भिगवण वार्ताहर.दि.५
भिगवण पोलिसांच्या पथकाने पुणे सोलापूर महामार्गावर भादलवाडी गावच्या हद्दीत सोलापूर हून पुण्याच्या बाजूकडे जाणारा मालवाहतूक कंटेनर ताब्यात घेत यातील अवैध गुटखा जप्त केला.
हायवे पेट्रोलिंग दरम्यान केलेल्या या कारवाईत जवळपास वाहनासह ७६ लाख २४ हजार रुपयाचा ऐवज ताब्यात घेतला.
याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख यांनी दिलेल्या माहिती नुसार भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक इन्कलाब पठान हे पुणे सोलापूर महामर्गावर गस्त घालीत असताना त्यांना हा संशयित कंटेनर आढळून आला.यावेळी पठान यांनी सदर कंटेनर थांबविण्याचा प्रयत्न केला असता वाहन चालकाने गाडी सुसाट वेगात पुणे बाजूकडे नेण्यास सुरवात केली.यावेळी पठाण यांनी सदर वाहनाचा पाठलाग करीत याची माहिती वरिष्ठ अधिकारी जीवन माने यांना दिली.
घटनेतील गांभीर्य ओळखत माने यांनी भिगवण पोलीस पथकाची दुसरी टीम करीत भिगवण येथे नाकाबंदी करीत संशयित वाहन ताब्यात घेतले.यावेळी वाहन चालकाला गाडीतील मालाविषयी विचारले असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली.
तसेच गाडीतील मालाविषयी कोणत्याही प्रकारचे कागदपत्राची पूर्तता केली नाही.या कारणामुळे अखेर भिगवण पोलिसांनी पंच बोलावून चित्रीकरण करीत गाडीचे दरवाजाचे सील तोडले यावेळी गाडीतील माल पाहून पोलीस सुद्धा चक्रावून गेले.
यात जवळपास ५६ लाख रुपयाचा गुटखा आढळून आला.महाराष्ट्र राज्यात गुटखा आणि सुगंधी सुपारीला बंदी असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर गुटखा वाहतूक केल्याबाबत वाहनचालक करमहुसेन हसनराजा चौधरी वय ३३ रा.मुडीला ता.मेह्दावल उत्तरप्रदेश याच्या विरोधात गुन्ह्याची नोंद केली.तसेच अज्ञात पुरवठादार व हिरा पानमसाला उत्पादक याच्या विरोधात भा.द.वी अन्न सुरक्षा अधिनियम २००६ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी जीवन माने यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक रियाज शेख ,इन्कलाब पठान यांनी केली.