उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या शिष्टाईला यश: अमर बौद्ध युवक संघटनेचे आमरण उपोषण काही दिवसासाठी स्थगित

0
299

भिगवण दि. 4

मदनवाडी येथे महसूल विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा न ठेवल्याच्या निषेधार्थ अमर बौद्ध युवक संघटनेने सुरू केलेले आमरण उपोषण अखेर स्थगित करण्यात आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी (DYSP) चैतन्य कदम यांनी केलेल्या मध्यस्थी आणि यशस्वी शिष्टाईनंतर हा निर्णय घेण्यात आला, ज्यामुळे भिगवण बाजारपेठेतील तणावाचे वातावरण निवळले आहे.​

पोलीस ठाण्यात पार पडली सकारात्मक चर्चा

​घटनेचे गांभीर्य ओळखून माजी सरपंच प्रशांत शेलार, देवानंद शेलार, बाळासाहेब शेलार यांच्यासह समाजातील प्रमुखांनी उपोषणकर्ते रोहित शेलार, अनिकेत भिसे आणि अमोल कांबळे यांची भेट घेत त्यांना सोबत घेऊन भिगवण पोलीस ठाण्यात DYSP चैतन्य कदम यांची चर्चेसाठी भेट घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत आपला मुद्दा ठामपणे मांडत आंदोलकांनी या चुकीस कारणीभूत असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली.​

यावर बोलताना DYSP कदम यांनी कायदेशीर तांत्रिक बाबी स्पष्ट करत, असा गुन्हा थेट दाखल करणे शक्य नसले तरी प्रांत अधिकाऱ्यांसोबत उपोषणकर्त्यांची बैठक घडवून आणून या प्रश्नातून योग्य मार्ग काढण्याचे ठोस आश्वासन दिले. या चर्चे दरम्यान महसूल विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.​

आंदोलन काही दिवसांसाठी स्थगित​

डी. वाय. एस. पी यांच्या सोबत झालेल्या सकारात्मक चर्चे नंतर माजी सरपंच प्रशांत शेलार आणि देवानंद शेलार यांनी समाजातर्फे महत्त्वाची भूमिका बजावत आंदोलकांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. या मध्यस्थीला मान देऊन आंदोलकांनी उपोषण काही दिवस स्थगित करण्यास सहमती दर्शवली.​

सरबत पाजून उपोषणाची समाप्ती

​आंदोलकांच्या विनंतीवरून DYSP चैतन्य कदम यांनी स्वतः उपोषणस्थळी भेट दिली. प्रभारी पोलीस अधिकारी सोमनाथ शेंडगे, पीएसआय अमित पाटील आणि पोलीस हवालदार महेश उगले यांच्या उपस्थितीत DYSP कदम यांनी उपोषणकर्त्यांना सरबत पाजून आमरण उपोषण अधिकृतपणे स्थगित केले. उपोषण समाप्तीच्या वेळी उपस्थित समाजबांधवांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा जयघोष केला.​

कृतज्ञता व्यक्त:

या आंदोलनात अग्रभागी असणारे उपोषणकर्ते अमोल कांबळे, रोहित शेलार, अनिकेत भिसे, किरण कांबळे, संदीप वाघमारे, प्रेम लोंढे, रोहन निकाळजे आणि अभी लोंढे यांचे सर्व समाजबांधवांच्या वतीने विशेष आभार व्यक्त करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here