भिगवण वार्ताहर.दि.१४
महापुरुषांची जयंती नाचून साजरी न करता ती वाचून साजरी करावी असा विचार भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडला होता. त्यांच्या याच विचाराचा आदर्श समाजासमोर ठेवून भिगवण येथील समता फौंडेशन यांनी ‘ वाचू संविधान १० तास ’या स्पर्धेचे आयोजन करीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना १३२ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
महापुरुषांची जयंती म्हणजे डीजेचा कर्णकर्कश आवाज आणि काळजाचे ठोके वाढवीत बेधुंद तरुणांचा नाच परंतु या डीजेला फाटा देत समता फौंडेशन या सामाजिक संस्थेने भिगवण येथील तारादेवी लोन्स येथे या चला वाचू संविधान आगळ्या वेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेतील विजयी उमेदवारांसाठी रोख रक्कम बक्षीस पारितोषिक आणि सर्टिफिकेट देण्यात येणार आहेत.सकाळी ७ वाजता सुरु झालेली स्पर्धा १० तास सुरु राहणार आहे.या स्पर्धेला १९६ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला.स्पर्धा सुरु झाल्यानंतर प्रत्येक स्पर्धकाला १०० गुण दिले गेले त्यातून त्याच्या एकूण शिस्त पालनाच्या पाहणीतून गुण वजा केले जाणार असल्याचे आयोजक संजय देहाडे यांनी सांगितले.या वेळी भिगवण गावच्या सरपंच दीपिका क्षीरसागर ,पराग जाधव , पोलीस अधिकारी दिलीप पवार ,जयदीप जाधव ,पांडुरंग जगताप ,संकेत मोरे ,राजकुमार मस्कर , जयप्रकाश खरड ,अनिल तांबे ,कमलेश गांधी भेट देत सुभेच्छा दिल्या.या स्पर्धेच्या परीक्षक म्हणून कला महाविद्यालय ,दत्तकला शिक्षण संस्था आणि प्राथमिक शाळा भिगवण यांच्या शिक्षकांनी काम पाहिले.
या उपक्रमाचा बक्षीस वितरण सोहळा २१ मे रोजी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.