भिगवण वार्ताहर.दि.७
भिगवण गावच्या उपसरपंचपदी मुमताज जावेद शेख यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती ग्रामसेवक सतीश बोरावके यांनी दिली. शेख यांच्या निवडीमुळे भिगवण गावच्या इतिहासात पहिल्यांदाच मुस्लीम समाजाला न्याय मिळाला असल्याचे सांगण्यात आले.
राष्ट्रवादी पुरस्कृत पक्षाची सत्ता उलथवून बहुमताने सत्तेत आलेल्या भाजपा पुरस्कृत कार्यकारिणीने आपल्या उपसरपंच पदाचा कार्यकाळ पूर्ण होताच शीतल शिंदे यांचा राजीनामा घेतला.यावेळी रिकाम्या झालेल्या उपसरपंच पदासाठी कपिल भाकरे ,सत्यवान भोसले ,सईबाई खडके ,जयदीप जाधव तसेच मुमताज शेख इच्छुक होते.या निवडी बाबत अनेक दैनिकात उशीर होत असल्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या.मात्र कार्यकारिणीने अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शन घेत सर्व सदस्यांच्या बैठका घेत सर्वानुमते मुमताज शेख यांच्या नावाला संमती दिली.आज सरपंच तानाजी वायसे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या निवडीत शेख यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या प्रमिला जाधव , अजित क्षीरसागर ,मानसिंग जाधव ,अशोक शिंदे ,अनिल देसाई ,ज्ञानदेव भरणे ,अशोक सोनटक्के यांनी उपसरपंच मुमताज शेख यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच मुमताज शेख यांनी माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी उपसभापती पराग जाधव आणि पंचायत समिती उपसभापती संजय देहाडे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या साथीने भिगवण गावाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी कामकाज करणार असल्याचे सांगितले.