भिगवण वार्ताहर. दिं.३
इंदापुर तालुक्यासह राज्यांमध्ये सध्या कोरोनाचा कहर सुरु आहे. त्या पार्श्वभुमीवर भिगवण येथील ट्रॉमा केअर सेंटरमधील कोविड सेंटरमध्ये पन्नास ऑक्सिजन बेडची सुविधा तातडीने उपलब्ध करुन देण्याची मागणी भाजपा नेते माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, नवनिर्वाचीत कार्यकारिणी भिगवण ग्रामपंचायत व इंदापुर पंचायत समिती आदींच्या वतीने करण्यात आली आहे.
भिगवण येथे भव्य ट्रॉमा केअर सेंटरची इमारत बांधण्यात आली आहे. अद्याप ट्रॉमा केअर सेंटर सुरु न झाल्यामुळे गतवर्षी या इमारतीमध्ये पन्नास बेडचे कोविड सेंटर सुरु करण्यात आले होते.यावेळी सामाजिक संस्था आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून सुविधा पुरविण्यात आल्या होत्या.
आजच्या घडीला इंदापुर तालुक्यामध्ये कोरोनाचा कहर सुरु आहे. तालुक्यातील कोविड सेंटर जवळपास हाऊसफुल्ल झाली असून भिगवण येथील कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे येथील रुग्नांना उपचारासाठी बारामती व इतरत्र जावे लागते आहे. रुग्णांना आर्थिक ताणांसह मोठा त्रासही सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभुमीवर भाजपा नेते व माजी सहकारमंत्री हर्षवर्धनजी पाटील, पंचायत समितीचे उपसभापती संजय देहाडे, येथील भिगवण ग्रामपंचायतीचे सरपंच तानाजी वायसे, माजी सरपंच पराग जाधव ,तुषार क्षीरसागर ,कपिल भाकरे आदींनी येथील कोविड सेंटरमध्ये स्वच्छता राखण्यात यावी, तसेच येथे पन्नास ऑक्सिजन व्हेंटिलेटर युक्त बेडची सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावी आदी मागण्या केल्या आहेत. या ठिकाणी ऑक्सिजन बेडची सोय उपलब्ध झाल्यास इंदापुर तालुक्यातील कोविड रुग्नांना त्याचा फायदा होईल.भिगवण ग्रामपंचायत व इंदापुर पंचायत समितीच्या मागणीनुसार इंदापुरचे प्रभारी तहसिलदार यांनी नुकतीच कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली आहे.
याबाबत राज्याचे भाजपा नेते आणि माजी सहकारमंत्री हर्षवर्धनजी पाटील म्हणाले, इंदापुर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर होणार अपघात व या भागाची गरज विचारात घेऊन आपण भिगवण येथील ट्रॉमा केअर सेंटरला मंजुर केले होते. सध्या ट्रॉमा केअर सेंटरच्या इमारतीमध्ये कोविड सेंटर सुरु आहे. रुग्नांची गरज विचारात घेऊन या ठिकाणी पन्नास ऑक्सिजन बेडची उपलब्धता करुन द्यावी यासाठी पाठपुरावा करत आहे.