नारायण ज्ञानदेव लकडे ,दत्तू ज्ञानदेव लकडे ,ज्ञानदेव कृष्णा लकडे ,अमर दत्तू लकडे ,तम्नय नारायण लकडे ,शुभम नारायण लकडे ,पारूबाई ज्ञानदेव लकडे सर्वजण रा.निरगुडे (लकडेवस्ती ) या ७ जनाविरोधात खुनासह जीवे मारण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वडिलोपार्जित जमिनीच्या वादावरून गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मारुती मंदिराजवळ ७ जणांनी एकत्र येत मयत वृद्ध आणि त्याच्या मुलावर आणि नातवावर हा खुनी हल्ला चढविला.यात मारुती लकडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर इतर गंभीर जखमीवर उपचार सुरु करण्यात आले आहेत.

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभीनव देशमुख ,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते ,विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस अधिकारी दिलीप पवार यांनी भिगवण पोलीस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण यांची तीन पथके नेमून यातील नारायण ,दत्तू आणि अमर या तिघांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरु केला आहे.

मदनवाडी गावच्या उपसरपंच पदी सौ .संगीता सतीशराव बंडगर यांची बिनविरोध निवड

0

भिगवण वार्ताहर .दि.३

मदनवाडी ता.इंदापूर ग्रामपंचायत उपसरपंच पदी सौ .संगीता सतीश बंडगर यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बी.एस.गाताडे यांनी दिली.

भिगवण शहराच्या शेजारी मोठ्या लोकसंखेचे गाव म्हणून मदनवाडी गावाची ओळख आहे.गावच्या उपसरपंच पदाचा कार्यकाळ पूर्ण होताच विद्यमान उपसरपंच रणजीत निकम यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर हि निवडणूक घेण्यात आली.सरपंच आम्रपाली प्रकाश बंडगर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेण्यात आली.यावेळी निवड प्रकीयेच्या निर्धारित वेळेत सौ .संगीता सतीश बंडगर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी आदर्श सरपंच तुकाराम बंडगर ,मा.पंचायत समिती सदस्या सौ .मेघनाताई बंडगर ,भाजपा गट नेते संपतराव बंडगर ,शिक्षण संस्था अध्यक्ष सतीश शिंगाडे ,विकास सोसायटी चेअरमन विष्णुपंत देवकाते ,प्रसिद्ध उदोज्जक नामदेव पाटील ,बारामती मतदार संघाचे भाजपा अध्यक्ष तेजस देवकाते ,माजी उपसरपंच राजेंद्र देवकाते गणपत ढवळे ,गुणवंत बंडगर तसेच सर्व सदस्य उपस्थित होते.

चौकट : मदनवाडी गावात १३ सदस्यांची बॉडी आहे .मात्र जनतेतून सरपंच निवड झाल्यामुळे हि संख्या १४ वर गेली.४ वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत आतापर्यंत  ७ जणांना उपसरपंच पदाची खुर्ची देण्यात आली असून राहिलेल्या काळात ६ जणांना पद देण्याचा मानस यातून दिसून येतो.भाजप आणि राष्ट्रवादी दोन्ही गटाची येथे सत्ता असली तरी पदवाटपाच्या बाबतीत मात्र एकजूट पाहायला मिळते. या गावाचा आदर्श ग्रामीण भागातील ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी घेतल्यास राजकारण कुरघोडी ला लगाम घालणे शक्य होऊ शकते .