भिगवण वार्ताहर.दि.२४
किराणा मालाच्या दुकानाचा पाठीमागे असणारा पत्रा कापून ५८ हजार ४८० रुपयाचा किराणा माल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना भिगवण येथे घडली.तर पाठीमागे याच दुकानदाराला ५० हजार रुपयाचा चुना लावून भामट्याने किराणा नेला त्याचाच तपास लागला नसतानाच हि घरफोडी घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
याबाबत अजिनाथ वसंत कवितके या किराणा व्यावसायिकाने भिगवण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.कवितके यांचे भिगवण येथे दुकान असून १९ तारखेला सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानातील माल लंपास झाल्याचे लक्षात आले.यावेळी त्यांनी दुकानाची पाहणी केली असता त्यांना पाठीमागील बाजूचा पत्रा कापून कोणीतरी आत येत माल लंपास केल्याचे लक्षात आले.त्यांनी तातडीने याची माहिती भिगवण पोलीस ठाण्यात देत अज्ञात आरोपी विरोधात घरफोडी तसेच चोरीची तक्रार दिली.यात जवळपास ५८ हजार ४८० रुपयाचा किराणा माल गेल्याची तक्रार देण्यात आली आहे.
या चोरी झालेल्या दुकानात काही दिवसापूर्वी एका भामट्याने घरी लग्नाचा कार्यक्रम आहे असे सांगून ५० हजार रुपयाचा माल सोबत घेत पोबारा केला होता.या गुन्ह्याचा तपास भिगवण पोलीस करत असतानाच दुकानात परत चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.यात दोन्ही वेळेला दुकानदाराचे नुकसान झाले असून आता पोलीस तपास कसा करतात याकडे भिगवण करांचे लक्ष लागून राहिले आहे.सदर चोरीचा तपास भिगवण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस हवालदार समीर करे करीत आहेत.