शासकीय जागेत अतिक्रमण करणं भादलवाडीच्या सरपंचाला पडलं महागात ; ४ गुंठे जागेसाठी पदावरून व्हावं लागलं पायउतार

0
700

भिगवण वार्ताहर.दि.१५

शासकीय जागेत अतिक्रमण करणं भादलवाडी गावच्या सरपंच शिवाजी किसन कन्हेरकर यांना चांगलंच महागात पडलं .अतिक्रमण प्रकरणात दोषी ठरल्यामुळे पद रद्द करण्याचा आदेश अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड यांनी दिला.तर याच गावच्या महिला सदस्या सोनाली नितीन खटके यांना सदस्य पदावर अपात्र ठरविण्यात आल्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिला .

इंदापूर तालुक्यातील भादलवाडी गावातील हा प्रकार असून या गावच्या सरपंच शिवाजी किसन कन्हेरकर यांनी शासकीय गायरान जागेवर अतिक्रमण करून बांधकाम केले होते.याबाबत सामाजिक कार्यकर्ते बापू संभाजी भंडलकर यांनी जिल्हाधिकारी तसेच विभागीय कार्यालयात अपील दाखल केले होते.
तर सदस्या म्हणून पदावर असणाऱ्या सोनाली नितीन खटके यांचे सासरे जगन्नाथ वामन खटके यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण करीत विहीर खोदली होती.तर सदस्या सोनाली आणि सासरे जगन्नाथ खटके हे एकत्र कुटुंबातील सदस्य असल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील यांनी त्यांच्या बद्दल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अपील दाखल केले होते.या दोनही बाबतीत जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख तसेच अतिर्रिक्त विभागीय आयुक्त अनिल रामोड यांना फिर्यादी यांच्या जबाबात आणि सादर केलेल्या कागदपत्रात तथ्य आढळून आले.यामुळे जिल्हाधिकारी यांनी सरपंच शिवाजी कन्हेरकर हे पदावर राहण्यास तसेच सोनाली खटके सदस्या पदावर अपात्र असल्याचा आदेश दिला.

यावेळी सदस्या सोनाली खटके यांनी आपला जाबजबाब देताना आपण विभक्त कुटुंब पद्धतीने राहत असून आपण कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण केले नसल्याचे सांगितले.मात्र तहसीलदार आणि मंडल अधिकारी यांचा अहवाल आणि निवडणुकीच्या तीन महिन्यापूर्वी विभक्त केलेले रेशनकार्ड याबाबींचा विचार करता त्यांना सदस्यपदावरून अपात्र ठरविण्यात आले.


***भादलवाडी गावच्या या निर्णयामुळे भिगवण परिसरातील ग्रामपंचायतीमध्ये अतिक्रमण करणार्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असल्याचे दिसून येत आहे . अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले की पद रिक्त केले जात आहे त्यामुळे यात कोणाकोणाचा नंबर लागणार हा चर्चेचा विषय ठरला आहे*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here