उजनी धरण 100 टक्के भरल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हसू

0
242

भिगवण वार्ताहर.दि.23


पुणे परिसरातील धरण क्षेत्रात आणि सर्वदुरच मुसळधार पाऊस पडल्याने दौंड तालुक्याच्या पूर्व भागाला वरदान ठरणारे उजनी धरण शंभर टक्के भरल्याने उजनी धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रातील शेतकरी समाधान व्यक्त करीत आहे. 

 दौंड तालुक्याच्या पुर्व भागातील खानवटे , राजेगाव, नायगाव, वाटलूज , मलठण , हिंगणी बेर्डी, शिरापूर इत्यादी गावांना उजनी धरणाचे बॅकवाॅटर म्हणजे या भागाला मिळालेले वरदानच आहे. या पाण्यावरच हा भाग सुजलाम- सुफलाम झाला आहे.


पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर भीमा खोऱ्यात ऑगस्ट महिन्यात भरपूर पाऊस झाल्याने उजनी धरणाच्या वरील बाजूस असलेली बहुसंख्य धरणे भरल्याने या धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे उजनी धरण तुडुंब भरले. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीस शंभर टक्के भरलेले उजनी धरण यंदा मात्र सप्टेंबरच्या सुरुवातीस शंभर टक्के भरले आहे.

डोळ्याचे पारणे फेडणारा अथांग पसरलेला उजनीचा जलसागर 


सोलापुर, अहमदनगरसह पुणे जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणाची एकूण पाणीसाठवण क्षमता 123 टीएमसी एवढी प्रचंड आहे. राज्यात सर्वात मोठा पाणीसाठा असलेले धरण म्हणून उजनी धरणाकडे पाहिले जाते. हे धरण राज्यातील तिसर्‍या क्रमांकाचा उपयुक्त साठा पाणी साठा असलेले धरण आहे. उजनी धरणाचा एकूण जलसाठा 110.89 एवढा प्रचंड असून उपयुक्त जलसाठा मात्र 53.57 टीएमसी एवढा आहे.

 धरण जेव्हा शंभर टक्के भरले असे आपण म्हणतो तेव्हा धरणात 117 टीएमसी पाणी साठा असतो तर 111 टक्के भरलेले तेव्हा 123 पाणी साठा असतो.
उजनी धरणातील बँकवाँटरचे पाणी हे करमाळा, इंदापूर, कर्जत , दौंड, श्रीगोंदा या तालुक्यातील शेतीसाठी वरदान आहे.

दौंड तालुक्यातील पुर्व भागातील नदी किनारी असणारी गावे खानवटे, राजेगाव, नायगाव, वाटलूज, मलठण, हिंगणी बेर्डी, काळेवाडी, शिरापूर, देऊळगाव राजे, पेडगाव, वडगाव दरेकर, आलेगाव इत्यादी गावांना उजनीच्या बँकवाँटरचे पाणी मिळत असल्याने या गावाची शेती सुजलाम सूफलाम झाली आहे.

हा भाग अंतिम टोकाला (टेल) असल्याने खडकवासला कालव्याचे पाणी या भागात येत नाही. अथवा जरी आले तरी टोकाचा भाग असल्याने या भागात पुरेशा प्रमाणात पाणी पोहचत नाही. त्यामुळे या गावातील शेतकरी उजनी धरणातील बँकवाँटरच्या पाण्यावरच आपली शेती करतो. या गावातील अर्थकारणच उजनीच्या पाण्यावरच अवलंबून आहे. या भागात जरी कमी पाऊस पडला तरी चालेल परंतु पुण्याच्या धरण साखळी परिसरातील पावसावरच उजनीचे भवितव्य अवलंबून असते.

दरम्यान यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पडलेल्या मुसळधार पावसामुळे  कोणतीही प्रतीक्षा न करता उजनी धरण काठोकाठ भरल्याने शेतकरीवर्गाच्या चेहर्‍यावर आनंदाचे वातावरण आहे.  नदीकाठच्या गावातील नागरिक काठोकाठ भरलेल्या  भीमा नदीचे विहंगम दृश्य पहाण्यासाठी नदीकिनारी गर्दी करत आहेत. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here