भिगवण वार्ताहर.दि.३
इंदापूर तालुक्यातील पिंपळे गावातील महिलांनी एकत्र येत दारूबंदी साठी ग्रामसभा घेवून दारूबंदी करण्याचा ठराव घेतला.प्रसिद्ध देवस्थान पद्मावती मंदिर परिसरात असणाऱ्या ढाब्यांवर हि दारूविक्री सुरु असून याचा भाविक आणि ग्रामस्थ यांना मनस्ताप सहन करावा लागत असून तातडीने दारूबंदी झाली नाही तर आमरण उपोषणाचा इशारा महिलावर्गा कडून देण्यात आला आहे.
याबाबत ग्रामसभेचा ठराव निवेदन सोबत देण्यात आला असून याची प्रत पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण ,उपविभागीय अधिकारी बारामती ,प्रांताधिकारी कार्यालय आणि भिगवण पोलीस स्टेशन येथे देण्यात आली आहे.पिंपळे ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या ढाब्यांवर हि अनधिकृत दारू विकली जात असून यामुळे प्रसिद्ध देवस्थान पद्मावतीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना तसेच ग्रामास्थाना याचा त्रास होत असल्याचे निवेदनात म्हणण्यात आले आहे.याबाबत पिंपळे गावात महिलांनी महिलांची ग्रामसभा ,तसेच जनरल ग्रामसभेचा ठराव घेत दारूबंदीची मागणी केली आहे.दारू विक्री करणाऱ्या ढाब्यामुळे अनेक शेतमजूर आणि गोरगरीब नागरिकांचे संसार उध्वस्त झाले असून हि प्रशासनाने यावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे.तसेच आठ दिवसाच्या आत प्रशासनाने दारूविक्री करणाऱ्या व्यावसायिकावर कारवाई न केल्यास १२ एप्रिल पासून ग्रामस्थ आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
याबाबत पिंपळे गावचे सरपंच कुंडलिक भिसे यांनी सदर दारूबंदी साठी महिला वर्ग अतिशय आक्रमक झाल्या असल्याचे सांगितले.तसेच याबाबत महिलांनी ग्रामसभा घेवून दारूबंदीचा ठराव संमत केला असल्याचे सांगितले.तर राज्यातील अनेक जिल्ह्यातील भाविक हे पद्मावती देवीच्या दर्शनासाठी येत असतात त्यामुळे या दारूविक्री मुळे अनेक चुकीचे प्रकार घडत असताना यावर कारवाई होत नसल्यामुळे खंत व्यक्त केली.
याबाबत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी जीवन माने यांनी निवेदन पोहोचल्याचे सांगत दारू विक्री करणार्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.तर याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती देण्यात आली असून त्यांच्याकडूनही कारवाई अपेक्षित असल्याचे सांगितले.