भिगवण वार्ताहर.दि.९
भिगवण पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कोनशिलेचे उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले .
भिगवण येथे पोलीस चौकीला ओगस्ट २०१४ साली पोलीस स्टेशनचा दर्जा प्राप्त झाला.यावेळी तीन चार खोल्यातून कामकाज पाहिले जात होते.तीन जिल्हे आणि पाच तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या भिगवण पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५ गावे आणि १० वाड्या वस्त्या येतात.तर राष्ट्रीय महामार्ग पुणे सोलापूर या ठिकाणी जात असल्यामुळे अपघात आणि चोरीच्या घटना सातत्याने घडत असतात त्यामुळे अपुऱ्या जागेत कामकाज करताना अडचणी येत होत्या.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नामुळे पोलीस ठाण्याच्या नव्या इमारती साठी २ कोटी ३३ लाख रुपयाचा निधी देण्यात आल्याने आज इमारतीचा भूमिपूजन कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी बोलताना ना.भरणे यांनी भिगवणची बाजारपेठ मोठी असल्यामुळे पोलीस ठाण्याच्या कामाचा व्याप मोठा आहे पोलिसांना चांगल्याप्रकारे काम करण्यासाठी इमारतीची आवश्यकता होती ती आता पूर्ण होणार असल्याचे सांगितले.तसेच भिगवण जिल्हा परिषद गटात जवळपास ११०७ कोटी रुपयांचा रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर झाल्याचे सांगितले .तालुक्यातील इतर रस्त्यांना निधी मंजूर झाल्याची माहिती दिली.तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता तालुक्यातील कामासाठी निधी मिळविण्यासाठी डोके लागते असा टोला मारला.तर मंजूर केलेल्या कामाचे रोज नारळ फोडले तरी दिवस कमी पडतील असे सांगितले.
यावेळी बोलताना अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी इंदापूर आणि बारामती भागातील सर्व पोलीस ठाण्याच्या इमारती बांधकाम करण्याचे काम सुरु असल्याचे सांगितले .तर भिगवण पोलीस ठाण्याच्या इमारती साठी लागणाऱ्या सर्व परवानगी कमी वेळेत पूर्ण झाल्याचा आनंद असल्याचे सांगितले.यावेळी कंत्राटदार दतात्रय आरडे यांनी पोलीस ठाण्याचे काम ८ महिन्यात पूर्ण करू असा शब्द ना.भरणे यांना दिला. यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे विभागीय अधिकारी एम.एम.सुर्वे ,शाखा अधिकारी आर ,एल ,चौधरी ,कनिष्ट अभियंता अमोल कावडे , जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर , डी .एन.जगताप ,आबासाहेब देवकाते ,अजिक्य माडगे ,महेश शेंडगे ,संदीप वाकसे ,डॉ.अमोल खानावरे ,प्रमोद नरुटे उपस्थित होते. प्रास्ताविक अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी तर आभार मानण्याचे काम सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी केले.
चौकट : यावेळी बोलताना ना .भरणे यांनी कार्यकर्त्यांच्या कानपिचक्या घेत ” नेते न बनता कार्यकर्ते बना ” असे सांगितले तर ” लोकांची सेवा केली तरच तुम्हाला लोक ओळखतील ” असे सांगून अप्रत्यक्षपणे ग्रामपंचायतीत झालेल्या पराभवाची जाणीव कार्यकर्त्यांना करून दिली.