भिगवण वार्ताहर.दि.२३
भिगवण बारामती मार्गावर पिंपळे गावच्या हद्दीत उस वाहतूक करणाऱ्या वाहनाखाली चिरडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे १.३० च्या सुमारास घडली.उस तोडणीच्या हंगामातील हा दुसरा अपघातातील बळी असून अजून किती बळी गेल्यावर कारखाना प्रशासन आणि परिवहन विभाग जागा होणार ? असा प्रश्न नागरिक विचारीत आहेत.तर हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय मृत व्यक्तींच्या नातेवाईक करीत आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हरी आण्णा धोत्रे वय.२७ रा.मदनवाडीची भकासवाडी असे अपघातात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.पिंपळे गावाच्या हद्दीत वीट कारखान्याच्या पूर्व दिशेला हा अपघात घडला असून अपघातात धोत्रे याचा जागीच मृत्यू झाला.तर त्याच्या ताब्यात असणाऱ्या दुचाकीचा अगदी चुराडा झाला आहे.तर वाहन चालक अपघात झाल्यानंतर वाहन जाग्यावरच सोडून पळून गेला असल्याची माहिती मिळत आहे. बेदरकारपणे चालणाऱ्या उस वाहतुकीमुळे अनेक निष्पाप नागरिकांचे जीव जात असून कारखाना प्रशासन आणि परिवहन विभाग मात्र काहीच उपाययोजना करीत नसल्याचे जाणवून येत आहे.भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांनी वेळोवेळी कारखाना प्रशासनाला सूचना देवूनही अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना केली गेली नाही.तर ओव्हरलोड वाहने ,विना लायसन्स ड्रायव्हर ,विना पासिंग वाहने ,विना रीप्लेकटर वाहने ,दारू पिवून चालवली जाणारी वाहने यांच्यावर परिवहन विभागाला कारवाई करण्यासाठी वेळ उपलब्ध नाही काय असा प्रश्न निर्माण होत आहे .तर अपघातात घरातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे निर्माण होणारी स्थिती कारखानदार आणि वाहतूकदार यांना समजत नसल्यामुळे माणसे अशीच किड्यामुंग्या सारखी चिरडली जात राहणार अशी परीस्थिती दिसून येत आहे.
आज अपघातात मृत्यू झालेल्या हरी धोत्रे यांच्या नातेवाईकांना हा अपघात नसून ज्या दोन व्यक्ती हरी यांना सोबत घेवून गेल्या त्यांनीच काही घातपात केल्याचा संशय आहे .याबाबत अनेक नातेवाईक ग्रामीण रुग्णालय येथे जमा होवून त्यांनी या प्रकरणी सखोल तपास व्हावा अशी मागणी केली आहे .


















