पुणे सोलापूर महामार्ग ठरतोय जीवघेणा ; अपघात टाळण्यासाठी उपाय योजना करताना महामार्ग प्रशासन ठरतोय अपयशी
भिगवण वार्ताहर. दि. 12
पुणे सोलापूर महामार्ग जीवघेणा ठरत असताना स्थानिक नागरिकांना सुरक्षित प्रवास करण्यासाठी निर्माण करण्यात आलेला सेवा मार्गही अपघाती ठरत असल्याचे दिसून येत आहे. कारण याच भिगवण ते भादलवाडी सर्व्हिस रोडवर अज्ञात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी भिगवण पोलिस ठाण्यात अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिगवण पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास मौजे भादलवाडी (ता. इंदापूर, जि. पुणे) हद्दीत बिल्ट कंपनीच्या बी कॉलनी गेटजवळ, आयडीबीआय एटीएमसमोर भिगवण–भादलवाडी सर्व्हिस रोडवर हा अपघात घडला.
या अपघातात अजित दगडु वाळके (वय ५४, रा. माऊली अपार्टमेंट, फ्लॅट क्र. ९, भिगवण) यांचा मृत्यू झाला. ते आपल्या होंडा स्प्लेंडर (MH-४५-L-५९८०) या दुचाकीवरून भिगवणकडे जात असताना भादलवाडीच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात ट्रकने त्यांच्या दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली.
या धडकेत अजित वाळके यांना गंभीर दुखापत झाली. अपघातात त्यांचे पोट फाटून गंभीर जखम झाली तसेच हात-पायांना दुखापत झाली. या जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळी न थांबता वाहनासह फरार झाला.
या प्रकरणी अनिकेत अजित वाळके (वय २३) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिगवण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजि. नं. ५६/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६(१), १२५(A), १२५(B), २८१, ३२४(४) तसेच मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४, १३४/१७७ अंतर्गत अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या गुन्ह्याची नोंद दि. १२ मार्च २०२६ रोजी पहाटे १.०४ वाजता करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास पीएसआय अमित पाटील हे करीत असल्याची माहिती देण्यात आली.
























