भिगवण येथे जनावरांच्या बाजाराचा शुभारंभ

0
392

नवीन उपक्रमाचे शेतकरी वर्गातून स्वागत ;मात्र बाजारात सुविधांचा वानवा

भिगवण परिसरातील व्यवसायात होणार मोठी वाढ ; तरुणांच्या हाताला काम मिळण्यात होणार मोठा फायदा

भिगवण वार्ताहर .दि.२९

कृषी उत्पन्न इंदापूर बाजार समितीच्या उप बाजार भिगवण येथे रविवारी पासून जनावरांच्या बाजाराचा शुभारंभ करण्यात आला. माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या या बाजारात परिसरातील अनेक शेतकरी आणि व्यापारी यांनी सहभाग नोंदवीत आपली जनावरे खरेदी विक्रीसाठी आणल्यामुळे मोठ्या प्रमाणावर व्यवहार झाल्याची माहिती सभापती दत्तात्रय फडतरे यांनी दिली.

बाजार समितीने भिगवण येथे सुरु केलेल्या जनावरांच्या बाजाराला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे पहावयास मिळाले.३ जिल्हे आणि ५ तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या भिगवण येथे दळणवळणाची साधने मोठ्या प्रमाणावर आहेत.तर पुणे सोलापूर महामार्ग भिगवण गावाला छेदून जात असल्यामुळे याचा फायदा प्रत्यक्षात गावाला होत असल्याचे दिसून येते.इंदापूर बाजार समितीचे उप बाजार भिगवण येथे आहे.तसेच या समितीची पुणे सोलापूर महामार्ग तसेच बारामती राशीन राज्य मार्गा शेजारी मोठी जागा आहे.माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांच्या संकल्पनेतून सुरु करण्यात आलेल्या आजच्या बाजाराला भिगवण परिसरातील शेतकरी तसेच राशीन ,कर्जत, बारामती ,फलटण ,इंदापूर ,पळसदेव ,कुरकुंभ ,पाटस,दौंड तसेच अनेक ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांनी भेट देत जनावराचे व्यवहार केले.

आजच नव्याने सुरु करण्यात आलेल्या बाजारात सुविधांचा वानवा जाणवत असला तरी त्या तातडीने उभारण्यात येणार असल्याचे सभापती फडतरे यांनी सांगितले.यावेळी बाजार समितीचे सदस्य आबासाहेब देवकाते ,माजी उपसभापती पराग जाधव ,काका वाबळे भिगवण गावचे सरपंच तानाजी वायसे ,विष्णुपंत देवकाते ,राजेंद्र देवकाते यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.यावेळी बाजार समितीच्या वतीने शेतकरी आणि व्यापारी यांचा सन्मान करण्यात आला.समिती सचिव वैभव दोशी  यांनी आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here