Saturday, May 23, 2026
Home Blog Page 15

भिगवण ग्रामपंचायतीने थकीत कर वसुलीसाठी महा पारेषण कार्यालया ठोकले टाळे ; २ कोटी १७ लाखाची थकबाकी

0

भिगवण वार्ताहर .दि.७

ग्रामपंचायत कराच्या थकबाकीमुळे भिगवण येथील महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कार्यालयाला ग्रामपंचायत विभागाकडून टाळे ठोकण्यात आले. वीज बिल थकल्यावर ग्राहकाची वीज कापणाऱ्या विभागाला ग्रामपंचायत विभागाने घरपट्टी आणि कर न भरल्यामुळे टाळे लाऊन दणका दिला असल्याचे दिसून आले.

याबाबत भिगवण गावचे सरपंच तानाजी वायसे आणि ग्रामविकास अधिकारी यांनी दिलेल्या माहिती नुसार पारेषण च्या भिगवण कार्यालयाची कराची थकबाकी २ कोटी १७ लाख रुपये असून अनेक वेळा याची मागणी करण्यात येत होती.याविषयी अनेक वेळा बिल आणि नोटीस देण्यात आली होती मात्र याकडे महापारेषण जाणूनबुजून टाळाटाळ करत असल्याचे दिसून आले.याबाबत वरिष्ठ कार्यालयाला कळवूनही कोणतीही अमलबजावणी करण्यात आली नाही. ग्रामपंचायत हि स्वायत्त संस्था असल्यामुळे नागरिकांना सेवा पुरवीत असताना निधी उपलब्ध होणे आवश्यक असताना थकबाकी बाबत कोणाताही निर्णय झाला असल्यामुळे ग्रामपंचायत विभागाने हा निर्णय घेतला. टाळा लावण्या अगोदर ग्रामपंचायत विभागाने रीतसर सूचना या विभागाला तसेच वरिष्ठ कार्यालय आणि पोलीस ठाण्याला दिल्या होत्या आणि रीतसर पद्धतीने कार्यालयाला टाळे ठोकण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.यावेळी गावचे सरपंच तानाजी वायसे ,पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे ,कर्मयोगीचे संचालक पराग जाधव,तुषार क्षीरसागर ,कपिल भाकरे ,सत्यवान भोसले ,जावेद शेख ,गुराप्पा पवार ,अमोल वाघ तसेच ग्रामविकास अधिकारी सागर परदेशी ,हनुमंत चांदगुडे ,बाळासाहेब जगताप उपस्थित होते.

भिगवण रोटरीचे माध्यमातून सुरक्षा रक्षकांना उबदार ब्लँकेट चे वाटप ;

0

भिगवण वार्ताहर .दि.७

भिगवण रोटरी क्लबच्या माध्यमातून थंडीत काम करणाऱ्या सुरक्षा रक्षकांना आणि गुरख्यांना उबदार ब्ल्ँनकेट चे वाटप करण्यात आले.पुणे रिव्हर साईड क्लब आणि भिगवण क्लबच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम राबविण्यात आला.

यावेळी माहिती देताना भिगवण रोटरी अध्यक्ष संजय खाडे यांनी सुरक्षा रक्षक आणि वॉचमन रात्रीच्या वेळेस बँका तसेच सराफी पेढीचे रक्षण करण्यासाठी कडक थंडीत आपली ड्युटी बजावत असतात. बोचणाऱ्या थंडीत काही वेळा ते कागदी कचरा लाकडी वस्तू आणि टायर चा वापर करून शेकोटी करण्याचा प्रयत्न करतात.हे पर्यावरण आणि त्यांचे आरोग्य यासाठी धोक्याचे असल्यामुळे रोटरी सदस्य डॉ.अमोल खानावारे यांच्या कल्पनेतून ब्ल्ँनकेट वाटपाची माहिती पुढे आली.भिगवण आणि परिसरातील गरजू आणि सुरक्षा कामगार साठी हि वाटप करण्यात आले.यावेळी सचिन बोगावत ,सुषमा वाघ ,संपत बंडगर ,रियाझ शेख ,किरण रायसोनी ,प्रदीप ताटे , संजय चौधरी ,प्रदीप वाकसे,प्रवीण वाघ , उपस्थित होते .

चार महिन्यापूर्वी झालेल्या खुनाला भिगवण पोलिसांनी फोडली वाचा ; चुलत भावानं घेतला जीव

0

भिगवण वार्ताहर .दि. ६

भिगवण पोलीस ठाणे हद्दीतील शेटफळगढे गावात ४ महिन्यापूर्वी झालेल्या खुनाला वाचा फोडण्यात पोलिसांना यश लाभले आहे.कोणताही पुरावा नसताना भिगवण पोलिसांनी नियोजनबद्ध तपास आणि तांत्रिक विश्लेषणचा आधार घेत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्यामुळे भिगवण पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी प्रेसनोट देत माहिती दिली.यातील आरोपी किशोर बाळासाहेब जगताप वय ३० याला खुनाच्या आरोपांखाली अटक करण्यात आली आहे.याबाबत दिलेल्या माहिती नुसार २१/०८/२०२१ रोजी शेटफळगढे येथील सुजित संभाजी जगताप वय ३२ राहते घरातून निघून गेल्याची तक्रार सुजितचे वडील संभाजी शिवाजी जगताप यांनी केली होती.भिगवण पोलिसांनी मिसिंग दाखल करून घेत तपास चालू केला होता.पोलीस तपास करीत असताना सुजित ज्या दिवशी घरातून निघून गेला त्यावेळी फोन आलेला इतकीच माहिती उपलब्ध होती .मात्र भिगवण पोलिसांनी योग्य आणि नियोजनबद्ध तपास करीत तपासाची दिशा ज्याने फोन केला होता त्याच्याकडे म्हणजे किशोर जगताप याच्याकडे वळवली.मात्र किशोर याने अनेक वेळा उडवाउडवी ची उत्तरे देण्यास सुरवात केली.मात्र तांत्रिक विश्लेषणाचा वापर करीत पोलीसी खाक्या दाखवताच किशोर याने सुजितचा खून करून त्याचा मृतदेह पुरून टाकल्याचे कबूल केले.त्याच्या कबुली नंतर भिगवण पोलिसांनी घटना स्थळी जात पुरलेला मृतदेह ताब्यात घेत आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख ,अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते ,बारामती विभागीय अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार ,पोसई विनायक दडसपाटील ,रुपेश कदम ,सुभाष रूपनवर ,अमलदार नाना वीर ,सचिन पवार, महेश माने ,महेश उगले ,अंकुश माने यांच्या पथकाने केली.

चौकट : आरोपी किशोर हा मयत सुजित याचा चुलत भाऊ असून त्याने अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने सुजितला फोन करून बोलाबून घेत खोऱ्याच्या दांडा डोक्यात घालत जीव घेतला. जीव गेल्यावर त्याला गोणीत भरून निजर्न ठिकाणी असणाऱ्या शेतात पुरून टाकले.मात्र नात्यात आलेल्या या विखारी पणाला जमिनीचा वाद कि इतर काही याचा तपास पोलीस करीत आहेत .

प्लास्टिक विरोधात ग्रामपंचायत भिगवण ऍक्शन मोड मध्ये ; ९ दुकानावर कारवाई करत १८ हजाराचा दंड वसूल

0

भिगवण वार्ताहर .दि.२५

प्लास्टिक वापरा विरोधात ग्रामपंचायत भिगवण ऍक्शन मोडमध्ये आली असून एका दिवसात १८  हजार रुपयाचा दंड व्यापारी वर्गाकडून वसूल करण्यात आला असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे हनुमंत चांदगुडे यांनी दिली .ग्रामपंचायतीने घेतलेल्या या कडक भूमिकेच अनेक पर्यावरण प्रेमींनी स्वागत केले असून व्यापारी वर्गातून मात्र याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे.

राज्यभरात प्लास्टिकचा भस्मासुर वाढत असताना त्याचे दुष्परिणाम हि दिसून येत आहेत.पर्यावरण आणि जनावरासाठी हे प्लास्टिक धोक्याचे ठरत आहे.त्यामुळे राज्यसरकारने प्लास्टिक बंदीसाठी कायदा केला आहे.मात्र कायदा करूनही त्याची अमलबजावणी केली जात नसल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणावर या घातकी प्लास्टिकचा वापर करीत आहेत.नव्यानेच सत्तेवर आलेल्या भिगवण कार्यकारीनीने स्वच्छ भिगवण सुंदर भिगवण करण्यासाठी प्लास्टिक बंदीसाठी काही दिवस जनजागृती केली.यात इंदापूर पंचायत समिती उपसभापती संजय देहाडे ,सरपंच तानाजी वायसे ,पराग जाधव ,तुषार क्षीरसागर ,बाळासाहेब भोसले आणि कपिल भाकरे यांनी पुढाकार घेत दंडापेक्षा नागरिकांत जनजागृती व्हावी यासाठी ग्रामपंचायत कामगार आणि ग्रामसेवक यांना सोबत घेत फेरीचे आयोजन केले होते.मात्र तरीही काही दुकानदार यात वापर करीत असल्याचे दिसून आल्याने शेवटी पोलीस विभागाची आणि महसूल विभागाची मदत घेत दंडाची कारवाई करण्यात आली.

या कारवाईत ९ दुकानदार ,हॉटेल व्यावसायिक आणि भाजी विक्रेते यांच्या कडून १८ हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला.सदरील कारवाई ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय परदेशी ,पोलीस विष्णू केमदारने ,प्रमोद गलांडे आणि ग्रामपंचायत कामगार यांच्या वतीने करण्यात आली.

अकोले पोटनिवडणूकीसाठी ८७ टक्के मतदान ;दोन गटाची प्रतिष्ठा पणाला

0


सत्यवार्ता अकोले पत्रकार विजय गायकवाड-

इंदापूर तालुक्यात ८ पैकी ७ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकीच्या जागा बिनविरोध होऊन केवळ एकमेव निवडणूक लागलेल्या अकोले ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज ८७ टक्के मतदान झाले.पोटनिवडणूकीच्या झालेल्या मतदानातून उद्या उमेदवारांचे निकालातून भवितव्य ठरणार आहे.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत स्थानिक पातळीवर गटातटाच्या राजकारणातुन एकमेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.निवडणूक जाहीर झाल्यापासून उमेदवार बिनविरोध करण्यासाठी स्थानिक पातळीवरील एकमेकांसोबत कार्यकर्त्यांनी अर्ज माघार घेण्याच्या दिवसापर्यंत चर्चेच्या फेऱ्या अखेर पर्यंत सुरू ठेवल्या.मात्र एका जागेसाठी नऊ उमेदवारांनी अर्ज दाखल करून गावच्या राजकारणात एक नवी नोंद करून ठेवली.पण अर्ज माघार घेण्याच्या दिवशी सात उमेदवारांनी माघार घेत दोन उमेदवारांत निवडणूक लागली.

अनेक वेळा झडलेल्या चर्चेच्या फैरीतुन कोणीच माघार घेत नसल्याने इंदापूर तालुक्यात आठ पैकी सात ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकीच्या जागा बिनविरोध होऊन केवळ अकोले येथील प्रभाग दोनच्या जागेसाठी निवडणूक लागली.यासाठी स्थनिक राजकारणाच्या गटातटाच्या राजकारणातून वर्चस्वासाठी दोन्ही उमेदवारांनी प्रतिष्ठा पणाला लावून आज अखेर मतदान घडवून आणले.

उद्या होणाऱ्या निकालातून दोन्ही उमेदवाराचे भवितव्य काय असेल यासाठी लोकांमधून अंदाज बांधणीला सुरुवात झाली आहे.

बारामती भिगवण रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात सुरक्षा रक्षकाचा मृत्यू ; अपघातात अक्षरशा देहाचा चेंदामेंदा

0

भिगवण वार्ताहर .दि .२०

बारामती भिगवण रस्त्यावर शेटफळगढे गावच्या हद्दीत शेतमालाची वाहतूक करणाऱ्या मालगाडीखाली सापडून सुरक्षा रक्षकाचा चेंगरून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली.

याबाबत मिळालेल्या माहिती नुसार संतोष मारुती शिंदे वय ४७ रा.सणसर असे अपघातात मृत्यू झालेल्या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे.बारामती भिगवण रस्त्यावर शेटफळगढे अग्रो कारखान्याच्या उस वाहतूक करणाऱ्या वाहनासाठी रहदारी नियंत्रण करण्याचे काम शिंदे करत होते . शनिवारी काम करीत असताना बारामती बाजूने भिगवण कडे शेतीमाल मका घेवून येणाऱ्या ट्रकच्या खाली त्यांचा चेंगरून मृत्यू झाला.अपघात होताच मालवाहतूक करणाऱ्या चालकाने अपघात स्थळावरून पळ काढला .

याबाबत भिगवण पोलिसांनी अपघातातील ट्रक नंबर एम .एच .४२ बी ८२९६ या वाहनावरील अज्ञात ड्रायव्हर विरोधात हयगयीने अविचाराने रहदारीचे नियमाचे उलंघन करीत अपघात करून मृत्यूस कारणीभूत झाल्याचा गुन्हा नोंद केला आहे.घटनास्थळी भेट दिली असता अपघात अतिशय गंभीर झाल्याचे दिसून येत होते.यात सुरक्षा रक्षकाच्या देहाचे अक्षरशा चेंदामेंदा होवून दोन तुकडे झाल्याचे दिसून आले.याबाबत मारुती बजरंग गाडेकर यांनी फिर्याद दिली असून भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार महेश माने अपघाताचा तपास करीत आहेत .

अपघात घडल्यामुळे बारामती आणि भिगवण रोडवर दोन्ही बाजूला वाहनांची मोठी रांग लागल्याचे भिगवण पोलिसांना समजताच भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनायक दडसपाटील ,उपनिरीक्षक रुपेश कदम ,पोलीस हवालदार महेश माने ,पोलीस हवालदार निंबाळकर यांनी अपघात स्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले .तसेच कारखान्याची क्रेन उपलब्ध करून अपघाती वाहणाखाली अडकलेला मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यासाठी पाठवून दिला .भिगवण पोलिसांनी दाखविलेलया तत्परतेचे वाहन धारकांनी आभार मानले .

सामाजिक प्रबोधन करण्यासाठी कीर्तन कारांची गरज असल्याचे ; राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे मत

0

सत्यवार्ता अकोले वार्ताहर ….विजय गायकवाड
वारकरी संप्रदाय हा कीर्तनाच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधन करून समाजाची सेवा करीत असतात.अशी सेवा अखंड सुरू ठेवण्यासाठी समाजात कीर्तनकार तयार होण्याची गरज असल्याचे मत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.

धायगुडेवाडी(अकोले ) येथील वैष्णवी बहुउद्देशीय वारकरी शैक्षणिक संस्थेच्या उदघाटन ते प्रसंगी बोलत होते. धायगुडे वाडी येथे प्रसिद्ध कीर्तनकार वैष्णवी धायगुडे यांनी सुरू केलेल्या वारकरी संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागात कीर्तनकार तयार व्हावेत या हेतूने ही संस्था सुरू करण्यात येत आहे.यासाठी भरणे यांनी संस्थेच्या बांधकामासाठी १० लाख रुपयाचा मदतनिधी देण्याचे जाहीर केले .या संस्थेमध्ये तबला वादक, गायन, कीर्तन, प्रवचनकार यांना शिक्षण देण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश सुरू आहेत.सध्या वीस विद्यार्थी संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत.भविष्यात या संस्थेच्या माध्यमातून चांगले कीर्तनकार तयार करण्यासाठी चांगल्या सेवा देण्याचा मानस असल्याचे कीर्तनकार वैष्णवी धायगुडे यांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते,जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर, प्रताप पाटील,पंचायत समिती सदस्या शीतल वणवे, पांडुरंग दराडे,सरपंच नकुशा दराडे, उपसरपंच संदीप दराडे, अंकुश पडळकर, बबन सोलनकर, कैलास वणवे ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

अवकाळी पावसामुळे मृत्युमुखी पडलेल्या पशुधनास नुकसान भरपाई तात्काळ देणार ; पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

0

सत्यवार्ता बातमी : अवकाळी पावसामुळे राज्यात पशुधनाची फार मोठे नुकसान झाले आहे .राज्यामध्ये १ डिसेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे लहान मोठी जनावरे मृत्युमुखी पडले आहेत .बारामती तालुक्यातील सुपा कुतवळवाडी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली राज्यभरात याचा फटका बसला असून पुणे जिल्ह्यामध्ये सुमारे २००० जनावरांची मृत्यू झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली तसेच सातारा जिल्ह्यामध्ये २०० जनावरे नाशिक जिल्ह्यामध्ये ५१५ जनावरे अहमदनगर जिल्ह्यामध्ये ७१३ जनावरे आणि रायगड येथे २ जनावरे मृत्यूमुखी पडल्याची माहिती देण्यात आले तसेच पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यात ७५०आंबेगाव तालुक्यात ४०३ शिरूर तालुक्यात ३८१ पुरंदर तालुक्यात १५० मावळ तालुक्यात ११० खेड तालुक्यात ९४ बारामती तालुक्यात ८८ दौंड तालुक्यात ४४ व हवेली तालुक्यात २३ एवढ्या मोठ्या प्रमाणावर जनावरांचा मृत्यू चा आकडा असून यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे यामध्ये पंचनामे सुरू असून कुणाचे राहिले असल्यास त्यांनी पशुसंवर्धन अधिकारी यांचे कडे जाऊन पंचनामे करून घेण्याच्या सूचना दिल्या.

राज्यमंत्री भरणे पुढे म्हणाले तसेच कानाडवाडी येथील लांडग्यांच्या हल्ल्यात २४ शेळ्या मृत्युमुखी पडल्याची घटनेचा आढावा घेऊन वनविभातील अधिकारी वर्गाला तात्काळ मूल्यांकन करून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या.अवकाळी पावसामुळे मृत्यूमुखी पडलेल्या शेळी मेंढी करिता ४ हजार रु, गाई करिता ४० हजार रु,बैल ३० हजार रु इतकी नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याची माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वासराव देवकाते, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी श्री मुकणे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे,आदी उपस्थित होते.

अकोले पोटनिवडणूक पहिल्याच दिवशी पाच उमेदवारी अर्ज दाखल ; निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता

0

सत्यवार्ता अकोले प्रतिनिधी :विजय गायकवाड
अकोले ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत असून आज अखेर पर्यंत पाच उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

गावातील प्रभाग दोन मधील एका रिक्त जागेसाठी निवडणूक होत असून आतापर्यंत पाच जणांनी शक्ती प्रदर्शन करीत इंदापूर येथे आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी दीपक कोकरे व सहाय्यक निवडणूक अधिकरी शिवाजी खोसे यांच्याकडे दाखल केला आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार अर्ज दाखल करण्यासाठी दि.६ डिसेंबर पर्यंत तर छाननी दि.७ डिसें.अर्ज माघार घेण्यासाठी व चिन्ह वाटप दि. ९ डिसें.पर्यंत तर मतदान २१ डिसें व मतमोजणी दि.२२ डिसेंबर रोजी होणार आहे.
मात्र अजून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तीन दिवस मुदत असून अर्जाची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तसेच अर्ज माघारी घेण्यासाठी कोणाचा दबाव येऊन माघार घ्यावी लागेल हे उमेदवारांना शेवटी ठरवावे लागणार आहे.सर्वाधिक इच्छुक उमेदवारांनी आज अर्ज दाखल केल्याने अखेर पर्यंत किती उमेदवार रिंगणात राहतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
१)तात्याबा विठ्ठल दराडे
२)खंडू गुलाब शिंदे
३)नंदाबाई ज्ञानदेव दराडे
४)दत्तात्रय विष्णू दराडे
५)गणेश वामन दराडे

यांनी आज पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत .

राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस महेश देवकातेपाटील यांना मातृशोक

0

भिगवण वार्ताहर.दि.२

राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र सरचिटणीस अॅड. महेश मारुतराव देवकातेपाटील यांच्या मातोश्री कै.सौ सुप्रिया मारुतराव देवकाते यांचे वयाच्या ६५ वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले.अतिशय प्रेमळ स्वभावाच्या सुप्रिया काकुच्या निधनामुळे भिगवण आणि परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

बारामती आणि इंदापूर तालुक्यातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आणि आपल्या बाणेदारवाणीने गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेला कायद्याच्या प्रकरणी मदत करणारे सिंघम वकील अशी महेश देवकाते यांची ओळख आहे.त्यांच्या मातोश्री कै.सुप्रिया काकू यांनी आपला संसार करीत असताना पती मारुतराव देवकाते यांच्या खांद्याला खांदा लावीत संसाराचा गाडा चालविला.प्रसंगी टेलरिंग दुकानातील कामात हातभार लावीत आपली दोन मुली आणि एक मुलगा यांना उच्च पद्धतीचे शिक्षण देवून त्यांना समाजापुढे उभे केले.मुलगा नामांकित वकील एक मुलगी वकील आणि नोटरी तर एक मुलीला अभियंता करण्याचे भीमकाय काम काकुनी पतीसह करून दाखविले.मागील काही वर्षापासून त्या शारीरिक व्याधींनी ग्रासल्या गेल्या होत्या.त्यांना सुरवातीच्या काळात मधुमेहाचा सामना करावा लागला तर त्यानंतर त्यांना अनेक वेळा डायलीसीस करावे लागत होते.राजकीय कारकीर्द न्यायालयातील कामकाज सिनेसुष्टीतील शुटींग या काहीवेळा बाजूला ठेवून अॅड. महेशदादा आपल्या आईची सेवा करण्यासाठी श्रावणबाळासारखे सदैव तत्पर असत. कणखर वाणी असणाऱ्या महेशदादांचे आपल्या मातोश्रीवर अतोनात प्रेम होते.त्यांच्या जाण्यामुळे देवकाते परिवार आणि महेशदादा मित्र परिवारावर दुखाचे सावट पसरले असल्याचे दिसून आले.