भिगवण वार्ताहर.दि.३०
तक्रारवाडी येथील पीरसाहेब मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लंपास केल्यामुळे गावात खळबळ माजली आहे.चोरीचा हा प्रकार सी.सी.टी.व्ही मध्ये टिपला गेला असून भिगवण पोलिसांनी याबाबतची खबर मिळताच तातडीने तपास सुरु केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम यांनी दिली.
तक्रारवाडी गावातील नवसाला पावणारा पीर अशी ख्याती असणाऱ्या मंदिरातील हि दानपेटी आहे.नुकताच या पिरसाहेबाचा उरूस मोठ्या थाटामाटात पार पडला असून या दानपेटीत भाविकांनी मोठ्या प्रमाणात दान टाकल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.२८ तारखेच्या मध्यरात्री १ वाजून २० मिनिटाच्या वेळेत दुचाकीवरून आलेल्या ३ चोरट्यांनी हि चोरी केल्याचे सी.सी.टी.व्ही मध्ये दिसून येत आहे.तर हि चोरी उरुसाच्या दरम्यान मंदिराची रेकी करून केल्या असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.या घटनेबाबत माहिती मिळताच भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक रुपेश कदम ,महेश उगले ,हसीम मुलाणी यांचे पथक घटनास्थळी पाठवून तपासाला सुरवात केली.यावेळी तक्रारवाडी गावचे सरपंच सतीश वाघ ,विजय जगताप ,संजय मोरे ,शरद वाघ ,केतन वाघ ,अंकुश वाघ घटनास्थळी उपस्थित होते.
सध्या उरूस ,यात्रा ,जत्रा यांचा उत्सव मोठ्या प्रमाणावर चालू असून चोरीच्या घटना घडू नयेत यासाठी भिगवण पोलीस रात्रीच्या वेळेत पेट्रोलिंग करत असतात.तसेच गावातील नागरिकांना जागृत राहण्याच्या सूचना वेळोवेळी पोलिसांकडून करण्यात येत असतात.मात्र तरी देखील यात्रा समितीकडून योग्य ती काळजी घेतली जात नसल्यामुळे म्हसोबावाडी येथील देवाची मूर्ती ,सकुंडे वस्तीवरील मंदिरातील दानपेटी आणि आता तक्रारवाडी येथील मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून येते.यातील सकुंडे वस्तीवरील दानपेटीचा शोध लावण्यात भिगवण पोलिसांनी यश मिळविले आहे.