भिगवण वार्ताहर .दि.११
तक्रारवाडी येथील हिंदू मुस्लीम एकात्मतेच प्रतिक असणाऱ्या राजबाग सवार पीरसाहेब उरसाला सोमवार पासून सुरवात होत असून मंगळवार आणि बुधवार असे दोन दिवस उरूस चालणार आहे अशी माहिती तक्रारवाडी गावचे सरपंच सतीश वाघ यांनी दिली.नवसाला पावणारा पीर अशी याची ख्याती असल्याने पुणे मुंबई पासून राज्यभरातील भाविक मोठ्या संख्येने उरसात उपस्थित राहतात.
हिंदू मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असणाऱ्या या पीर साहेब उरुसाला परिसरातील भाविक मोठ्या भक्तिभावाने उपस्थित राहतात.सोमवारी संध्याकाळी संदलने सुरु होणाऱ्या उरूसाचा मंगळवारी संध्याकाळी देवाचा छबिना मिरवणूक गावातून काढण्यात येते हि मिरवणूक पूर्ण झाल्यानंतर मंदिरासमोर मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येते .तसेच यात्रेतील भाविकांच्या मनोरंजनासाठी वसंत नांदवळकर या लोककलेचे आयोजन करण्यात आले आहे .बुधवारी सकाळी भक्तजनांच्या करमणुकीसाठी हजेरीचा कार्यक्रम साजरा करण्यात येणार आहे. या नंतर कुस्त्यांचे जंगी मैदान अर्थात आखाडा पार पाडण्यात येतो.परिसरातील यात्रा मध्ये तक्रारवाडीचा उरूस पहिल्या तारखेला येत असल्याने राज्यभरातील पैलवान मंडळी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावतात.
भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांच्याकडून या तीन दिवसात चोख बंदोबस्त लावण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.तर तक्रारवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने दिवाबत्ती स्वच्छता आणि रंगरंगोटी पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती ग्रामसेवक दीपक बोरावके तसेच कर्मचारी रामा काळगे यांनी दिली.