भिगवण वार्ताहर. दि.३०
तक्रारवाडी गावात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ९ जागांसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या ५२ झाली असल्याची माहिती निवडणुक अधिकारी युनूस शेख यांनी दिली . बिनविरोध मध्ये आपली वर्णी लागेल याचा विचार करून फॉर्म भरण्याची लगबग होत असल्याचे जाणकार सांगत आहेत.
उजनी धरणाच्या किनार्यावर असलेल्या शेती आणि शेती पूरक व्यवसायात आपला नावलौकिक असणाऱ्या तक्रारवाडी गावात ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम घोषित झाला आहे.गावात सदस्य म्हणून नाव लागावे यासाठी अनेक जण निवडणुकीसाठी सज्ज झाले आहेत.
३ हजारच्या आसपास लोकसंख्या असणाऱ्या गावात १७२१ मतदार आहेत.तर या गावात शाळा आणि नोकरीच्या निमित्ताने राहत असलेल्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.गावात एकूण ३ प्रभागात मिळून ९ सदस्य पदासाठी ही निवडणुक लढविण्यात येत आहे.गेली १० वर्ष सत्तेत असणाऱ्या पॅनल विरोधात विरोधकांनी आपली ताकद लावली आहे.९ उमेदवारांना विरोधी गटाने ९ उमेदवार देणे गरजेचे असते मात्र उमेदवारी निश्चित करताना येणाऱ्या अडचणी आणि नाराजांची संख्या वाढू नये यासाठी दोनही बाजूने डमी उमेदवारी दिली जात आहे.
तर आपल्याला दोन्ही पार्टीने विश्वासात घेतले नाही म्हणून नाराज झालेल्या माजी सरपंचाने आपल्या सहकारी मित्राला सोबत घेत तिसऱ्या पॅनल ची तयारी करत आपले उमेदवार उभे केलेले आहेत.यामुळे १७२१मतदार असणाऱ्या गावात उमेदवारांची संख्या शेवटच्या दिवसापर्यंत ५२ पर्यंत गेल्याचे पहावयास मिळाले. उमेदवारी फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने आज उमेदवारांनी गर्दी केली होती.
गावातील विकास कामे आणि तरुणाच्या बेरोजगारी याचा विसर सत्ताधारी गटाला पडल्यामुळे विरोधक मुद्दा लावून धरणार असल्याचे बोलले जात आहे.तर वर्षानुर्षांपासून सत्ता आपल्याच घरात ठेवत अनेकांना आश्वासनांचे गाजर दाखवून राजकारण करणाऱ्या विरोधात आपण पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे विरोधी गटाचे म्हणणे आहे.
आता फॉर्म भरलेल्या ५२पैकी किती निवडणुकीच्या रिंगणात शेवट पर्यंत टिकणार आणि कोण बाहेर पडणार हे पाहणे गरजेचे आहे.मात्र सरपंच आरक्षण मागे घेतल्याने कराव्या लागणाऱ्या खर्चाचा मेळ बसविणे पॅनल प्रमुखासाठी डोके दुखी ठरणार हे मात्र निश्चतच…