बारामती वार्ताहर दि.२६
ग्रामपंचायत निवडणुका भावकी, जात, धर्म यांच्या आधार घेऊन होऊ नयेत. आरोग्य, व्यसनाधीनता, रोजगार आणि गावाचा सर्वार्थाने विकास करणाऱ्याच्या मागे उभे राहा. जात-भावकीसाठी मत वाया घालवून येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य कोणाच्याही दावणीला बांधू नका, असे आवाहन पाटोदाचे (जि. औरंगाबाद) आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांनी केले आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये ७४८ ग्रामपंचायतीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आहे. गावागावामध्ये निवडणुकीचा धुरळा उडाला आहे.तर काही ठिकाणी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी लोकप्रतिनिधी व गाव पुढारी प्रयत्न करतानाचे चित्र आहे.
या पार्श्वभूमीवर आदर्श सरपंच भास्करराव पेरे-पाटील यांच्याशी संवाद साधला.पेरे-पाटील म्हणाले, आईला गर्भ राहिल्यापासून ते मनुष्याच्या मरणापर्यंत ग्रामपंचायत वेगवेगळ्या माध्यमातून लोकांसाठी काम करीत असते. सेवा-सुविधा पुरवित असते. गावकी-भावकीच्या राजकारणात आपण आपले भविष्य पुसून टाकत आहोत. राज्य शासन, केंद्र शासनाच्या ग्रामपंचायतीसाठी शेकडोने योजना आहेत. मात्र यामधील किती योजना आपल्याला माहिती आहेत. जात, धर्म यामधून जे सामाजिक प्रश्न उभे राहिले आहेत. ते आपण अजून मिटवू शकलो नाही. ते प्रश्न जैसे थे असताना दररोज नवनवीन सामाजिक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे.प्रदुषण, वृक्षसंवर्धन, जलसंधारण, वीज, शेतमाल प्रक्रिया, रोजगार, आरोग्य, महिला सबलीकरण अशा अनेक विषयांवर काम करण्याची गरज आहे. गावच्या भल्यासाठी चार माणसे बसून गावातील अंतर्गत विरोध मिटवत असतील व ग्रामपंचायत बिनविरोध होत असेल तर त्याचे स्वागत करायला हवे. मात्र पैशाचे अमिष दाखवून कोणी ग्रामपंचायत बिनविरोध करू पाहत असेल तर निवडणुक व्हायला हवी. ही निवडणुक निकोप असावी. गावाच्या भल्यासाठी कोणी झटू पाहत असेलत तर अशा होतकरू व्यक्तीला जात, भावकी, धर्म विसरून ग्रामस्थांनी साथ द्यायला हवी, असे आवाहन त्यांनी केले आहे.