भिगवण वार्ताहर.दि.२८
भिगवण बाजारपेठेतील वाहतूककोंडी दिवसेदिवस वाढत असून याकडे पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायत प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करताना दिसून येत नाही. या वाहतूक कोंडीमुळे व्यापारी वर्ग आणि ग्राहकांना मनस्ताप करावा लागत असून पोलीस प्रशासनाने या वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर तिसरा डोळा उघडण्याची मागणी वाढू लागली आहे
भिगवण ची बाजारपेठत आसपासच्या २० च्यावर वाड्यावस्त्या आणि ३ तालुक्यातील नागरिक खरेदीच्या निमित्ताने रोज येत असतात.तर भिगवणचा मासळी बाजार राज्यात प्रसिद्ध आहे.मासे खरेदी साठी अनेक तालुक्यातील वाहने भिगवण बाजारात येत असतात.तर भिगवण हे मासे खवय्या साठी नावारूपास आले असून अनेक जन वाहने घेवून पोटपूजा करण्यासाठी भिगवण शहरात येत असतात.मात्र मागील काही वर्षापासून भिगवण शहराला वाहतूक कोंडीच्या समस्सेने बेजार केले असून १ किलोमीटरच्या अंतरात प्रवास करावयाचा म्हटले तरी कमीत कमी अर्धा तास वेळ लागत असल्याचे दिसून येते.बाजारपेठेतील व्यापारी याला कारणीभूत ठरत असून आपल्या दुकानातील माल रस्त्यावर कसा लावला जाईल यासाठी चढाओढ लागल्याचे पहावयास मिळत आहे.तर याकडे ग्रामपंचायत प्रशासन आणि पोलीस यंत्रणा कोणतीही कारवाई करीत नसल्यामुळे काही रस्त्यांना अक्षरशा बोळीचे स्वरूप प्राप्त झालेले आहे. तर काही ठिकाणी बांधकामे रस्त्यावर आली असूनही यावर सबंधित प्रशासन कारवाई करताना दिसून येत नाही.त्यामुळे बाजार पेठेत फिरताना अनेक वेळा मनस्ताप सहन करावा लागत आहे.आंबेडकर चौक ते प्रदीप मेडिकल ,वांझखडे हॉटेल ते पुणे सोलापूर सर्विस रोड ,संगम वाईन्स , ज्योती मिसळ आणि नवी बाजारपेठ अशी नेहमी वाहतूक कोंडी असणाऱ्या जागा असून याची माहिती पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायत प्रशासनाला आहे.मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचे सध्यातरी दिसून येत आहे.त्यामुळे पोलीस प्रशासनाने या वाहतूक कोंडी आणि अवैध पार्किंग विषयी कारवाई करीत सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे.
भिगवण शहरात सम विषम तारखे प्रमाणे पार्किंग करण्याची योजना जिल्हाआधीकारी यांच्याकडून मंजूर करण्यात आली आहे.अवैध पार्किंग मुळे अनेक वेळा अपघात घडून नागरिकांना जीव गमवावे लागले आहेत.
पुणे सोलापूर महामार्गावर व्यवसाय करण्यासाठी जीव धोक्यात घातला जात असताना महामार्ग प्रशासन आणि पोलीस प्रशासन उघड्या डोळ्यांनी पाहत असल्याचे वास्तव आहे.तर यात होणारा राजकीय हस्तक्षेप निष्पापांच्या जीवावर बेतत आहे.