भिगवण पोलीस आणि महामार्ग पोलीस करत आहेत अपघात कमी होण्यासाठी रोज प्रयत्न आणि जनजागृती; परिवहन विभाग आणि कारखाना प्रशासन हि ऍक्शन मोड वर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना सुरु.
भिगवण वार्ताहर. दि. 13
भिगवण बारामती मार्गांवर निरगुडे पाटीजवळ उस वाहतूक करणाऱ्या ट्रॅकटर ट्रॉलीचा आणि दुचाकी स्वाराचा अपघात होऊन दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. उस वाहतूकीच हा 6 वा बळी असून अजून किती बळी गेल्यावर अपघात थांबणार हे न उलघडणार कोडे आहे.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार संतोष नारायण हिरवे वय 51 रा. तांदूळवाडी बारामती यांचा या अपघातात मृत्यू झाला. हिरवे हे कल्याणी कंपनीचे कामगार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.भिगवण बाजूने बारामती बाजूला जाणाऱ्या उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉली आणि दुचाकी यांचा अपघात झाला. या अपघातात त्यांच्या खांद्याच्या उजवी बाजूमध्ये उस अथवा लोखंडी रॉड घुसल्याने गंभीर जखमा झाल्याचे दिसून आले. यात त्यांची बरगडी तुटल्याने रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे . यावेळी भिगवण येथील आपुलकीची सेवा ऍम्ब्युलन्सचे संचालक केतन वाघ यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी तक्रारवाडी येथील लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये दाखल केले मात्र उपचाराअगोदरच त्यांनी आपले प्राण गमावले होते. अपघात घडल्यावर ट्रॅक्टर ड्रायव्हर हा अपघात स्थळापासून पळून गेल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
उस वाहतूकीचा विषय दिवसेंदिवस गंभीर होत असून कारखाना प्रशासन तसेच परिवहन विभाग अनेक उपाय योजना राबवीत असताना आणि भिगवण पोलीस तसेच महामार्ग पोलीस रोज कारवाया तसेच जनजागृती करत असताना अपघाताचे प्रमाण कमी होताना दिसून येत नाही.
अपघाताची खबर घेण्याचे काम भिगवण पोलीस रात्री उशिरा पर्यंत करत होते.शववीच्छेदन करण्यासाठी मृतदेह भिगवण ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आले आहे. पुढील तपास भिगवण पोलीस करणार आहेत.



















