जीवाघेना हल्ला करणारा मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात ; चार अनोळखी साथीदार फरार
भिगवण वार्ताहर .दि.१०
सत्यवार्ता न्यूज नेटवर्क बातमी.
दुचाकीला कट मारल्याच्या वादातून झालेल्या किरकिरीची माफी मागण्याचा बहाना करून बदला घेण्यासाठी आलेल्या टोळक्याने धारदार शश्त्राने दुसऱ्याच तरुणावर वार करून जीवघेणा हल्ला केल्याची घटना दौंड पोलीस ठाणे हद्दीतील स्वामी चिंचोली येथे घडली .या सदंर्भात रावणगाव पोलीस ठाण्यात ५ आरोपीविरोधात प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहिती नुसार शिवम कांबळे रा.दौंड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याचे इतर ४ साथीदारांनी पळ काढला आहे.याबाबत राहुल राजेंद्र ढवळे रा.मदनवाडी यांनी फिर्याद दिली आहे.फिर्यादीत सांगितलेल्या घटना क्रमानुसार फिर्यादी राहुल याचा भाऊ अक्षय जनावरांचा चारा घेवून येत असताना आरोपी शिवम कांबळे याने दुचाकीला कट मारून उलट अक्षय यालाच शिवीगाळ करीत गाडीच्या चाव्या काडून घेतल्या होत्या.त्यावेळी राहुल याने फोन करून समंजस पणा दाखवत वाद मिटविला होता.चार दिवस उलटून गेल्यावर राहुल याला शिवमने फोन करून माफी मागावयाची असल्याचे सांगून भेट घेण्याचे सांगितले,मात्र राहुल हा विशाल धुमाळ या हॉटेल व्यावसायिकासोबत दौंड हद्दीतील स्वामीचिंचोली येथे असल्यामुळे शिवम त्याला त्याच ठिकाणी आलो म्हणून भेटण्यास गेला .सोबत दोन दुचाकीवर ४ साथीदार होते.पाचही आरोपींनी राहुल असणाऱ्या ठिकाणी जात मी शिवम कांबळे आहे तूच राहुल आहेस का असे म्हणत विशाल आणि राहुल यांना मारहाण करण्यास सुरवात केली.तर दोन साथीदार यांनी राहुल याला पकडून धरत दुसऱ्या दोघांनी विशाल याला पकडून ठेवत शिवम याने सोबत आणलेल्या धारदार शस्त्राने विशाल याच्यावर वार केले.त्यावेळी दोघांनी आरडाओरडा सुरु केला असता यातील दोन आरोपींनी जखमी विशाल याच्या गळ्यातील सोन्याची चैन घेवून दुचाकीवरून धूम ठोकली.आरडाओरडा झाल्यामुळे जमलेल्या जमावाने शिवम याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.
या संपूर्ण घटनेचा हॉटेल व्यावसायिक विशाल धुमाळ यांचा सबंध नसताना राहुल समजून आरोपी शिवम याने विशाल यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.यात गंभीर जखमी धुमाळ यांना बारामती येथील उपचारासाठी दाखल करण्यात आले.
.जखमी विशाल धुमाळ हे सामाजिक कार्यकर्ते असल्यामुळे आणि शिवसेना वैदकीय मदत केंद्राचे काम करीत असल्यामुळे त्यांचा मोठ्या प्रमाणावर मित्र परिवार आहे.धुमाळ यांच्यावर वार केल्याची बातमी वार्यासारखी पसरल्यामुळे अनेक तरुणांनी हॉस्पिटल कडे धाव घेतली.त्यामुळे काही काळ बारामती भिगवण रस्त्यावर वाहतूक कोंडी झाल्याचे पहावयास मिळाले.
भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार आणी त्यांच्या पोलीस पथकाचे हद्दीचा भाग विचारात न घेता जखमी धुमाळ यांना उपचार मिळणे कामी तसेच आरोपीला धारदार शस्त्रासह ताब्यात घेत कायदा आणी सुव्यवस्था चोख ठेवण्याचे काम केल्यामुळे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.