भिगवण वार्ताहर.दि.६
भिगवण परिसरातील गावात लहान मुलांना पळवून नेणारी टोळी आली असल्याच्या अफवेमुळे दहशत निर्माण झाली असून अशा अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन भिगवण पोलीस अधिकारी दिलीप पवार यांनी केले आहे.तर मागील दोन दिवसापूर्वी तक्रारवाडी गावात तर आज मदनवाडी गावात एका संशयिताला नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.मात्र पोलिसांनी याची शहानिशा केली असता हि अफवा असल्याचे समोर आले.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार आज सकाळी बारामती मदनवाडी रोड वर एक अनोळखी इसम हातात वडापाव आणि कुरकुरे घेवून लहान मुलाला जवळ बोलावीत असल्याचे सांगण्यात आले.यामुळे हे लहान मुल घाबरून जावून घराकडे पळत सुटले.हि घटना घरी सांगताच नागरिक जमा होत या संशयिताला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.अगोदरच अफवा जोर घेत असल्यामुळे भिगवण पोलिसांनी तातडीने या संशयिताला ताब्यात घेत त्याची विचारपूस केली असता सदर इसम एका खासगी कंपनीत काम करणारा कामगार असल्याचे आणि आज सकाळी कंपनीत उशीर झाल्याने प्रवेश नाकारल्यामुळे घरी जाण्यासाठी रस्त्यावरील वाहनांना हात करत असल्याचे समोर आले.तर सदर इसमाची मानसिक आरोग्य ठीक नसल्याचे त्याच्या नातेवाइकांनी पोलिसांना सांगितले.मात्र हि अफवा भिगवण आणि परिसरात वाऱ्याच्या वेगाने पसरली.आणि सर्व जन आपल्या पाल्याला सुखरूप आहे का याची चौकशी करू लागला होता. दोनच दिवसापूर्वी तक्रारवाडी गावात एक अनोळखी इसम लहान मुलीला चॉकलेट देण्यासाठी जवळ बोलावीत असल्यची अफवा पसरली होती.यावेळी पभिगवण पोलिसांनी सर्व परिसर पिंजून काढला मात्र हि सुधा अफवाच असल्याचे दिसून आले.
याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले.तसेच भिगवण पोलिसांनी निर्भया पथक ,बीट मार्शल तसेच पेट्रोलिंग वाढविले असून याबाबत कोणतीही माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे सांगितले.तसेच कोणत्याही संशयित अनोळखी नागरिकाला मारहाण न करता पोलिसांच्या ताब्यात देण्याचे आवाहन केले.