भिगवण वार्ताहर .दि.१९
भिगवण पोलिसांनी मुख्य बाजारपेठेतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कार्यवाहीला सुरवात करीत दुकानाबाहेर माल लावणाऱ्या व्यापार्यांना सूचना करीत आपला माल दुकानात ठेवण्यास सांगितले.तर पहिल्या टप्यात व्यावसायिकांना सामंजस्याने जनजागृती करण्यात येणार असून नियम मोडणाऱ्यांसाठी कायदेशीर कारवाईचा इशारा पोलीस अधिकारी दिलीप पवार यांनी दिला .
भिगवण बाजारपेठेतील वाहतूक कोंडीची समस्या वाढत असून याबाबत पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.बाजारपेठेतील मुख्य रस्ता ९ मीटर असताना तो काही ठिकाणी अगदी ५ मीटर सुधा शिल्लक राहत नसल्याचे दिसून येत आहे.तर काही व्यावसायिक आपला व्यवसाय व्हावा यासाठी दुकानाच्या बाहेर माल लावीत वाहतूक कोंडी करीत असल्याचे दिसून येत होते.याबाबतीत भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांनी पोलीस पथकाची नेमणूक करीत रस्त्यावरील अतिक्रमण करणार्यांना सूचना केल्या.तर याबाबत अजूनही सूचना करण्यात येणार असून नियम मोडणाऱ्यांसाठी कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.
बाजारपेठेत अतिक्रमण वाढून वाहतूक कोंडी होवू नये यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.तर ग्रामपंचायत प्लास्टिक बंदी ,स्वच्छता आणि पाणीपुरवठा यावर चांगल्या प्रकारे काम करीत असताना अतिक्रमणाबाबत शांत का आहे असा सवाल सर्वसामान्यांना पडत आहे.
याबाबत भिगवण गावचे सरपंच तानाजी वायसे यांना विचारणा केली असता वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन काम करीत असल्याचे सांगितले.तसेच काही दिवसातच मुख्य बाजारपेठेतील रस्त्याचे काम होणार असल्यामुळे अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे सांगितले.