अतिक्रमण आणि वाहतूक कोंडीने गुदमरला भिगवण बाजारपेठेचा श्वास ; भिगवण ग्रामपंचायत आणि पोलिसांनी कारवाई करण्याची होतेय मागणी

0
430

भिगवण वार्ताहर. दि. 4

भिगवण बाजारपेठ तीन जिल्ह्यातील आणि चार तालुक्यातील जवळपास 30 गावे आणि 20 वाडीवस्ती वरील ग्राहकांसाठी रोज लागणाऱ्या वस्तू खरेदी साठी योग्य ठिकाण मानले जाते. मात्र या ठिकाणी वाढत असलेले अतिक्रमण आणि काही आपलाच व्यवसाय व्हावा स्वार्थी वृतीच्या व्यापारी वर्गामुळे बाजारपेठेतील रस्ते कोंडले जात असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक ग्रामपंचायत प्रशासन आणि पोलिसांनी यावर कारवाई करावी अशी मागणी करत आहेत.

उजनी धरणाच्या निर्मिती नंतर भिगवण बाजारपेठ नाव लौकिक वाढीस लागला. या ग्रामीण भागाची शहरी भागाकडे वाटचाल सुरु झाली. ग्राहकांना रोज आवश्यक असणाऱ्या वस्तू आणि सेवा अगदी योग्य किंमतीत मिळू लागल्याने आसपास च्या खेडेगावातील ग्राहक या बाजारपेठेकडे आकर्षित झाला. दळण वळणाच्या सुविधेत दिवसेंदिवस वाढ झाल्यामुळे दिलासा वाढू लागला. बाजार समिती आणि ग्रामपंचायत प्रशासनाने भाजीपाला आणि धान्य बाजार तसेच शेळी मेंढी यांचा व्यवसाय वाढीस लागावा यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या. मात्र बाजारपेठ वाढ होत असतानाच अतिक्रमनाचा महामेरू वाढीस लागल्यामुळे याचा त्रास सर्वसामान्य ग्राहक तसेच व्यापारी वर्गाला होऊ लागला आहे. भिगवण ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासन यांचा योग्य मेळ बसत नसल्यामुळे अतिक्रमण करणारांची मस्ती वाढत असून याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. भिगवण पोलिसांनी बाजारपेठेत वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी अगदी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून पी 1 पी 2 सारखी वाहतूक व्यवस्था मंजूर करून आणली होती. मात्र काही नतदृष्ट राजकीय पुढारी आणि राजकीय पाठबळ असणारया काही व्यापाऱ्यांनी विरोध करीत ही योजना बासनात गुंडाळून ठेवण्यासाठी विरोध केला. याचा फटका त्या व्यापारी वर्गाला बसला असून वाहतूक कोंडी नसणाऱ्या ठिकाणी ग्राहक खरेदीला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. राजकीय गणित आणि पोलिसांच्या शांत संयमी भूमीके मुळे अतिक्रमण करणारांचे धाडस वाढत असून हे बाजारपेठेच्या सर्वांगीण आरोग्यासाठी घातक ठरत आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक वर्ग आणि व्यापारी वर्गातून हे अतिक्रमण काढण्याची आणि वाहतूक कोंडी सोडविण्याची मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here