भिगवण वार्ताहर दि. 19
भिगवण येथील मराठी पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण व डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी(ता.20) सायंकाळी पाच वाजता येथील दुर्गामाता मंदिर येथे करण्यात आले असल्याची माहिती मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. तुषार क्षीरसागर व सोशल मिडिया सेलचे अध्यक्ष सागर जगदाळे यांनी दिली आहे.
वक्तृत्व स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्ताने ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस प्रथमच भिगवण येथे येणार असल्याचे संस्थांपक अध्यक्ष सुरेश पिसाळ यांनी सांगितले . सबनीस यांच्या व्याख्यानाचा आस्वाद घेण्यासाठी साहित्यप्रेमी व रसिक श्रोत्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
येथील मराठी पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने भिगवण व परिसरातील 20 शाळांमध्ये वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. शाळा व विभाग पातळीवर घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धांचे पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी(ता.२०) सायंकाळी पाच वाजता करण्यात आले आहे.
कार्यक्रमासाठी ८९ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे असणार आहेत. कार्यक्रमासाठी भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, सरपंच दिपीका क्षीरसागर,दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, भिगवण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजित क्षीरसागर, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष रियाज शेख, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. अमोल खानावरे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमांमध्ये 20 शाळांमधील वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या विदयार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे नियोजन मराठी पत्रकार संघाच्या मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस प्रथमच भिगवण शहरात ; मराठी पत्रकार संघाच्या कार्यक्रमात करणार मार्गदर्शन
आर पी आय (आठवले )गटाच्या जिल्हाध्यक्ष पदी विक्रम शेलार यांची बिनविरोध निवड ; कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढीत केला आनंद व्यक्त
भिगवण वार्ताहर.दि. 9
भिगवण येथील विक्रम शेलार यांची पुणे जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पक्षाच्या कार्यकर्त्यांना आनंद व्यक्त केला तसेच भिगवण गावामधुन सवादय मिरवणुक काढण्यात आली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पुणे जिल्हाध्यक्ष निवडीसाठी पुणे येथे पक्षाचे राज्य संघटक सचिव परशुराम वाडेकर यांचे अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. बैठकीसाठी प्रदेश उपाध्यक्ष असित गांगुर्डे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, संपर्क प्रमुख श्रीकांत कदम,पुणे शहराध्यक्ष शैलेश चव्हाण, भगवान गायकवाड,महिपाल वाघमारे व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पक्षाध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे सुचनेनुसार प्रदेश सचिव परशुराम वाडेकर यांनी विक्रम शेलार यांचे नाव पुणे जिल्हाध्यक्ष पदासाठी सुचविले त्यास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मान्यता दिली. त्यानंतर श्री. वाडेकर यांनी विक्रम शेलार यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आल्याचे जाहिर केले. यावेळी पक्षाच्या वतीने श्री. वाडेकर यांचे हस्ते श्री. शेलार यांचा सत्कार करण्यात आला. निवडीनंतर विक्रम शेलार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयांसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार आर्पण केला. त्यांच्या निवडीनंतर भिगवण येथे विविध सामाजिक संघटनाच्या वतीने सवादय मिरवणुक काढण्यात आले. तसेच येथील व्यापारी संघ, मराठी पत्रकार संघ ,भिगवण सराफ संघटना व विविध सामाजिक संघटनाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
विक्रम शेलार यांनी यापुर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या इंदापुर तालुकाध्यक्ष, तसेच पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी काम केले आहे.
निवडीनंतर बोलताना विक्रम शेलार म्हणाले, पक्ष कार्यकारिणीने माझ्यासारख्या ग्रामीण भागातील एकनिष्ठ कार्यकर्त्यांवर विश्वास दाखवुन मोठी जबाबदारी दिली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या विस्तारासाठी तसेच वंचित घटकासह शेतकरी, महिला यांना न्याय देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहेत.
तसेच राज्यभरातील गायरान जमिनीवरील घरकुल नियमित व्हावी यासाठी न्यायालयीन लढा उभारून वंचित घटकाना न्याय मिळविण्यासाठी काम करणार आहे.
तक्रारवाडी जिल्हा परिषद शाळेतील १७ विद्यार्थी शिष्यवृती परीक्षेत उत्तीर्ण
भिगवण वार्ताहर.दि.१०
तक्रारवाडी येथील पुणे जिल्हा प्राथमिक शाळेतील १७ विद्यार्थी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाली असल्याची माहिती मुख्याध्यापक राजेश नाचण यांनी दिली.इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळात तक्रारवाडी या एकमेव शाळेने हे घवघवीत यश संपादन केले आहे.
आजकाल खासगी शाळाकडे कल असणाऱ्या पालकांच्या डोळ्यात अंजन घालणारी हि गोष्ट म्हणावी लागेल.कारण सर्वसामान्य पालकांची मुळे ज्या शाळेत शिकतात अशा तक्रारवाडी शाळेतील १७ विद्यार्थी महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.आणि जिल्ह्यातील गुणवत्ता यादीत यातील कमीतकमी ६ विद्यार्थी चमकू शकतील असा मानस केंद्रप्रमुख हनुमंत देवकाते यांनी व्यक्त केला. यावेळी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार शिक्षण समितीचे अध्यक्ष मनोज वांझखडे यांनी केले.तर या यशस्वी विद्यार्थ्यांना मनीषा चौधरी ,विनोद घोगरे या वर्ग शिक्षकांनी मार्गदर्शन केले.यावेळी स्वाती पवार ,अर्चना गदादे , स्वेता कुलकर्णी ,संगीता शिंदे , सचिन गायकवाड,शरद भुजबळ ,संतोष कांबळे ,भारत गायकवाड विकास मुळे ,निलेश शिंदे यांनी गुणवंत विद्यार्थांना वहीपेन देत कौतुक केले.
भिगवण स्टेशन येथे भगवान गौतम बुद्धांची मूर्ती स्थापना ; पंचशील सेवा संघाचा उपक्रम
भिगवण वार्ताहर.दि.२
भिगवण रेल्वे स्टेशन येथे पंचशील सेवाभावी संस्थेच्या माधयामातून भगवान गौतम बुद्धांची ६ फुट उंचीची अष्टधातुची मूर्ती स्थापना करण्यात आली. भिक्कू संघाचे भंतीजींच्या उपासनेतून रविवारी सकाळी या प्रसन्न मूर्तीची स्थापना करण्यात आली.
जगाला शांततेच्या मार्गावर नेत हिंसा न करणे चोरी व्यभिचार तसेच खोटे आणि नशा न करणे या पंचशील तत्वाचे आचरण करण्यास सांगणाऱ्या भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीचे भिगवण स्टेशन येथे मिरवणुक काढून स्वागत करण्यात आले.माजी राज्यमंत्री दतात्रय भरणे तसेच माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत हि स्थापना करण्यात आली.नागपूर येथील गगन मलिक फाउंडेशन वतीने बुकिंग करून थायलंड येथून हि मूर्ती आणण्यात आली.अष्टधातुची आणि ६ फुट उंचीची अतिशय प्रसन्न मूर्तीचे भिगवण गावचे सरपंच तानाजी वायसे,पराग जाधव ,संजय देहाडे,बाळासाहेब भोसले,जावेद शेख ,कपिल भाकरे ,बाळासाहेब शेलार यांनी मिरवणुकी दरम्यान पूजन केले.भिगवण स्टेशन येथील वार्ड नं. 6 मधील बुद्धविहारात या मूर्तीची स्थापना करण्यात आली.यावेळी भीम गीतांचा कार्यक्रम आजोजित करण्यात आला होता.पंचशील मंडळाचे अध्यक्ष किरण कांबळे ,दत्तात्रेय मडपे ,रोहित मिसाळ ,आकाश देहाडे ,सोहेब मुलाणी ,दिगंबर मडपे ,अजित गायकवाड ,हनुमंत कदम,नितेश मडपे यांनी विशेष परिश्रम घेत या मूर्ती स्थापना कार्यक्रमाचे आयोजन केले.
शासकीय जागेत अतिक्रमण करणं भादलवाडीच्या सरपंचाला पडलं महागात ; ४ गुंठे जागेसाठी पदावरून व्हावं लागलं पायउतार
भिगवण वार्ताहर.दि.१५
शासकीय जागेत अतिक्रमण करणं भादलवाडी गावच्या सरपंच शिवाजी किसन कन्हेरकर यांना चांगलंच महागात पडलं .अतिक्रमण प्रकरणात दोषी ठरल्यामुळे पद रद्द करण्याचा आदेश अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड यांनी दिला.तर याच गावच्या महिला सदस्या सोनाली नितीन खटके यांना सदस्य पदावर अपात्र ठरविण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिला .
इंदापूर तालुक्यातील भादलवाडी गावातील हा प्रकार असून या गावच्या सरपंच शिवाजी किसन कन्हेरकर यांनी शासकीय गायरान जागेवर अतिक्रमण करून बांधकाम केले होते.याबाबत सामाजिक कार्यकर्ते बापू संभाजी भंडलकर यांनी जिल्हाधिकारी तसेच विभागीय कार्यालयात अपील दाखल केले होते.
तर सदस्या म्हणून पदावर असणाऱ्या सोनाली नितीन खटके यांचे सासरे जगन्नाथ वामन खटके यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करीत विहीर खोदली होती.तर सदस्या सोनाली आणि सासरे जगन्नाथ खटके हे एकत्र कुटुंबातील सदस्य असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील यांनी त्यांच्या बद्दल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अपील दाखल केले होते.या दोनही बाबतीत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख तसेच अतिर्रिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड यांना फिर्यादी यांच्या जबाबात आणि सादर केलेल्या कागदपत्रात तथ्य आढळून आले.यामुळे जिल्हाधिकारी यांनी सरपंच शिवाजी कन्हेरकर हे पदावर राहण्यास तसेच सोनाली खटके सदस्या पदावर अपात्र असल्याचा आदेश दिला.
यावेळी सदस्या सोनाली खटके यांनी आपला जाबजबाब देताना आपण विभक्त कुटुंब पद्धतीने राहत असून आपण कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण केले नसल्याचे सांगितले.मात्र तहसीलदार आणि मंडल अधिकारी यांचा अहवाल आणि निवडणुकीच्या तीन महिन्यापूर्वी विभक्त केलेले रेशनकार्ड याबाबींचा विचार करता त्यांना सदस्यपदावरून अपात्र ठरविण्यात आले.
***भादलवाडी गावच्या या निर्णयामुळे भिगवण परिसरातील ग्रामपंचायतीमध्ये अतिक्रमण करणार्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असल्याचे दिसून येत आहे . अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले की पद रिक्त केले जात आहे त्यामुळे यात कोणाकोणाचा नंबर लागणार हा चर्चेचा विषय ठरला आहे*
भिगवण गावच्या उपसरपंचपदी मुमताज शेख यांची बिनविरोध निवड ; गावच्या इतिहासात पहिल्यांदाच मुस्लीम समाजाला संधी
भिगवण वार्ताहर.दि.७
भिगवण गावच्या उपसरपंचपदी मुमताज जावेद शेख यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती ग्रामसेवक सतीश बोरावके यांनी दिली. शेख यांच्या निवडीमुळे भिगवण गावच्या इतिहासात पहिल्यांदाच मुस्लीम समाजाला न्याय मिळाला असल्याचे सांगण्यात आले.
राष्ट्रवादी पुरस्कृत पक्षाची सत्ता उलथवून बहुमताने सत्तेत आलेल्या भाजपा पुरस्कृत कार्यकारिणीने आपल्या उपसरपंच पदाचा कार्यकाळ पूर्ण होताच शीतल शिंदे यांचा राजीनामा घेतला.यावेळी रिकाम्या झालेल्या उपसरपंच पदासाठी कपिल भाकरे ,सत्यवान भोसले ,सईबाई खडके ,जयदीप जाधव तसेच मुमताज शेख इच्छुक होते.या निवडी बाबत अनेक दैनिकात उशीर होत असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या.मात्र कार्यकारिणीने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शन घेत सर्व सदस्यांच्या बैठका घेत सर्वानुमते मुमताज शेख यांच्या नावाला संमती दिली.आज सरपंच तानाजी वायसे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या निवडीत शेख यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या प्रमिला जाधव , अजित क्षीरसागर ,मानसिंग जाधव ,अशोक शिंदे ,अनिल देसाई ,ज्ञानदेव भरणे ,अशोक सोनटक्के यांनी उपसरपंच मुमताज शेख यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच मुमताज शेख यांनी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी उपसभापती पराग जाधव आणि पंचायत समिती उपसभापती संजय देहाडे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या साथीने भिगवण गावाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी कामकाज करणार असल्याचे सांगितले.
लहान मुलांना पळवून नेणारी टोळी आल्याच्या अफवांना जोर ; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे भिगवण पोलिसांचे आवाहन
भिगवण वार्ताहर.दि.६
भिगवण परिसरातील गावात लहान मुलांना पळवून नेणारी टोळी आली असल्याच्या अफवेमुळे दहशत निर्माण झाली असून अशा अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन भिगवण पोलीस अधिकारी दिलीप पवार यांनी केले आहे.तर मागील दोन दिवसापूर्वी तक्रारवाडी गावात तर आज मदनवाडी गावात एका संशयिताला नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.मात्र पोलिसांनी याची शहानिशा केली असता हि अफवा असल्याचे समोर आले.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार आज सकाळी बारामती मदनवाडी रोड वर एक अनोळखी इसम हातात वडापाव आणि कुरकुरे घेवून लहान मुलाला जवळ बोलावीत असल्याचे सांगण्यात आले.यामुळे हे लहान मुल घाबरून जावून घराकडे पळत सुटले.हि घटना घरी सांगताच नागरिक जमा होत या संशयिताला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.अगोदरच अफवा जोर घेत असल्यामुळे भिगवण पोलिसांनी तातडीने या संशयिताला ताब्यात घेत त्याची विचारपूस केली असता सदर इसम एका खासगी कंपनीत काम करणारा कामगार असल्याचे आणि आज सकाळी कंपनीत उशीर झाल्याने प्रवेश नाकारल्यामुळे घरी जाण्यासाठी रस्त्यावरील वाहनांना हात करत असल्याचे समोर आले.तर सदर इसमाची मानसिक आरोग्य ठीक नसल्याचे त्याच्या नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले.मात्र हि अफवा भिगवण आणि परिसरात वाऱ्याच्या वेगाने पसरली.आणि सर्व जन आपल्या पाल्याला सुखरूप आहे का याची चौकशी करू लागला होता. दोनच दिवसापूर्वी तक्रारवाडी गावात एक अनोळखी इसम लहान मुलीला चॉकलेट देण्यासाठी जवळ बोलावीत असल्यची अफवा पसरली होती.यावेळी पभिगवण पोलिसांनी सर्व परिसर पिंजून काढला मात्र हि सुधा अफवाच असल्याचे दिसून आले.
याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले.तसेच भिगवण पोलिसांनी निर्भया पथक ,बीट मार्शल तसेच पेट्रोलिंग वाढविले असून याबाबत कोणतीही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे सांगितले.तसेच कोणत्याही संशयित अनोळखी नागरिकाला मारहाण न करता पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आवाहन केले.
भिगवणमध्ये दुकानचा पत्रा कापून किराणा मालाची चोरी ;
भिगवण वार्ताहर.दि.२४
किराणा मालाच्या दुकानाचा पाठीमागे असणारा पत्रा कापून ५८ हजार ४८० रुपयाचा किराणा माल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना भिगवण येथे घडली.तर पाठीमागे याच दुकानदाराला ५० हजार रुपयाचा चुना लावून भामट्याने किराणा नेला त्याचाच तपास लागला नसतानाच हि घरफोडी घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
याबाबत अजिनाथ वसंत कवितके या किराणा व्यावसायिकाने भिगवण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.कवितके यांचे भिगवण येथे दुकान असून १९ तारखेला सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानातील माल लंपास झाल्याचे लक्षात आले.यावेळी त्यांनी दुकानाची पाहणी केली असता त्यांना पाठीमागील बाजूचा पत्रा कापून कोणीतरी आत येत माल लंपास केल्याचे लक्षात आले.त्यांनी तातडीने याची माहिती भिगवण पोलीस ठाण्यात देत अज्ञात आरोपी विरोधात घरफोडी तसेच चोरीची तक्रार दिली.यात जवळपास ५८ हजार ४८० रुपयाचा किराणा माल गेल्याची तक्रार देण्यात आली आहे.
या चोरी झालेल्या दुकानात काही दिवसापूर्वी एका भामट्याने घरी लग्नाचा कार्यक्रम आहे असे सांगून ५० हजार रुपयाचा माल सोबत घेत पोबारा केला होता.या गुन्ह्याचा तपास भिगवण पोलीस करत असतानाच दुकानात परत चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.यात दोन्ही वेळेला दुकानदाराचे नुकसान झाले असून आता पोलीस तपास कसा करतात याकडे भिगवण करांचे लक्ष लागून राहिले आहे.सदर चोरीचा तपास भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस हवालदार समीर करे करीत आहेत.
























