भिगवण वार्ताहर.दि.३०
भिगवण पोलीस ठाणे हद्दीतील विटभट्टीवरील काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असणाऱ्या संशयिताने चिंचेच्या झाडाला लटकावून गळफास घेत आपले जीवन संपविल्याची घटना घडली. समाजातील बदनामी आणि पोलिसांचा अटकेचा ससेमिरा पाठीमागे लागण्याच्या विवंचनेतून आत्महत्या केली असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अर्जुन उर्फ अजित रामभाऊ कुंभार वय ४० वर्ष रा.शेटफळगडे असे गळफास घेवून जीव देणाऱ्याचे नाव आहे.मयत अर्जुन वर भिगवण पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून गरोदर ठेवल्याचा आरोप करण्यात आलेला आहे.भिगवण पोलिसांनी यातील दुसरा आरोपी रमेश रघुनाथ मोरे याला गुन्हा दाखल झालेल्या दिवशीच अटक केली होती.तर दुसरा संशयित मयत अर्जुन याचा शोध पोलीस घेत होते.मात्र शनिवारी रात्री ११ च्या सुमारास बारामती भिगवण रोड शेजारील किरण वडूजकर यांच्या शेतात चिंचेच्या झाडाला दोरीच्या सहायाने गळफास घेत अर्जुन याने जीव दिला.याबाबत पिंटू रामभाऊ कुंभार यांनी भिगवण पोलिसांना खबर दिली आहे.भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार , बारामती विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे याबाबतचा अधिकचा तपास करीत आहेत .