भिगवण वार्ताहर.दि.१७
भिगवण ग्रामीण रुग्णालय आणि ट्रामा केअर सेंटर येथे कर्करोग तपासणी व्हॅन मार्फत घेण्यात आलेल्या शिबिरात २३३ रुग्णांची तपासणी करण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेखा पोळ यांनी दिली .यावेळी शिबिरात ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.सचिन विभूते ,डॉ.अनिकेत लोखंडे ,स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.अमोल खानावरे ,डॉ.सूर्या दिवेकर ,दंतरोग तज्ञ डॉ.घोगरे ,डॉ.मृदुला जगताप ,डॉ.कीर्ती व्यवहारे ,समुदाय आरोग्य अधिकारी रेणुका कुलकर्णी ,वैदकीय अधिकारी संतोष पाटील यांच्या माध्यमातून शिबिरात रुग्णांची तपासणी करण्यात आली.यावेळी २ संशयित रुग्ण महिलांच्या गर्भाशयाच्या मुखाजवळ तसेच ४ स्तनातील गाठ आणि २ मुखातील कर्करोग संशयित रुग्णाची पुढील तपासणी करण्यासाठी पाठविण्यात आले.यावेळी गट विकास अधिकारी इंदापूर सचिन खुडे यांच्या उपस्थितीत शिबिराला सुरवात करण्यात आली.
राज्यात सुरु असलेल्या कर्करोग तपासणी आणि असंसर्गजन्य रोग कार्यक्रम तसेच माननीय सार्वजनिक आरोग्य मंत्री यांच्या संकल्पनेतून आणि उपसंचालक राधाकिसन पवार जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागनाथ एमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली कर्करोग तपासणी व्हॅन भिगवण ग्रामीण रुग्णालय येथे आली होती.त्यावेळी हे तपासणी आणि जनजागृती शिबीर आयोजित करण्यात आले होते.सदर कर्करोग शिबिरामध्ये तोंडातील कॅन्सर ,स्तन कॅन्सर ,गर्भाशयाच्या पिशवीच्या तोंडाचा कॅन्सर याची विविध तद्न्य डॉक्टर यांच्या माध्यामातून तपासणी करण्यात आली.यावेळी जवळपास २३३ रुग्णांची तपासणी करण्यात आली यात ८ संशयित रुग्णांना पुढील तपासणी करण्यासाठी पाठविण्यात आले. ‘ संशयित रुग्ण आढळून आल्याने हे शिबीर फलदायी ठरले असून अजूनही असेच शिबीर राबविल्यास याचा फायदा सर्वसामान्य रुग्णांना होईल ’ अशी मागणी माजी पंचायत समिती उपसभापती संजय देहाडे यांनी केली.
ग्रामीण रुग्णालय आणि ट्रामा केअर सेंटर येथे पार पडलेल्या शिबिराला भिगवण आणि परिसरातून अनेक राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळीनी हजेरी लावली.हे शिबीर चांगल्याप्रकारे पार पाडण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी अधीक्षक डॉ.अनिकेत लोखंडे यांना शेटफळ गडे प्राथमिक आरोग्य अधिकारी ,समुदाय आरोग्य सहायक ,आरोग्य कर्मचारी ,आशा सेविका ,आरोग्य सेवक ,गट प्रवर्तक यांनी मदत केली.