भिगवण वार्ताहर.दि.२२
भिगवण बारामती राज्यमार्गावरील वाहतुकीस होणारा अडथळा दूर करून अनधिकृत पार्किंग बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच पुणे जिल्हाआधीकारी यांच्याकडे केली असल्याची माहिती राज्य ग्राहक संरक्षण समिती सदस्य तुषार झेंडेपाटील यांनी दिली.
तसेच या अडथळ्यामुळे अपघात घडून जीवित हानी झाल्यास सबंधित प्रशासनावर जबाबदारी निश्चित करून या निवेदनाचा न्यायालयीन प्रक्रियेत पुरावा म्हणून सादर करणार असल्याचे निवेदनात सूचित करण्यात आले आहे.

भिगवण बारामती राज्य मार्गावरील पिंपळे आणि शेटफळ गावाच्या हद्दीत जवळ पास २ ते ३ किलोमीटर उस वाहतूक करणाऱ्या वाहनांची रांग लागल्याचे चित्र महिनाभरा पासून पहावयास मिळत आहे.याठिकाणी वाहने तासंतास आपल्या नंबरची वाट पाहत थांबलेली असतात त्यामुळे राज्य मार्गाची एक बाजू प्रवासासाठी बंद ठेवली जाते.तर काही वाहन चालक आडमुठे स्वभावाचे आणि आपला नंबर यावा यासाठी दुसऱ्या बाजूच्या वाहनाचा विचार न करता वाहने घुसवीत असतात त्यामुळे हा पूर्ण रस्ताच बंद होतो.तसेच इतर वाहन धारकांना आपला जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो.तसेच यातून अनेक वेळा अपघात घडत असल्याचे दिसून आल्याने झेंडेपाटील यांनी आर.टी.ओ आणि जिल्हाआधीकारी यांना याबाबत निवेदन देले असल्याचे सांगितले.
तर कारखाना परिसरात जागाच उपलब्ध नसल्याने नाईलाजाने वाहने मुख्य रस्त्यावर उभी करावी लागत असल्याचे वाहन चालकांचे म्हणणे आहे.
कारखान्याची वाहने रस्त्यावर तासनतास उभी राहत असल्याने बारामती भिगवण रस्ता बंद राहत असताना यावर भिगवण पोलीस तसेच बारामती आर टी ओ राजकीय दबावाखाली कोणतीही कारवाई करीत नसल्याची प्रवासी नागरिकांची तक्रार आहे.याबाबत जिल्हाधिकारी आणि आर टी ओ यांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

भिगवण बारामती राज्य मार्गावरील मदनवाडी घाटात उस वाहतूक करणाऱ्या वाहनांची रोज होणारी सर्कस व्हिडिओ माध्यमातून सोशल मिडीयावर फिरत आहे.तर या वेळी या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या मनात भीतीचा गोळा आल्याशिवाय राहत नाही.
या अनाधिकृत पार्किंग मुळे अनेक अपघात घडत असताना प्रशासन मात्र सुस्त असल्याचे दिसून येत आहे .यामुळेच या अपघातात जीवित हानी झाल्यास याची जबाबदारी सबंधित विभागावर निश्चित करून गुन्हे दाखल करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली असल्याची माहिती तुषार झेंडेपाटील यांनी दिली.