भिगवण वार्ताहर. दि. 14
भिगवण शहरामध्ये होळी आणि धुलवड सणाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांनी गर्दी केली असून सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भिगवणची बाजारपेठे आसपासच्या 15 गावे आणि 40 च्यावर असणाऱ्या वाड्या वस्त्यावरील नागरिकांना रोज लागणाऱ्या वस्तू आणि सेवाचे ठरलेलं ठिकाण. त्यातच भिगवण साठी सर्व गाव आणि वाड्या वास्त्यावरून दळणवळणाचे जाळे चांगल्या प्रकारे तयार झाले आहे.त्यामुळे नागरिकांना सहज खरेदी साठी येता येते.
होळी आणि धुलवड सणाच्या निम्मिताने भिगवण बाजारपेठेत गर्दी वाढत असून व्यापारी वर्गात यामुळे समाधान निर्माण झाले आहे. नुकताच उसाचा गाळप हंगाम पूर्ण झाल्यामुळे शेतकरी वर्ग आणि मजूर वर्ग आपल्या कामातून थोडासा निवांत झाला आहे. तर कारखान्यानी बिले सोडल्यामुळे खिशात पैसा आला असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच सध्या यात्रा आणि जत्राचा हंगाम सुरु होत असून नागरिकांचा खरेदी करण्याकडे कल वाढत असल्याचे दिसून येत आहे.
कापड दुकाने, किराणा दुकाने, इलेॅक्ट्रिक दुकाने आणि हॉटेल मध्ये ग्राहकांची चेहेल पेहेल वाढली असून लग्न सराई सुरु झाल्याने सरांफी दुकानात ही काही प्रमाणात ग्राहक दिसून येत आहेत.