भिगवण वार्ताहर. दि. २१
भिगवन पोलिसांनी (दि.२०) रोजी बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी इंदापूर तालुक्यातील अकोले येथील दोन आरोपींना अटक केली. याप्रकरणी एक पिस्तूल व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने व त्यांच्या पथकाला यश आले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दादासो रामचंद्र दराडे व महादेव चंद्रकांत दराडे (रा. अकोले, ता. इंदापूर जि. पुणे) या दोन आरोपींना अटक केली आहे.
भिगवण पोलिसांनी दिलेली माहिती अशी, (दि.२० रोजी) भिगवण पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांना खबऱ्या मार्फत मिळालेल्या बातमीनुसार अकोले येथील गणपती मंदिरासमोरील रोडवर सदर आरोपी आपल्या ताबेतील मारुती सुझुकी कार नं एम एच ४२ ए एस ०००८ हिचे मधून एक अग्नीशस्त्र ( गावठी पिस्टल), ४ जिवंत काडतुसे जवळ बाळगून फिरत असल्याची खबर मिळाली होती. यावरून भिगवण पोलिसांनी सापळा रचून सदर आरोपी व त्यांच्या कडील एक गावठी पिस्तूल व चार जिवंत काडतुसे किं.रु. ५,५०,८०० / – चा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच सदर गुन्ह्यातील दुसऱ्या आरोपीला देखील सापळा रचून अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे.
सदरची कामगिरी, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने, पोलीस हवालदार नाना वीर, पोलीस नाईक गोरख पवार, इन्कलाब पठाण यांनी केली.
पुणे जिल्ह्यात आज पर्यंत भिगवण पोलिसांनी केलेली अग्निशस्त्र कारवाई मोठी आहे. आतापर्यंत भिगवन पोलिसांनी सतरा च्या वर अग्निशस्त्र जप्त केलेली आहेत .
भिगवण परिसरात वसुली करिता अग्निशस्त्र जात असल्याची आज पर्यंत दबक्या आवाजात चर्चा होती. तसेच वाळू माफिया आपली दहशत नागरिकात पसरावी यासाठी कमरेला घोडे लावून फिरत असल्याची चर्चा होती मात्र भिगवन पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाईमुळे आत्ता या वसुली करणारे आणि वाळू माफिया यांच्यात कमालीची घबराहट पसरली असल्याचे पाहायला मिळत आहेत तर पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन आतापर्यंत किती जणांनी अशी अग्निशस्त्र घेतले आहेत. त्यांच्या नावाची यादी बाहेर काढणे गरजेचे झाले आहे.