भिगवण वार्ताहर .दि.७
भिगवण पोलिसांनी धाडसी कारवाई करीत सोशल मिडीयाच्या माध्यमातून ओळख करीत विश्वास संपादित झालेल्या अबलेच्या सोन्यावर डल्ला मारून शरीराचे लचके तोडणार्या क्रूर आरोपीच्या मुसक्या आवळीत मुद्देमाल जप्त केला.भिगवण पोलिसांच्या या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांतून कौतुक करून स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाच्या इतरही गुन्ह्याच्या तपास कारवाईसाठी अधिकार वाढवावेत अशी मागणी केली जात आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आरोपी गणेश शिवाजी कारंडे याने भिगवण पोलीस ठाणे हद्दीतील एका सौंदर्य सुधार केंद्रातील एका पिडीतेची फेसबुक च्या माध्यमातून ओळख करीत विश्वास संपादन केला.यावेळी याने आपले नाव संग्राम पाटील असल्याचे आणि पोलीस विभागाशी आपले सबंध असल्याचे काही फोटो ओळखीच्या ठिकाणी ठेवले.तर पिडीतेला सौंदर्य सुधार केंद्राच्या साठी लागणारे कर्ज मिळवून देतो म्हणून भिगवण पोलीस स्टेशन हद्दीतील लॉजवर बोलावून काही कागदपत्रावर सह्या घेतल्या.तसेच कर्जप्रकरणासाठी शरीरावरील खुणा टाकाव्या लागतील म्हणून अंगावरील कपडे काढून या नराधमाने अबलेच्या शरीराचे लचके तोडले.यावेळी महिला अचानक झालेल्या परिस्थितीतून सावरत असताना आरोपीने महिलेच्या सोन्यावर डल्ला मारून पलायन केले.या विषयी तक्रार प्राप्त होताच भिगवण पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे यांनी गुन्हे शाखेतील अमलदार महेश उगले ,संतोष मखरे प्रमोद पालसांडे ,वैष्णवी राउत या पथकाची नियुक्ती करीत तपासाला सुरवात केली.सदर आरोपी फेसबुक या सोशल मिडीयावर ‘ संग्राम पाटील ’ तसेच ‘ पृथ्वीराज पाटील ’ नावाने कार्यरत असल्याचे पथकाच्या समोर आले.तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त खबऱ्याच्या माध्यमातून सखोल तपास केला असता आरोपी अकलूज पोलीस स्टेशन हद्दीत असल्याचे समजले.तसेच हा सराईत गुन्हेगार असून वेशभूषा बदलून तो तोतया पोलीस म्हणून वावर करीत असल्याची पक्की माहिती भिगवण पोलिसांना मिळाली .पोलिसांनी तातडीने पाउल उचलीत सदर आरोपीला ताब्यात घेत मुद्देमाल जप्त केला.माननीय न्यायालया समोर हजर करत असताना न्यायालया त्याला पोलीस कोठडी सुनावली.या आरोपीवर महिला बाबत इतर पोलीस ठाण्यात गुन्हे असून आणखीन काही पीडितांच्या बाबत काही तक्रारी असल्यास पोलीस ठाण्यात येण्याचे आवाहन सपोनि विनोद महांगडे यांनी केले आहे .
भिगवण पोलिसांची सिघम कामगिरी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल ,अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार ,विभागीय अधिकारी डॉ .सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विनोद महांगडे ,अमलदार सचिन पवार ,महेश उगले ,संतोष मखरे ,प्रमोद गलांडे ,गणेश पालसांडे ,वैष्णवी राउत यांच्या पथकाने केली.


















