भिगवण वार्ताहर दि. 19
भिगवण येथील मराठी पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण व डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी(ता.20) सायंकाळी पाच वाजता येथील दुर्गामाता मंदिर येथे करण्यात आले असल्याची माहिती मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. तुषार क्षीरसागर व सोशल मिडिया सेलचे अध्यक्ष सागर जगदाळे यांनी दिली आहे.
वक्तृत्व स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्ताने ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस प्रथमच भिगवण येथे येणार असल्याचे संस्थांपक अध्यक्ष सुरेश पिसाळ यांनी सांगितले . सबनीस यांच्या व्याख्यानाचा आस्वाद घेण्यासाठी साहित्यप्रेमी व रसिक श्रोत्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
येथील मराठी पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार दिनाच्या निमित्ताने भिगवण व परिसरातील 20 शाळांमध्ये वक्तृत्व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. शाळा व विभाग पातळीवर घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धांचे पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी(ता.२०) सायंकाळी पाच वाजता करण्यात आले आहे.
कार्यक्रमासाठी ८९ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित राहणार आहेत तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे असणार आहेत. कार्यक्रमासाठी भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार, सरपंच दिपीका क्षीरसागर,दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, भिगवण शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजित क्षीरसागर, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष रियाज शेख, रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. अमोल खानावरे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमांमध्ये 20 शाळांमधील वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळविलेल्या विदयार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात येणार आहेत. कार्यक्रमाचे नियोजन मराठी पत्रकार संघाच्या मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.