भिगवण वार्ताहर.दि.२१
तक्रारवाडी गावात वाढत असलेल्या अतिक्रमणाचा फटका विकास कामांना बसत असून दोन बाजूच्या प्लॉट धारकांच्या तक्रारी मुळे सदर ठिकाणचा रस्ता थांबविण्याची वेळ ग्रामपंचायत प्रशासनावर आली असल्याचे दिसून आले.तर कमी रुंदीच्या रस्त्यामुळे अतिक्रमणाला खतपाणी मिळत असल्याचे वास्तव आहे.
तक्रारवाडी गावात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून सिमेंट रस्त्याचे काम सुरु करण्यात आले आहे.पीरसाहेब मंदिराच्या दक्षिण बाजूला असणाऱ्या रस्त्यावर गेली चार दिवसापूर्वी काम सुरु झालेला रस्ता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.पुनर्वसन विभागाने दोनही बाजूच्या प्लॉटसाठी १८ फुटाचा रस्ता ठेवला आहे.तर याठिकाणी ग्रामपंचायत विभागाने १२ फुट रुंदीचा सिमेंट रस्त्याचे काम सुरु केले आहे.मात्र दोन्ही बाजूचे नागरिक आमच्या बाजूला रस्ता घेवू नका मध्यापासून काम करा अशी मागणी करीत रस्त्याला विरोध करीत आहेत.त्यामुळे गेली ४ दिवस काम बंद पडले असून याबाबत बिडीओ आणि तहसीलदार यांच्याकडे तक्रारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.त्यामुळे अखेर ग्रामसेवक सतीश बोरावके आणि सरपंच सतीश वाघ यांनी या ठिकाणी भेट देत जोपर्यंत वाद मिटत नाही तो पर्यंत काम बंद ठेवण्या ऐवजी पुढील भागात काम करण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे अखेर सरकारी जागेवर असणाऱ्या रस्त्याला सुद्धा अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे दिसून आले.
याबाबत तक्रारदार संदीप वाघ यांनी आपली भूमिका रस्ता अडविण्याची नसून रस्त्याचा मध्यभाग काढून रस्ता करण्याची आहे.समोरील बाजूने अतिक्रमण झाल्यामुळे आमच्या बाजूला रस्ता वळविण्याचे काम केले जात याला आमचा विरोध असल्याचे सांगितले.
याविषयी सरपंच सतीश वाघ यांनी सदरच्या ठिकाणी विकास कामात अडथळा आणण्याचे काम केले जात असल्याचे सांगितले १८ फुट रस्ता असताना १२ फुटाचे काम करण्यास अडथळा केला जात असेल तर हे योग्य नसल्याचे सांगितले. याठिकाणी तात्पुरता वाद असल्यामुळे पुढच्या टप्यातील काम सुरु केल्याचे सांगितले.