भिगवण वार्ताहर.दि.३
जालना येथील मराठा आंदोलकांवर पोलीसांनी केलेल्या अमानुष लाठीमाराचा निषेध करण्यासाठी भिगवण येथील सकल मराठा समाजाच्या वतीने पुणे सोलापूर महामार्ग रोखून धरण्यात आला.यावेळी आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची डोकी फोडणाऱ्या पोलिसांना तातडीने निलंबित करण्यात यावी अशी मागणी केली.
एक मराठा लाख मराठा ,आर कोण म्हणत देणार नाही आरक्षण घेतल्या शिवाय राहणार नाय अशा घोषणा देत शेकडो मराठा तरुण पुणे सोलापूर महामार्गावर ठाण मांडून बसला असल्याचे दिसून आले.जालना येथील निष्पाप मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमार करून डोकी फोडली.याच जुलमी कारवाईचा भिगवण येथे निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी भिगवण परिसरातील अमर बौद्ध संघटना ,मुस्लीम संघटना ,भोई संघटना आणि कुंची कोरवी संघटना यांनी मराठा समाजाच्या आंदोलनांना पाठींबा व्यक्त केला.यावेळी बोलताना अखिल भारतीय मराठा संघाचे पांडुरंग जगताप ,अशोक शिंदे ,सचिन बोगावत ,विक्रम शेलार ,डॉ.पद्मा खरड यांनी लाठीमार आणि गोळीबार करणाऱ्या सरकारचा आणि सरकारचा आदेश माणून सर्वसामान्य मराठा आंदोलकांची डोकी फोडणाऱ्या पोलीसानाचा निषेध व्यक्त केला.तर सदर घटनेला जबाबदार असणाऱ्या पोलिसांचे निलंबन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.यावेळी बारामती विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे ,तहसीलदार अनिल ठोंबरे ,भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता. यावेळी आर सी पी ३ आणि ४ , एडीम २ वाहने , ४ अधिकारी आणि जवळपास ३० पोलीस जवान तसेच महामार्ग पोलीस पथक असा तगडा पोलीस बंदोबस्त यावेळी लावण्यात आला असल्याचे दिसून आले.
भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी आंदोलना दरम्यान कोणातही गैरप्रकार घडू नये साठी खबरदारी घेतली होती.तर आंदोलन स्थळा पासून २०० मीटर दूरवरच वाहने थांबवून ठेवली होती.तर कोठेही टायर पेटवून वाहने रोखली जावू नयेत यासाठी खबरदारी घेत पोलीस पथकाची नेमणूक केली होती.आंदोलन सुरु होण्या अगोदर २ तास पूर्ण रंगीत तालीम घेण्यात आल्याने आंदोलन अतिशय शांततेच्या मार्गाने पार पडल्याचे पहावयास मिळाले.