भिगवण वार्ताहर.दि.२१
भिगवण येथील एकात्मिक बालविकास सेवा केंद्राचे कार्यालय इंदापूर येथे स्थलांतरित करण्याला पालक आणि अंगणवाडी सेविकांनी विरोध करीत आंदोलन केले.तर भिगवण साठी मंजुरी असताना इंदापूर येथे स्थलांतर करण्याचा आदेश कार्यकारी अधिकारी यांनी दिलाच कसा असा सवाल येथे उपस्थित असणाऱ्या महिलांनी केला.
एकात्मिक बालविकास सेवा केंद्राचा मुख्य उद्देश प्रकल्पातील सर्व लाभधारकांना योजनेचा लाभ नजीकच्या अंगणवाडी मध्ये घेता येईल असा होता.याच मुळे इंदापूर तालुक्यासाठी २ प्रकल्प मंजूर करण्यात आले.यातील एक प्रकल्प पंचायत समिती इंदापूर येथे तर भिगवण विभागासाठी दुसरा असे स्थान निश्चिती करण्यात आली. सन २०११ साली तत्कालीन सहकार व संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील तसेच पाणीपुरवठा राज्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रणजीत कांबळे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले होते.मात्र मागील काही राजकीय घडामोडीत हे कार्यालय इंदापूर येथे स्थलांतर करून परत मूळ जागी आणण्यात आले होते. काल इंदापूर पंचायत समितीला माही महिलांनी टाळे ठोकून उपोषणाचा पवित्रा घेत भिगवण येथील कार्यालय इंदापूर येथे आणण्याची मागणी केली.तर ११ ऑक्टोबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेश देत कार्यालय इंदापूर येथे स्थलांतर करण्याचा आदेश दिला होता.त्याच्या अमलबजावणी करण्यासाठी कर्मचारी आले असता भिगवण येथील पालक आणि अंगणवाडी सेविकांनी आंदोलन सुरु केले आहे.
याबाबत पंचायत समितीचे माजी उप सभापती संजय देहाडे यांनी भिगवण येथील कार्यालय इंदापूर येथे नेण्यास तीव्र विरोध दर्शविला.तर भिगवण साठी स्थाननिश्चित करण्यात आलेला प्रकल्प राजकीय भूमिकेतून हलविला जात असून भिगवण शहराचे महत्व कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले.
याबाबत भिगवण गावचे सरपंच तानाजी वायसे यांनी हा प्रकल्प इंदापूर येथे स्थलांतर करू देणार नसल्याचे सांगितले. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या माध्यमातून सुरु झालेला प्रकल्प भिगवण येथेच सुरु राहिला पाहिजे आणि यात काही राजकीय हस्तक्षेपामुळे असा प्रकार घडत असल्याची शक्यता बोलून दाखवली.