भिगवण वार्ताहर.दि.17
तक्रारवाडी येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची ३६५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. घोडे दांडपट्टा आणि साहसी खेळाबरोबरच नेत्रदीपक लाईट आणि डीजेच्या सोबत काढण्यात आलेल्या भव्यदिव्य मिरवणुकीत परिसरातील तरुणांनी मोठा सहभाग नोंदविल्याचे दिसून आले.
तक्रारवाडी येथील तरुणांनी एकत्र येत हि छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी केली.भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार आणि लाइफलाईन हॉस्पिटलचे संचालक डॉ.संजय भोसले यांच्या उपस्थितीत सकाळी ९ वाजता महाराजांची आरती करून जयंतीला सुरवात करण्यात आली.यावेळी तरुणाईने पांढऱ्या शुभ्र वेशातील कपडे परिधान केल्यामुळे वेगळेपणा दिसून येत होता.दिवसभर महाराजांची मूर्ती सभा मंडपात दर्शनासाठी ठेवण्यात आली होती.संध्याकाळी ६ वाजता मिरवणुकीला सुरवात करण्यात आली.यावेळी १० पांढरेशुभ्र घोडे,पांढर्या रंगाचे कुडता पायजमा घातलेले तरुण आणि गळ्यात भगवे उपरणे असा वेश परिधान केलेले दांडपट्टा खेळणारे मुले यांनी वातावरणात रंगत आणली होती.भव्यदिव्य मिरवणुकीत नेत्रदीपक रंगीबेरंगी रंगाची उधळण करणारा लाईट सेट आणि डीजे यामुळे तरुणाई बंधुंद होवून नाचत असल्याचे पहावयास मिळत होते.तर संभाजी महाराज यांची जयंती असल्याचे भान राखून प्रत्येक वेळी घोषणाही देण्यात येत होत्या.
छ. संभाजी महाराजांची मिरवणूक प्रत्येक वर्षी तक्रारवाडी गावात सुरु होऊन मदनवाडी चौफूला मार्गे भिगवण शहरातून मुख्य बाजार पेठेतील रस्त्याने जात असते मात्र पोलीस अधिकारी दिलीप पवार यांच्या सूचनेचा आदर राखून तरुणांनी हि मिरवणूक फक्त तक्रारवाडी गावात काढून आदर्श निर्माण केला.या मिरवणुकीत तरुण बाल आणि जेष्टानीही सहभाग नोंदवला.मिरवणुकी दरम्यान सर्व माता भगिनींनी महाराजांच्या मूर्तीची पूजा करून आशीर्वाद घेतले.मिरवणुकीचे नियोजन राजवर्धन वाघ ,दीपराज काळंगे ,प्रथमेश निंबाळकर ,प्रणव वाघ ,किशोर काळंगे ,रोहन वाघ ,ऋतिक वाघ ,रोहन काळंगे ,केशव गोडसे यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने केले.