​भिगवणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या अवमानावरून तीव्र संताप; अमर बौद्ध संघटनेचे आमरण उपोषण, भिगवण बंदला शंभर टक्के प्रतिसाद

0
33

भिगवण वार्ताहर | दि. 3

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे तसेच दिवंगत अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून महसूल विभागाने आयोजित केलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व कार्यक्रमात’ संविधानाचे जनक व कायदेपंडित विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा न लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रशासनाच्या या बेजबाबदार व निष्काळजी भूमिकेमुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेत तीव्र संतापाची लाट पसरली असून, या निषेधार्थ अमर बौद्ध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला भिगवण, तक्रारवाडी आणि मदनवाडी येथील व्यापाऱ्यांनी १०० टक्के पाठिंबा देत आपले व्यवहार पूर्णपणे बंद ठेवले.

​तालुक्याचे तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने या शासकीय शिबिराचे आयोजन केले होते. कोणत्याही शासकीय कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करणे बंधनकारक असल्याचा स्पष्ट शासन आदेश असतानाही, महसूल विभागाने प्रतिमा न ठेवून डॉ. बाबासाहेबांचा एकप्रकारे अवमानच केला आहे, असा आरोप उपोषणकर्ते शरद चितारे व अनिकेत भिसे यांनी केला. तसेच या हलगर्जीपणाबद्दल जबाबदार आयोजकांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

​आंदोलक अमोल कांबळे व रोहित शेलार यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, “तहसीलदारांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा प्रामुख्याने लावणे आवश्यक होते. मात्र प्रशासनाने यात अक्षम्य हलगर्जीपणा दाखवला असून यामुळे संपूर्ण समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे.”

​दरम्यान, प्रशासनाच्या या भूमिकेचा निषेध नोंदवण्यासाठी अमर बौद्ध संघटनेच्याअमोल कांबळे,रोहित शेलार,अनिकेत भिसे, किरण कांबळे, संदीप वाघमारे,प्रेम लोंढे,रोहन निकाळजे,अभी लोंढे या आठ भीमसैनिक पदाधिकाऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले असून, त्यांना पाठिंबा देण्यासाठी रिपब्लिकन पार्टीचे विक्रमभाऊ शेलार, हिंदू खाटीक समाज अध्यक्ष सचिन खडके, देवानंद शेलार, संजय देहाडे, सचिन आढाव,बाळासाहेब शेलार व सनी शेलार,गणेश शेलार यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी माजी उपसभापती पराग जाधव, सचिन बोगावत, तुषार क्षीरसागर, महेश शेंडगे, दत्तात्रय पाचांगणे, गणेश वायदंडे यांनी उपस्थिती लावली.यावेळी बहुसंख्येने तालुक्यातील उपस्थित आंबेडकरवादी तरुणांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दुमदुमून टाकला.

मच्छी मार्केटसह दैनंदिन व्यवहार ठप्प; लाखोंची उलाढाल थांबली

​आंदोलनाला पाठिंबा म्हणून भिगवण, तक्रारवाडी आणि मदनवाडी परिसरातील सर्व दुकानदारांनी व व्यापाऱ्यांनी आपले व्यवसाय कडकडीत बंद ठेवले. दररोज लाखोंची उलाढाल होणाऱ्या प्रसिद्ध भिगवण मच्छी मार्केटमध्ये आज पूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळाला. सर्वपक्षीय व सर्वसमाजाच्या पाठिंब्यामुळे भिगवण परिसरातील बंद यशस्वी झाला.

यावेळी भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सोमनाथ शेंडगे यांनी आंदोलकांची भेट घेत भूमिका समजून घेतली. तर दिवसभर पोलिसांनी आंदोलन स्थळी चोख बंदोबस्त लावल्याचे पाहवयास मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here