भिगवण वार्ताहर.दि.२७
भिगवण ग्रामीण रुग्णालयात असणाऱ्या अपुऱ्या सुविधा आणि ट्रामा केअर सेंटर तातडीने चालू करण्याच्या मागणीसाठी आज शिवतेज ग्रुप आणि अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्यावतीने आंदोलन करण्यात आले.यावेळी शेकडो महिला तसेच नागरिकांनी आंदोलनात सहभाग नोंदवत ग्रामीण रुग्णालयावर मोर्चा काढला होता.जनसामान्य रुग्ण आणि परिसरातील नागरिकांच्या या आवश्यक असणाऱ्या मागण्या १३ ओगस्ट पर्यंत मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र होणार असल्याची माहिती शिवतेज ग्रुपचे अध्यक्ष रणजीत जाधव आणि अॅड.पांडुरंग जगताप यांनी बोलताना दिली.
भिगवण हे आसपासच्या ४० गावे आणि ५० च्या वरती असणाऱ्या वाड्यावस्त्या वरील नागरिकांसाठी उत्तम दळणवळण उपलब्ध होवू शकणारे गाव आहे.मात्र या गावात आरोग्याची सेवा देणारी यंत्रणा सक्षम नसल्यामुळे नागरिकांना खासगी दवाखान्याकडे जाने भाग पडत आहे.माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नामुळे भिगवण येथे ग्रामीण रुग्णालय तसेच अपघातात जखमी झालेल्या रुग्णाला गोल्डन पिरेड मध्ये उपचार मिळावे आणि त्याचा जीव वाचावा यासाठी ट्रामा केअर सेंटर या दोन भव्य आणि मोठ्या निधीचा वापर करून इमारती उभारल्या आहेत .मात्र या इमारती फक्त नावालाच उभ्या राहिल्या आणि सर्वसामान्य नागरिकांना सेवेचा फायदा मात्र त्या पटीत झाला नाही.याच गैरसोयीचा विचार करून भिगवण येथील शिवतेज ग्रुपच्या रणजीत जाधव यांनी याविषयी आंदोलनाचा पवित्रा घेतला.शिवतेज ग्रुपच्या या आंदोलनाला अखिल भारतीय मराठा महासंघ ,अमर बौद्ध युवक संघटना ,कुंची कोरवी समाज संघटना ,भारतीय जैन मारवाडी संघ तसेच परिसरातील १५ ग्रामपंचायत कार्यकारिणीने पाठींबा देत जन सामन्याच्या आंदोलनात सहभाग नोंदवला.यावेळी परिसरातील महिलांनी मोठ्या प्रमाणावर आपली उपस्थिती लावून आरोग्य सेवा सुधारावी अशी मागणी केली. यावेळी भिगवण गावच्या सरपंच दीपिका क्षीरसागर ,तक्रारवाडी गावच्या सरपंच मनीषा वाघ , रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष विक्रम शेलार , मराठा महासंघाचे पांडुरंग जगताप ,माजी पंचायत समिती सभापती संजय देहाडे ,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमिला जाधव,भिगवण मेडिकल असोसिएशनचे डॉ.संकेत मोरे ,जेष्ठ समाजसेवक अशोक शिंदे ,रणजीत जाधव ,शरद चितारे ,भूषण काळे यांनी आपल्या भाषणात अपुऱ्या सुविधा बाबत आपले म्हणणे मांडले.यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नागनाथ एम्पल्ले आणि ग्रामीण रुग्णालयाचे वैदकीय अधिकारी डॉ.सचिन विभूते यांनी आंदोलकांचे निवेदन स्वीकारून त्यांच्या मागण्या तातडीने मान्य होणार असल्याचे सांगितले.तर ट्रामा केअर सेंटर लवकरच पूर्ण सुविधांसह सुरु व्हावे यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले.
यावेळी आंदोलकांनी रिक्त असणाऱ्या डॉक्टर तसेच सेवक पदांची भरती ,एक्सरे मशीन तसेच सोनोग्राफी मशीन ,तसेच रुग्णवाहिका दुरुस्तीसह चालकाची नेमणूक तातडीने करावी अशी मागणी केली. यावेळी भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विनोद महांगडे ,पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम यांनी चोख बंदोबस्त राखला होता.