भिगवण वार्ताहर.दि. 9
भिगवण येथील विक्रम शेलार यांची पुणे जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पक्षाच्या कार्यकर्त्यांना आनंद व्यक्त केला तसेच भिगवण गावामधुन सवादय मिरवणुक काढण्यात आली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पुणे जिल्हाध्यक्ष निवडीसाठी पुणे येथे पक्षाचे राज्य संघटक सचिव परशुराम वाडेकर यांचे अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. बैठकीसाठी प्रदेश उपाध्यक्ष असित गांगुर्डे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, संपर्क प्रमुख श्रीकांत कदम,पुणे शहराध्यक्ष शैलेश चव्हाण, भगवान गायकवाड,महिपाल वाघमारे व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पक्षाध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे सुचनेनुसार प्रदेश सचिव परशुराम वाडेकर यांनी विक्रम शेलार यांचे नाव पुणे जिल्हाध्यक्ष पदासाठी सुचविले त्यास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मान्यता दिली. त्यानंतर श्री. वाडेकर यांनी विक्रम शेलार यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आल्याचे जाहिर केले. यावेळी पक्षाच्या वतीने श्री. वाडेकर यांचे हस्ते श्री. शेलार यांचा सत्कार करण्यात आला. निवडीनंतर विक्रम शेलार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयांसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार आर्पण केला. त्यांच्या निवडीनंतर भिगवण येथे विविध सामाजिक संघटनाच्या वतीने सवादय मिरवणुक काढण्यात आले. तसेच येथील व्यापारी संघ, मराठी पत्रकार संघ ,भिगवण सराफ संघटना व विविध सामाजिक संघटनाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
विक्रम शेलार यांनी यापुर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या इंदापुर तालुकाध्यक्ष, तसेच पुणे जिल्हा कार्याध्यक्षपदी काम केले आहे.
निवडीनंतर बोलताना विक्रम शेलार म्हणाले, पक्ष कार्यकारिणीने माझ्यासारख्या ग्रामीण भागातील एकनिष्ठ कार्यकर्त्यांवर विश्वास दाखवुन मोठी जबाबदारी दिली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या विस्तारासाठी तसेच वंचित घटकासह शेतकरी, महिला यांना न्याय देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार आहेत.
तसेच राज्यभरातील गायरान जमिनीवरील घरकुल नियमित व्हावी यासाठी न्यायालयीन लढा उभारून वंचित घटकाना न्याय मिळविण्यासाठी काम करणार आहे.