भिगवण प्रतिनिधी …. दिं.१
कोरोनाची दुसरी लाट सध्या राज्यात सुरु झाली असून इंदापूर तालूक्यामध्येही मोठ्या प्रमाणात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर तालूक्यातील सर्व नागरिकांनी सतर्क राहून अधिक काळजी घेण्याचे आवाहन इंदापूर पंचायत समीतीचे उपसभापती संजय देहाडे यांनी केले.
तालुक्यांतील ज्याठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्या गावात सॅनिटायझेशन व इतर उपाय योजना राबविण्यात येत आहेत. तसेच ज्या कुटुंबात कोरोना रुग्ण सापडला आहे, अशा कुटुंबातील इतर सदस्यांच्याही कोरोना तपासण्या केल्या जात आहेत.ग्रामपंचायत माध्यमातून गावातील मोक्याच्या जागा, वर्दळीची ठिकाणे, बाजारापेठा, बस स्थानक आदी ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात येत असल्याचे यावेळी देहाडे यांनी सांगितले.
इंदापूर तालूक्यातील आरोग्य विभागातील कर्मचारी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करत असून नागरिकांच्या प्राथमिक तपासण्या करत आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, तोंडाला मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा व सार्वजनिक ठिकाणी उघड्यावरती थुंकू नये असे आवाहन देहाडे यांनी नागरिकांना केले.
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाकडून कोरोना लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. लसीकरण हे सुरक्षित असल्याने त्याविषयी गैरसमज निर्माण न करता तालूक्यातील नागरिकांनी या लसीकरणास प्रोत्साहन द्यावे. इंदापूर तालूक्यामधील कर्मचारी,अधिकारी , पंचायत समीती व ग्रामपंचायत सदस्य यांनी लसीकरण करुन घेतले आहे. कोणाला कोणताही त्रास झालेला नाही. त्यामुळे नागरिकांनीही मनातील भीती बाजूला करुन लस टोचून घ्यावी असे आवाहन इंदापूर पंचायत समीतीचे उपसभापती संजय देहाडे यांनी केले.