कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागाची जय्यत तयारी..
व्यापारी वर्गाने आपली तपासणी करून घेण्याचे आरोग्य विभाग आणि पोलीस अधिकारी जीवन माने यांचे आवाहन
भिगवण वार्ताहर.दि.१५
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा प्रतिबंध म्हणून भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्राकडून मास आरटीपीसीआर तपासणी करण्यात येत आहे.दोन दिवसात ४३३ नागरिकांची यात तपासणी करण्यात आली असून जमा करण्यात आलेले स्वाब बारामती मेडिकल हॉस्पिटल कडे पाठविण्यात आल्याची माहिती तक्रारवाडी उपकेंद्राच्या सामुदाय आरोग्य अधिकारी डॉ.मृदुला जगताप भगत यांनी दिली.
कोरोना रुग्णाचा आकडा खाली येत असल्यामुळे भिगवण शहरात काही अंशी निर्बंध हटविण्यात आलेले आहेत.त्यामुळे बाजार पेठात किंचित गर्दी झाल्याचे पहावयास मिळत आहे.तर कोरोना विषयक तज्ञ डॉ. मंडळी नी दुसरी लाट ओसरत असतानाच तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे.त्यामुळे आकडा कमी होत असला तरी खबरदारी घेणे गरजेचे आहे. याच कारणामुळे भिगवण प्राथमिक आरोग्य केंद्रांनी तिसऱ्या लाटेला प्रतिबंध व्हावा आणि रुग्णांची संख्या आटोक्यात राहावी यासाठी मास टेस्टिंग योजना सुरु केली आहे. भिगवण मच्छी मार्केट ,भाजी बाजार ,साखर वितरण ऑफिस तसेच मदनवाडी चौफुला या गर्दीच्या ठिकाणी हि तपासणी करण्यात येत आहे.व्यापारी वर्ग आणि रिकामे फिरणारे नागरिक यांना थांबवून हि तपासणी करण्यात येत आहे.यासाठी भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांनी एक पोलीस पथक आरोग्य विभागाच्या मदतीला दिले आहे.याकामी आरोग्य विभागाच्या अम्बुलंस मध्ये आरोग्य सहायक अशोक मोरे , गणेश चौधर ,लॅब टेक्निशियन सौदागर शिंदे ,आरोग्य सेविका उषा यादव ,प्रतीक्षा वाघमारे ,वार्डबॉय तात्या करे यांनी विशेष परिश्रम घेत मदत केली.
भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांनी भिगवण बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी आपली तपासणी करून घेण्याचे आवाहन करीत तिसऱ्या लाटे पासून आपल्या शहराला दूर ठेवण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली आहे.
















